कान्ये वेस्ट : अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी रॅपर उतरला मैदानात

प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टनं आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे ज्या डोनाल्ड ट्रंप यांचं तो कधीकाळी कौतुक करायचा, कदाचित त्याच राष्ट्राध्यक्षांना तो आव्हान देतो की काय, अशी चिन्हं आहेत.

"आपण देवावर विश्वास ठेवून, आपली स्वप्नं एक करून आणि आपलं भविष्य साकारून अमेरिका घडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची आता गरज आहे. मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे," असं कान्येनं ट्वीट करून म्हटलं आहे.

कान्येच्या या ट्वीटला त्याची पत्नी किम कार्देशियन वेस्ट आणि टेस्ला तसंच स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. किम कार्देशियनने त्याचं ट्वीट अमेरिकेच्या झेंड्यासह रिट्वीट केलं आहे.

कान्ये वेस्ट हा अमेरिकन रॅपर, गायक, गीतकार, संगीतकार आहे. संगीतासोबतच फॅशन इंडस्ट्रीमध्येही त्याचं नाव प्रसिद्ध आहे. कान्ये वेस्टला संगीत क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी अवॉर्डनं तब्बल 21 वेळा गौरविण्यात आलंय.

कान्ये आणि त्याची पत्नी किम कार्देशियन हे त्यांच्या संगीतासाठी तसंच रिअॅलिटी शो 'Keeping Up With the Kardashians'साठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर इतर सेलेब्रिटींशी उडणारे खटके आणि काही वादग्रस्त "प्रकरणं" त्यांना सतत माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठेवतात.

पण एवढं होऊनही वेस्ट राष्ट्रध्यपदाची निवडणूक लढण्याबद्दल गंभीर आहे का, असा प्रश्न उपस्थित विचारला जात आहे. कारण अजूनपर्यंत त्यानं नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकासाठी अमेरिकेच्या केंद्रीय निवडणूक आयोग अर्थात फेडरल इलेक्शन कमिशनकडे (FEC) आपलं नाव नोंदवलं नाहीये. फेडरल इलेक्शन कमिशनच्या डेटामध्ये 'कान्ये डीझ नट्झ वेस्ट' हे एक नाव आहे. पण हा केवळ योगायोग आहे.

FECच्या यादीतील या व्यक्तीने 2015 साली नोंदणी केली होती. त्याचा पत्ता '1977, गोल्डडिगर अव्हेन्यू, सूट यीझूस" असा होता. त्याने निवडणुकीसाठी कोणताही निधी गोळा केला नसल्याचंही FECच्या डेटामधून स्पष्ट होतंय.

अशी घोषणा पहिल्यांदा नाही

वेस्टने पहिल्यांदाच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली नाहीये. 2015 साली MTV व्हीडिओ म्युझिक अवॉर्ड सोहळ्यातही त्याने आपण 2020 मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं.

पण गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याने घूमजाव करत, आपण 2024 मध्ये निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं. "तुम्हाला कशाचं हसू येतंय?" फास्ट कंपनीच्या इनोव्हेशन फेस्टिव्हलमध्ये जमलेल्या प्रेक्षकांना त्यानं प्रश्न विचारला होता.

"आपण आतापर्यंत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करू शकलो असतो," असं त्यानं म्हटलं होतं.

अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी आपण 'ख्रिश्चन जीनिअस बिलेनिअर कान्ये वेस्ट' असं नाव लावणार असल्याचंही त्यानं जाहीर केलं होतं.

पण आता तो लढू शकतो का?

शनिवारी (4 जुलै) अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या ट्वीटमध्ये 43 वर्षांच्या कान्येनं आपण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार का, हे मात्र स्पष्ट केलं नाही.

तसंही आता निवडणुकीला अवघे चार महिनेच उरले असताना अमेरिकेतील प्रमुख पक्षांकडून कान्येला उमेदवारी मिळणं तसं कठीणच आहे.

स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची असेल, तर कान्येला ठराविक प्रमाणात सह्या गोळा कराव्या लागतील आणि विशिष्ट वेळेमध्ये राज्यांत आपली नोंदणीसुद्धा करावी लागेल.

काही महत्त्वाच्या राज्यात नोंदणी करण्याची डेडलाइन उलटून गेलीये, पण तरीही इतर राज्यांमध्ये म्युझिक स्टार कान्येच्या हातात पुरेसा वेळ आहे.

यंदा तर अध्यक्षपदाची निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप विरुद्ध डेमोक्रॅट जो बायडेन असा थेट सामना रंगण्याची चिन्हं आहेत.

2018 मध्ये वेस्टनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत व्हाइट हाऊसमधल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यानं 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' अशी हॅट पण घातली होती. त्यावेळी त्याने ट्रंप यांना उद्देशून 'मला ही व्यक्ती खूप आवडते,' असं म्हटलं होतं.

आफ्रिकन-अमेरिकन मतदार हे डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक आहेत, हा अमेरिकेतला सर्वसाधारण समज त्याने फेटाळून लावला होता. "जर तुम्ही कृष्णवर्णीय असाल, तर तुम्ही डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक असायला हवं, असंच लोकांना वाटतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)