टॅन्झानाईट : दोन दगड विकून खाण कामगार एका रात्रीत बनला कोट्यधीश

टांझानियामध्ये खाणीत टँझानाईट दगड शोधणारे लैझर

फोटो स्रोत, ANZANIA MINISTRY OF MINERALS

जून 2020मध्ये दोन टॅन्झानाईट दगड विकून टांझानियातील एक खाण कामगार एका रात्रीत कोट्यधीश झाला.

आतापर्यंत टॅन्झानाईटच्या शोधातील हे सगळ्यात मोठे दगड असल्याचं सांगितलं जातं.

15 किलो वजनाच्या दोन दगडांच्या बदल्यात देशातल्या खाण मंत्रालयानं सानिनू लैझर यांना 34 लाख डॉलर्स (सुमारे 26 कोटी रुपये) एवढी रक्कम दिली.

टॅन्झानाईट हा दगड केवळ टांझानियाच्या उत्तर भागात सापडतो आणि तो दागिणे बनवण्यासाठी वापरला जातो. हे पृथ्वीवरील सर्वांत दुर्मिळ रत्नांपैकी एक आहे आणि येत्या 20 वर्षांत त्याचा पुरवठा पूर्णपणे कमी होईल, असा स्थानिक भूगर्भशास्त्रज्ञाचा अंदाज आहे.

मौल्यवान दगडाची विशेषता त्याच्या वेगवेगळ्या रंगछटा जसं की हिरव्या, लाल, जांभळ्या आणि निळ्या रंगछटांमध्ये आहे. दुर्मिळतेमुळे या दगडाला जास्त किंमत आहे. दगडाचा रंग जितका स्पष्ट असतो, तितकी जास्त किंमत मिळते.

लैझर यांनी जून 2020मध्ये 9.2 आणि 5.8 किलो वजनाच्या दगडांचं उत्खनन केलं. त्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान या दगडांची विक्री केली.

आतापर्यंत उत्खननातील सर्वांत मोठ्या टॅन्झानाईट दगडाचं वजन 3.3 किलो होतं. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मगुफुली यांनी लैझर यांचं फोन करून अभिनंदन केलं.

बक्षीस मिळालं तेव्हा

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, बक्षीस मिळालं तेव्हा

ते म्हणतात, "यात लघु-खाण कामगारांचा फायदा आहे आणि यामुळे टांझानिया श्रीमंत असल्याचं सिद्ध होतं."

खाणकाम क्षेत्रात देशाच्या हिताचं रक्षण करण्याचं आणि त्याद्वारे सरकारच्या महसुलात वाढ करण्याचं आश्वासन देत मगुफुली 2015 मध्ये सत्तेत आले.

लैझर काय म्हणतात?

52 वर्षांच्या लैझर यांना चार बायका आहेत. मनयारा भागातल्या सिमांजिरो जिल्ह्यात त्यांच्या समाजात गुंतवणूक करण्याचीही त्यांची इच्छा आहे.

ते म्हणतात, "मला एक शॉपिंग मॉल आणि एक शाळा बांधायची आहे. मला ही शाळा माझ्या घराजवळ बांधायची आहे. आजूबाजूला असे बरेच गरीब लोक आहेत, ज्यांना आपल्या मुलांना शाळेत नेणं परवडत नाही."

टांझानियामध्ये खाणीत टँझानाईट दगड शोधणारे लैझर

फोटो स्रोत, ANZANIA MINISTRY OF MINERALS

"मी सुशिक्षित नाही, परंतु मला व्यावसायिक पद्धतीने गोष्टी करायला आवडतात. म्हणून माझ्या मुलांनी हा व्यवसाय व्यावसायिकपणे चालवावा, अशी माझी इच्छा आहे."

पण आता अचानक एवढे पैसे मिळाल्यामुळे मी माझी जीवनशैली बदलणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

"त्यांच्याकडे असलेल्या दोन हजार गायी सांभाळण्याचं काम ते यापुढेही करत राहीन. कोट्यधीश झाल्यामुळे आपल्याला कोणतीही अतिरिक्त खबरदारी घेण्याची गरज नाही," असंही ते म्हणाले.

लैझर यांच्यासारखे काही लघु-खाण कामगारांनी टॅन्झानाईटच्या उत्खननासाठी सरकारी परवाने घेतात. पण मोठ्या कंपन्यांच्या मालकीच्या खाणींजवळ अवैध उत्खनन प्रचलित असते.

2017 मध्ये अध्यक्ष मगुफुली यांनी लष्कराला मयनारा येथे मायरेलानी या खाणीच्या भोवती 24 किमी लांब भिंत बांधण्याचा आदेश दिला. ही खाण टॅन्झानाईटचा जगातील एकमेव स्रोत असल्याचं म्हटलं जातं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)