कोल्ड्रिंकचं व्यसन असलेली अमेरिकन महिला बनली कोट्यधीश व्यावसायिक : कारा गोल्डिन

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एनी कासिडी
- Role, बिझनेस प्रतिनिधी
तुम्हाला असलेलं व्यसन हेच एकेदिवशी तुमच्या कोट्यधीश होण्याचं कारण होईल असं कुणी सांगितलं तर? तुम्ही त्या व्यक्तीचं म्हणणं हसन्यावारी न्याल पण अमेरिकेत हे खरंच घडलंय.
अमेरिकेतली फ्लेवर्ड वॉटर कंपनी असलेल्या हिंटच्या संस्थापक कारा गोल्डीन यांच्याबाबतीच हे घडलंय.
कारा गोल्डीन सांगतात एक काळ असा होता जेव्हा कळत-नकळत मला असं व्यसन जडलं ज्याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला होता.
कारा दिवसभरात डाएट कोलाच्या कमीत कमी 10 कॅन्स रिचवायच्या. 2001 सालची ही गोष्ट.
त्या दिवसांविषयी सांगताना कारा म्हणतात, "मी त्यावेळी केवळ ड्रिंक इंडस्ट्रीच्या दाव्यांवर विश्वास ठेवत होते. मला असं वाटत होतं की डाएट कोल्ड्रिंक प्यायलाने माझ्या शरीराचं काही नुकसान होणार नाही.
पण या व्यसनाचा परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ लागला होत असल्याचं त्यांना जाणवलं. रोज साडे तीन लीटर कॅफिनयुक्त, कृत्रिम पद्धतीने गोड बनवण्यात आलेल्या कोल्ड्रिंकच्या सेवनाने त्या सुस्त झाल्या होत्या. त्यांचं वजन वाढलं आणि चेहऱ्यावर मुरुमही आले होते असं त्या सांगतात.
त्यावेळी त्या आयटी कंपनी AOL मध्ये काम करत होत्या. त्यांनी ठरवलं की ही नोकरी सोडायची आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं आणि आपली जीवनशैली बदलायची.
त्यांनी सॉफ्ट ड्रिंक घेणं पूर्णपणे बंद केलं आणि त्या फक्त पाणीच पिऊ लागल्या.

फोटो स्रोत, ROBERT MEARES
'ही सवय बदलल्यानंतर अडीच आठवड्यांच्या आत माझे मुरूम तर गेले आणि 9 किलोनं वजनही कमी झालं,' असं कारा सांगतात.
त्या म्हणतात, "अचानक झालेल्या सुधारणेमुळे मी खरंच आश्चर्यचकित झाले होते. यानंतर मी स्वतःकडे अधिक लक्ष देऊ लागले."
त्या सांगतात, "मी एक समजूतदार व्यक्ती आहे पण 'डाएट' या एका शब्दाने मला मूर्ख बनवलं."
या अनुभवातून पुढे गेल्यावर त्यांना आरोग्यदायी कोल्ड्रिंक बनवण्याची कल्पना सुचली. त्यांनी 'हिंट' नावाची कंपनी सुरू केली.
या कंपनीची उलाढाल 100 मिलिअन डॉलर्सची अंदाजे (700 कोटी रुपये) आहे. स्वच्छ पाण्यात फळांचा रस टाकून पाण्याची चव बदलली जाते. या पाण्याला हिंट वॉटर असं म्हटलं जातं.
या पाण्यात कुठल्याच प्रकारच्या साखरेचा वापर केला जात नाही.
कशी झाली सुरुवात?
सॅन फ्रान्सिस्कोमधल्या आपल्या स्वयंपाक घरातूनच त्यांच्या कंपनीला सुरुवात झाली. घरी बसून आलेला कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी घरीच प्रयोग करून पाहिला.
कारा यांनी साधं पाणी प्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या चवीचा त्यांना लवकरच कंटाळा आला. साधं पाणी अधिक चवदार बनवण्यासाठी त्यांनी त्यात स्ट्रॉबेरी, रासबेरी आणि डाळिंबाचा रस मिसळायला सुरुवात केली. सोबतच फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्यांमध्ये फळांचे तुकडे ठेवायला सुरुवात केली.
प्रिजर्व्हेटिव्ह रहित पेय
कारा सांगतात, "माझ्या मनात विचार आला की कुणीच या पेयाचा व्यवसाय करण्याचा विचार का करत नाही. मला मला वाटलं की जर मी लोकांना साखररहित पाणी पिण्याची सवय लावू शकले तर यामुळे लोकांच्या आरोग्यात मोठा फरक पडू शकतो."
त्यांच्यासमोर सर्वांत मोठं आव्हान होतं मोठ्या प्रमाणावर फ्लेवर्ड पाण्याचं (पेय) उत्पादन करणं. स्वीटनर किंवा प्रिजर्व्हेटिव्ह न टाकता हे पेय टिकवायचं कसं हा पेच त्यांच्यासमोर होता.
त्या सांगतात, "खरं सांगायचं तर आम्हाला काहीच माहिती नव्हती. कारण या व्यवसायात कुणालाच माहीत नव्हतं की प्रिजर्व्हेटिव्ह न वापरता एखादं उत्पादन कसं तयार करता येईल."

फोटो स्रोत, HINT
फळांचा रस खराब होऊ नये यासाठी काय करतात, याचा त्यांनी शोध घेतला. यानंतर त्यांचे पती थियो गोल्डिन यांच्या मदतीने आपल्या पेयासाठीसुद्धा याच तंत्राचा वापर केला. थियो हे हिंट कंपनीचे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर आहेत.
त्या सांगतात, "पेस्टुरेशनच्या सहाय्याने प्रिजर्व्हेटिव्ह न वापरता फ्लेवर्ड ड्रिंक बनवणारा हिंट हा पहिला ब्रॅंड आहे."
मात्र, कारा यांनी यशस्वीरीत्या मोठ्या प्रमाणावर पेयाचं उत्पादन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांना अशी कंपनी चालवण्याचा काहीच अनुभव नाही. त्यामुळे एखाद्या मोठ्या कंपनीकडे व्यवस्थापन द्यावं असं त्यांना वाटत होतं. काही कंपन्यांशी बोलणीही झाली पण कुणासोबत करार होऊ शकला नाही.
एका मोठ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. मात्र, 2015 साली त्यांनी फोर्ब्ज मॅगझिनला सांगितलं होतं की ही चर्चा फलदायी ठरली नाही.
कारा सांगतात त्या व्यक्तीने त्यांना 'स्विटी' म्हटलं होतं. या सेक्सिजममुळे दुखावलेल्या कारा यांनी हिंट कंपनी स्वतः चालवण्याचा आणि तिला यशस्वी करून दाखवण्याचा निर्णय घेतला.
गुगलमध्ये पोहोचलं हिंट
त्यांच्यासमोर पुढचं आव्हान होतं कोका-कोला आणि पेप्सीचं वर्चस्व असलेल्या बाजारपेठेत आपले पाय रोवणं. या कंपन्यांजवळ स्वतःचे पाण्याचे ब्रँड होते. त्या सांगतात, "आम्हाला मोठ्या सोडा कंपन्यांच्या ताकदीचा काहीच अंदाज नव्हता."
सुपरमार्केट साखळीच्या लोकल शाखांना हिंटचा स्टॉक ठेवायला राजी करणं, हे कारा यांनी उचललेलं पहिलं पाऊल होतं.
एका दुकानात ड्रिंकचे काही केस त्यांनी ठेवले होते आणि ते केस सर्व रात्रभरात खपले होते, असं कारा सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, त्यांना पहिलं मोठं यश मिळालं ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्यांच्या ओळखीने. त्यांनी हिंट सुरू केलं. तेव्हाही त्यांना वाटायचं की त्या त्यांच्या मूळच्या क्षेत्रात परत जातील. त्यामुळेच त्यांनी गुगलमध्ये नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला होता.
त्या सांगतात, "मी इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की मला या नोकरीत खरंच रस आहे. मात्र, मला आणखी एक गोष्ट आवडते." यानंतर त्या हिंटविषयी बरंच बोलल्या.
गुगलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुचवलं की त्यांनी त्यांचं पेय गुगलच्या कार्यालयात पुरवावं. यानंतर त्या गुगलच्या मुख्यालयात स्वतः ड्रिंकची डिलिव्हरी करू लागल्या.
गुगलने हिंटचा वापर सुरू करताच सिलिकॉन व्हॅलीतल्या इतर कंपन्यांनीही हिंटची मागणी सुरू केली.
फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर असलेल्या शेरिल सँडबर्गमुळेच हिंट फेसबुकमध्येही लोकप्रिय झालं. त्या गुगलमधूनच फेसबुकमध्ये आल्या होत्या. हिंट हे त्यांचं आवडतं पेय होतं.
51 वर्षांच्या कारा सांगतात, "आजही हिंट ही सिलिकॉन व्हॅलीला ड्रिंकचा पुरवठा करणारी सर्वांत मोठी कंपनी आहोत."
काही वर्षातच ही कंपनी सिलिकॉन व्हॅलीच्या बाहेरही आपला विस्तार करणार आहे.
या कंपनीत 200 कर्मचारी आहेत. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये संगीतकार जॉन लिजेंड यांचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
केवळ व्यवसाय करणं हेच कारा यांचं ध्येय नाही तर जगभरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं व्हावं असं त्यांना वाटतं. ओबेसिटी आणि टाइप-2 डायबिटीजबद्दल जागरूकता मोहीमही त्यांच्या कंपनीनं हाती घेतली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








