पाकिस्तान विमान अपघात: पायलट कोरोनावर बोलत होता आणि...

कोरोना, पाकिस्तान

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, पाकिस्तान विमान अपघात

पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्यात विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 97जणांचा मृत्यू झाला होता.

या अपघातासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) आणि वैमानिका यांची चूक कारणीभूत होती.

दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सुरुवातीच्या अहवालात हे म्हटलं आहे.

नियमावलीचं पालन करण्यात एटीसी आणि वैमानिक अपयशी ठरले, असं पाकिस्तानचे हवाई वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी संसदेत जाहीर केलं.

विमानाचे वैमानिक आणि सहवैमानिक जगभरात पसरलेल्या कोरोनाविषयी बोलत होते. यामुळेच विमान भरकटलं. 22 मे रोजी कराची शहरातल्या निवासी भागात हे विमान कोसळलं होतं. या अपघातात केवळ दोन जणांचा जीव वाचू शकला.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या एअरबस ए-320 मध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती, असं गुलाम सरवर खान यांनी स्पष्ट केलं.

कोरोना, पाकिस्तान

फोटो स्रोत, Social meida

फोटो कॅप्शन, घटनास्थळाचे दृश्य

वैमानिकांनी एटीसीकडून मिळालेल्या सूचनांचं पालन केलं नाही. एटीसीने वैमानिकांना हे सांगितलं नाही की विमानाचं इंजिन टक्कर होण्याच्या बेतात आहे.

हे विमान लाहोरहून कराचीसाठी रवाना झालं होतं. कराचीच्या जिन्ना इंटरनॅशनल उतरण्याच्या काही मिनिटं आधी हे विमान निवासी भागातच कोसळलं.

वैमानिक लँडिंग गिअर योग्य पद्धतीने हाताळण्यात अपयशी ठरले. यामुळे लँडिंगचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला नाही.

दुसऱ्या प्रयत्नावेळी वैमानिकांनी विमानाचं इंजिन अतिशय भीषण अवस्थेत असल्याचं एटीसीला सांगितलंच नाही.

विमानात काय झालं?

पाकिस्तान एअरलाईन्चे मुख्य अधिकारी एअर व्हाईस मार्शल अर्शद मलिक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वैमानिकांनी एटीसीला विमानाच्या इंजिनात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचं सांगितलं.

कोरोना

अपघात झाल्यानंतर काही तासातच वैमानिक आणि एटीसी यांच्यातील संभाषण पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी ऐकवलं होतं.

यामध्ये वैमानिक म्हणतो, विमानाच्या दोन्ही इंजिनाचं काम जवळपास थांबवलं आहे.

एटीसीतर्फे विचारण्यात आलं की, तुम्ही बेली लँडिंगसाठी तयार आहात का?

त्यावर वैमानिक म्हणाले, 'मे डे मे डे'

कोरोना, पाकिस्तान

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, घटनास्थळाचं दृश्य

किरकोळ जखमांसह अपघातातून वाचलेले झुबैर यांनी सांगितलं, विमानाने एकदा लँडिंगचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर दहा-पंधरा मिनिटातच विमान कोसळलं. कोणालाही याची कल्पना नव्हती.

सगळे प्रवासी निवांत बसले होते. विमान कोसळताच सगळ्या बाजूंनी किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक. मला सगळीकडे आग दिसत होती. मला धूर आणि धुळीमुळे काहीही दिसत नव्हतं. लोकांचा आक्रोश ऐकू होत होता. मी सीटबेल्ट उघडला. मला एका दिशेने प्रकाश दिसला. मी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी मला दहा फूटांवरून उडी मारावी लागली.

हे विमान पाकिस्तान एअरलाईन्सच्या ताफ्यात 2014मध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वार्षिक परीक्षणात विमान वाहतुकीसाठी योग्य स्थितीत असल्याचं स्पष्ट झालं होतं. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या हवाई वाहतूक सेवांमध्ये या विमानाचा समावेश होतो.

पाकिस्तानमधील विमान सुरक्षा

पाकिस्तानमधील विमान सुरक्षांच्या आकडेवारीत चढउतार पाहायला मिळतो. पाकिस्तानात अनेक विमान अपघात झाले आहेत.

पाकिस्तान एअरलाईन्सचा हा 16वा अपघात असल्याचं एका वर्तमानपत्राने म्हटलं आहे.

2010 मध्ये खाजगी एअरलाईन्सचं विमान इस्लामाबादजवळ अपघातग्रस्त झालं होतं. या दुर्घटनेत विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वच्या सर्व 152 जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानच्या हवाई इतिहासातला हा सगळ्यात जीवघेणा अपघात होता.

2012 मध्ये पाकिस्तानमधल्या भोजा एअरचं बोइंग 73-200 विमान खराब हवामानामुळे दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातात 121 प्रवासी, वैमानिकांसह सहाजणांचा मृत्यू झाला होता.

2016 मध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचं विमान उत्तरेकडच्या भागातून इस्लामाबादसाठी जात असताना अपघात झाला होता. यामध्ये 47जणांचा मृत्यू झाला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)