WHOशी डोनाल्ड ट्रंप यांनी संबंध तोडल्यामुळे अमेरिकेतूनच होतेय टीका

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक आरोग्य संघटनेबरोबर (WHO) संबंध तोडल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केल्यानंतर त्यांना परदेशातूनच नव्हे, तर देशांतर्गत टीकेलाही सामोर जावं लागत आहे.
युरोपीय युनियनने ट्रंप यांना आग्रह केला आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
ट्रंप यांचा निर्णय आंतरराष्ट्रीय आरोग्यासाठी निराशाजनक असल्याचं जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या सभागृहातील आरोग्य समितीच्या प्रमुखांनीही म्हटलंय की, WHOमधून बाहेर पडण्याची ही योग्य वेळ नाही.
कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी WHOनं ठोस पावलं उचलली नाहीत, ही संस्था चीनच्या हातचं बाहुलं बनल्याचा आरोप ट्रंप यांनी केला आहे.
कोरोना व्हायरससंदर्भातील कामगिरीविषयी डोनाल्ड ट्रंप नियमितपणे WHO वर टीका करत आहे.
गेल्या महिन्यात ट्रंप यांनी WHOला मिळणारा निधी रोखण्याची घोषणा केली होता. शुक्रवारी त्यांना हा निधी थांबवला.
गेल्या वर्षी अमेरिकेनं WHOला 40 कोटी डॉलरहून अधिक निधी दिला होता. जगभरातल्या इतर देशांतून मिळणाऱ्या रकमेपैकी ही रक्कम सर्वाधिक आहे. अमेरिकेचा मदतनिधी हा WHOच्या एकूण बजेटच्या 15 टक्के इतका आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

जगभरात काय प्रतिक्रिया?
युरोपीयन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वोन आणि उच्चपदस्थ अधिकारी जोसेफ बोरेल यांनी निवेदनात म्हटलंय की, "कोरोनाच्या काळात सहकार्य वाढवण्याची गरज आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगावर त्याचा परिणाम होईल. अमेरिकेनं या निर्णयाचा पुनिर्विचार करावा, असा आमचा आग्रह आहे."
जर्मनीचे आरोग्य मंत्री जेंस स्पान यांनी म्हटलंय, "WHOमध्ये सुधारणेची गरज आहे, पण अमेरिकेनं उचलेलं पाऊल निराशाजनक आहे. आता युरोपीय युनियननं यात अधिक सकारात्मक भूमिका निभवावी लागणार आहे."

फोटो स्रोत, AFP
ब्रिटनमधील प्रतिनिधीनं म्हटलं, "कोरोनाच्या काळाच WHO सक्रिय असणं गरजेचं आहे. WHOला ब्रिटनकडून मिळणारा निधी नियमितपणे देण्यात येईल. निधी रोखण्याचा आम्ही विचार करत नाही आहोत."
अमेरिकेच्या सिनेटमध्ये आरोग्य समितीचे प्रमुख लैमर अलेक्झांडर यांनी म्हटलंय की, ट्रंप यांच्या निर्णयामुळे कोरोनाची लस बनवण्याच्या प्रक्रियेला धक्का लागेल. त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
"WHOमध्ये सुधारणेची गरज आहे, यात काहीच शंका नाही. कोरोना व्हायरसच्या काळात WHOवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण, सध्या आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. कोरोनाच्या साथीनंतर बाकीच्या गोष्टी ठीक करता येऊ शकतात," असं लैमर यांनी म्हटलंय.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार राहिलेल्या एलिझाबेथ वॉरेन यांनी ट्वीट करत म्हटलं, "जागतिक साथीच्या काळात WHOबरोबरचं नातं संपवल्यामुळे आमचं जागतिक नेतृत्व प्रभावित होऊ शकतं. यामुळे अमेरिकी नागरिकांची आरोग्य यंत्रणाही प्रभावित होऊ शकते."
WHOचे माजी कार्यकारी महानिर्देशक एंड्रेस नॉर्डोस्ट्रोम यांनी म्हटलंय की, "कोरोनाच्या काळात एकतेची गरज असताना या निर्णयामुळे तणावत भर पडेल."
दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्र्यांनीही या निर्णयाला दु:खद म्हटलं आहे.
कोरोनाच्या व्हायरसच्या काळात WHOची भूमिका काय होती, याविषयी स्वतंत्र चौकशी करण्याची सहमती WHOच्या सदस्य देशांनी 19 मे रोजी जाहीर केली होती.
ट्रंप यांनी असा निर्णय का घेतला?
शुक्रवारी पत्रकार परिषेदत ट्रंप यांनी म्हटलं, "WHOमध्ये व्यापक सुधारणा करण्याची सूचना आम्ही केली होती, पण त्यांनी नकार दिला. यानंतर आम्ही WHOबरोबरचे संबंध तोडण्याचा निर्णय घेत आहोत. आम्ही जो निधी WHOला द्यायचो, तो आता दुसऱ्या संस्थांना देऊ."
अमेरिका औपचारिकरित्या स्वत:ला WHOपासून कधी वेगळं करेल, ते अद्याप स्पष्ट नाही.
1948मध्ये WHO आणि अमेरिकेत झालेल्या एका करारानुसार, दोघांना वेगळं व्हायचं असल्यास एक वर्ष अगोदर नोटीस द्यायची अट आहे.
चीननं सुरुवातीला कोरोना व्हायरसविषयीची माहिती लपवण्याच प्रयत्न केला आणि WHOनं काहीच केलं नाही, असं ट्रंप यांनी म्हटलं होतं.
"WHOवर चीनचं नियंत्रण आहे. चीननं कोरोनाच्या बाबतील WHOवर दबावतंत्राचा वापर केला आणि जगाची दिशाभूल केली. चीनच्या गुन्ह्याची शिक्षा सगळ्या जगाला भोगावी लागत आहे," असंही ट्रंप यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 2 हजार जणांचा जीव गेला आहे. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रंप यांनी कोरोनाच्या परिणामांना कमी लेखलं म्हणून देशाचं इतकं नुकसान झालं. ते त्यांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी असं करत आहे, असं अमेरिकेतल्या विरोधी पक्षाचं म्हणणं आहे.
लवकरच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे आणि या संकटाच्या काळात ट्रंप यांच्या निवडून येण्याविषयी प्रश्न आहेत.
चीनचं म्हणणं आहे की, स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी ट्रंप जगाची दिशाभूल करत आहेत.
WHO काय आहे?
7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या संघटनेची स्थापना झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या सात दशकांत सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सुधारणांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचाही वाटा आहे.
कुठल्याही नव्या आजाराची माहिती मिळवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं, आजारांच्या साथी पसरत असतील तर त्याविषयी देशांना सावध करणं, लस आणि उपचारांविषयी संशोधन, आरोग्यासाठी निधी जमा करणं आणि तो गरज असेल तिथे पोहोचवणं अशी कामं ही संघटना करते.
WHOचे 194 देश सदस्य आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








