You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्लॅक लाइव्हज मॅटर : लंडन, पॅरिसच्या रस्त्यांवरही वर्णद्वेषविरोधी मोहिमेचा नारा
अमेरिकेत मिनिपोलिस भागात आफ्रो-अमेरिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूचे पडसाद युरोपात उमटू लागले आहेत.
खुद्द अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये या घटनेनंतर प्रदर्शनं, आंदोलनं सुरू झाली आहेत. शनिवारी (13 जून) ब्रिटनमध्ये लंडन इथे आणि फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये वर्णद्वेषविरोधी आंदोलन पाहायला मिळालं.
कृष्णवर्णीय जॉर्ज यांचा मृत्यू एका गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या हातून झाला. जॉर्ज यांच्या मानेवर गुडघा रोवून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हीडिओ जगभर व्हायरल झाला होता.
पॅरिस शहरात वर्णद्वेषविरोधी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा प्रयोग करावा लागला.
लंडनमध्ये आंदोलनादरम्यान हिंसाचार, पोलिसांवर हल्ला, हत्यारं बाळगणं या आरोपांसाठी पोलिसांनी 100 लोकांना ताब्यात घेतलं. आंदोलनकर्त्यांशी झालेल्या झटापटीत सहा पोलीस जखमी झाल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
न्याय नाही तर शांतता नाही
अमेरिकेत सुरू असलेल्या 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' या आंदोलनाच्या धर्तीवर पॅरिसमध्ये न्याय नाही तर शांतता नाही हे आंदोलन झालं. शनिवारी दुपारी पॅरिसमधल्या सेंट्रल पॅरिस प्लेस डे याठिकाणी आंदोलनकर्ते एकत्र आले होते. या आंदोलनाला एक स्थानिक किनारही आहे.
2016 मध्ये फ्रान्स पोलिसांच्या कोठडीत अडामा त्राओर नावाच्या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शनिवारी झालेल्या आंदोलनावेळी 'जस्टीस फॉर अडामा' हे फलक झळकले होते. आंदोलनात अडामाची बहीणही सहभागी झाली होती.
सामाजिक भेदभाव, वर्णद्वेष आणि पोलिसांच्या क्रूर वागणुकीला विरोध करण्याचं अपील त्यांनी केलं. जे अमेरिकेत होतंय तेच फ्रान्समध्ये होतंय. आपले बांधव जीव गमावत आहेत असं त्या म्हणाल्या.
पॅरिसमधल्या प्लेस डे रिपब्लिक याठिकाणी एकत्र येण्याची परवानगी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दिली होती. मात्र तिथून ऑपेरा एरियापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी नाकारण्यात आली. मोर्चामुळे स्थानिक व्यावसायिकांचं नुकसान होऊ शकतं असं कारण देण्यात आलं.
आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
फ्रान्समधल्या ल्योन आणि मार्सिले या भागांमध्येही अशापद्धतीची आंदोलनं पाहायला मिळाली.
फ्रान्सच्या पोलिसांविरोधात आंदोलन का?
फ्रान्समधील वॉचडॉग यंत्रणेच्या मते गेल्या वर्षी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात 1,500 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी निम्म्याहून अधिक तक्रारी हिंसक प्रकरणांशी संबंधित होत्या.
14 वर्षांच्या एका मुलाला गंभीररीत्या जखमी केल्याचा आरोप पोलिसांवर आहे. स्कूटर चोरी प्रकरणात संशयित म्हणून त्याला अटक करण्यात आली होती.
संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांच्या चोकहोल्ड पद्धतीवर बंदी आणण्यात यायली हवी असं फ्रान्सचे गृहमंत्री क्रिस्टोफ केस्टानर यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत. यामध्ये वर्णभेदाला, वर्णद्वेषाला जराही थारा नाही. जे अधिकारी याचं समर्थन करतात त्यांना निलंबित करण्यात येईल.
लंडनमध्येही आंदोलन
फ्लॉइड यांच्या मृत्यूनिमित्ताने आयोजित आंदोलनात सहभागी न होण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला होता. मात्र तरीही सेंट्रल लंडनमध्ये हजारो आंदोलनकर्ते जमा झाले होते.
दुसरीकडे डाव्या विचारसरणीच्या आंदोलकांनीही रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. वर्णद्वेषविरोधी आंदोनकर्त्यांनी देशाचे मानबिंदू असलेल्या मानकऱ्यांच्या पुतळ्यांचं नुकसान करू नये म्हणून रस्त्यावर उतरल्याचं त्यांनी सांगितलं.
ग्लासगो, बेलफास्ट तसंच ब्रिस्टलमध्ये वॉर मेमोरियलाचं जतन करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याचा दावा त्यांनी केला.
लंडनमध्ये पोलिसांनी आंदोनकर्त्यांना संध्याकाळी पाच वाजता रस्ता तसंच परिसर मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही आंदोलनकर्ते त्या भागात होते.
आमच्या देशात वर्णभेदाला जराही स्थान नाही. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
आंदोलनकर्ते वाइटहॉल आणि पार्लमेंट स्क्वेअरमध्ये एकत्र जमले होते. इंग्लंडचे नारे देत होते. काही वेळातच आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि कॅन फेकायला सुरुवात केली.
हाईड पार्क आणि मार्बल आर्च भागात ब्लॅक लाईव्स मॅटरच्या निमित्ताने शांततामय आंदोलनही झालं.
लंडनसह ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी वर्णभेदाविरोधात शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन झालं. ब्रायटन इथं हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांना समुद्रकिनाऱ्यावर मानवी साखळी तयार केली.
न्यूकॅस्टल याठिकाणी ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीचे समर्थक जमले होते. या चळवळीला विरोध करणाऱ्या गटाचा त्यांना सामना करावा लागला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)