कोरोना व्हायरसची बाधा झालेल्यांना आयसीयूची गरज का भासते? आयसीयू म्हणजे काय?

आयसीयू

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, बीबीसी न्यूज ऑनलाईन

कोरोनाग्रस्त रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना सध्या आयसीयूमध्ये म्हणजेच अतिदक्षता विभागात भरती केलं जात आहे. या आयसीयूमध्येच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जीवन - मरणाच्या प्रश्नावर सध्या उत्तर सापडतंय.

आयसीयूमध्येच कोरोनाग्रस्त रुग्णांना प्रथम ऑक्सिजन मास्क लावला जातो आणि त्यानंतर प्रकृती जास्त बिघडली तर व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. या आयसीयूमध्ये असणारी यंत्रणा आणि तिथले डॉक्टर्स हेच रुग्णाला उपचार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

काही कोरोनाग्रस्तांना आयसीयूची गरज का लागते?

कोरोना व्हायरस हा थेट मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर म्हणजे फुप्फुसावर हल्ला करतो. यामुळे छातीत कफ साठल्याने अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो. यासाठी आयसीयूमध्ये प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवलं जात नाही. पण, बहुतेकांना ऑक्सिजन मास्कद्वारे सातत्याने ऑक्सिजन पुरवला जातो.

ऑक्सिजन सिलिंडरला जोडलेल्या नळीद्वारे हा ऑक्सिजन मास्कद्वारे रुग्णाच्या नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. यावेळी रुग्णांना बेशुद्ध केलं जात नाही, ते जागेच असतात.

आयसीयू (ICU) म्हणजे काय?

आयसीयू म्हणजेच इंटेनसिव्ह केअर युनिट. आयसीयूमध्ये अतिगंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांवर उपचार होतात. या कक्षात डॉक्टर आणि नर्सेस थेट रुग्णाची काळजी घेत असतात.

कोरोना
लाईन

एका आयसीयूमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच रुग्ण असतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त संख्येनं आरोग्य कर्मचारी असतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाकडे एका व्यक्तीला काळजीपूर्वक लक्ष देता येतं. आयसीयूमध्ये मानवी शरीराची तपासणी सतत करण्यासाठी अनेक उपकरणं प्रत्येक रुग्णाच्या बेडपाशी असतात.

आयसीयूची गरज कोणाला भासते?

अनेक कारणांमुळे एखाद्या रुग्णाला आयसीयूची गरज ऐनवेळी भासू शकते. काही रुग्णांना एखाद्या मोठ्या ऑपरेशननंतर या कक्षाची गरज लागते. तर, काहींना रस्ते अपघातासारख्या दुर्देवी घटनेनंतर आयसीयूची गरज लागते. तसंच, कर्करोगासारख्या घातक आजारांमुळे आजारी पडलेल्या रुग्णांनाही आयसीयूची गरज बहुतेकदा लागताना आपण पाहतो.

आयसीयू

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

व्हेंटिलेटर कसं काम करतं?

आयसीयूमधल्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं असताना बऱ्याच टयूब्स, केबल्सद्वारे काही मशिन्स जोडलेली असतात. यावरून रुग्ण उपचारांना कसा प्रतिसाद देत आहे आणि रुग्णाचे महत्त्वाचे अवयव कसं काम करतात हे याद्वारे डॉक्टरांना कळतं.

त्यानुसार, डॉक्टर रुग्णाला नसांवाटे महत्त्वाची औषधं देतात. यावेळी सलाईनद्वारे शरीरात ताकद यावी यासाठी व्हिटॅमिन्सही दिले जातात.

आयसीयूमधून बरं होताना...

आयसीयूमध्ये केल्या गेलेल्या उपचारांनंतर आणि त्यानंतर केल्या गेलेल्या रक्ताच्या वगैरे तपासण्यांनंतर रुग्णाला सामान्य रुग्णांच्या वॉर्डमध्ये नेण्याचा निर्णय घेतला जातो. सध्या कोरोनाग्रस्तांवर बराच काळ आयसीयूमध्ये राहण्याची वेळ येत आहे.

कोलकात्यामधले 52 वर्षीय निताईदास मुखर्जी हे तब्बल आयसीयूमध्ये 36 दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे एखाद्या रुग्णाला किती काळ आयसीयूमध्ये ठेवावं लागेल हे सांगता येत नाही.

आयसीयू

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

बऱ्याच जणांची सुटका पण यातून लवकर होत आहे. आयसीयूमध्ये प्रकृतीत सुधारणा झालेल्या रुग्णांना पुढे काही दिवस सामान्य रुग्णांच्या कक्षात ठेवलं जातं. त्यानंतर त्यांना घरी जाता येतं. तोपर्यंत आयसीयूमध्ये रिकामा झालेला बेड दुसऱ्या गंभीर रुग्णाकडे गेलेला असतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)