डोनाल्ड ट्रंप : अमेरिका आणि WHO यांच्यातले संबंध संपुष्टात

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) असलेले सगळे संबंध अमेरिका तोडत असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे.
कोरोना व्हायरससंदर्भात चीनला जाब विचारण्यात WHO अपयशी ठरल्याचा आरोप ट्रंप यांनी केला आहे.
"सध्या चीनचं जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्ण नियंत्रण आहे. चीनला धडा शिकवण्यासाठीच आपण हा निर्णय घेतलाय," असं ट्रंप यांनी सांगितलं.
अमेरिका WHOमधून आता बाहेर पडणार असून त्यांना देत असलेला निधी इतरत्र वळवणार असल्याचंही राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी स्पष्ट केलं.
जागतिक आरोग्य संघटनेला विविध देशांकडून निधी दिला जातो. यामध्ये अमेरिकेकडून मिळणारा निधी सर्वाधिक आहे. अमेरिकेने 2019 या वर्षात WHO ला 40 कोटी डॉलरपेक्षाही जास्त निधी दिला होता.
यावर्षी पुन्हा निवडणुकांना सामोरे जाणार असलेल्या ट्रंप यांच्यावर कोरोना संकटाची हाताळणी योग्य पद्धतीने न केल्याबाबत टीका होत आहे. पण ट्रंप यांनी चीनवर कोरोनाबाबत गंभीर आरोप केले आहेत.
अमेरिकेत सध्या एक लाखाहून जास्त जणांचा कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाला आहे. ही संख्या जगात सर्वाधिक आहे.
डोनाल्ड ट्रंप काय म्हणाले?
"आम्ही आजपासून जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले संबंध तोडत आहोत. सार्वजनिक आरोग्याबाबत काम करणाऱ्या इतर संस्थांकडे हा निधी वळवण्यात येईल," असं ट्रंप यांनी सांगितलं.
चीन सरकारच्या दुष्कृत्याची फळं संपूर्ण जग भोगत असल्याचा आरोप ट्रंप यांनी केला. ते पुढे म्हणाले, "चीनमुळे आलेल्या जागतिक आरोग्य संकटामुळे एक लाख अमेरिकन नागरिकांचा बळी गेला आहे. चीनच्या दबाबामुळेच WHOने कोरोना व्हायरससंदर्भात संपूर्ण जगाची दिशाभूल केली."
वादाची पार्श्वभूमी काय?
ट्रंप आणि WHO वादाला गेल्या महिन्यात सुरुवात झाली. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संकट योग्य प्रकारे हाताळलं नसल्याची टीका ट्रंप यांनी केली होती. त्यावेळी आपण WHOला देत असलेला निधी बंद करू, अशी धमकीही ट्रंप यांनी दिली होती.
संयुक्त राष्ट्रांची आरोग्य संघटना असलेली WHO आपलं प्रमुख कर्तव्य बजावण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही ट्रंप यांनी केला होता.
याबाबत ट्रंप यांनी WHO चे प्रमुख टेड्रोस अधेनॉम गेब्रियासुस यांना 18 मे रोजी एक पत्र लिहिलं होतं.
"कोरोना व्हायरसच्या महामारीदरम्यान WHO ने योग्य पावलं उचलली नाही. संघटनेच्या चुकीच्या निर्णयांचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे," असं ट्रंप यांनी पत्रात लिहिलं.
तसंच WHO ही चीनच्या हातचं बाहुलं असल्याची टीकाही ट्रंप यांनी केली.

फोटो स्रोत, AFP
दुसरीकडे, चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार अमेरिकाच जबाबदार असल्याचा प्रत्यारोप चीनने केला होता. कोव्हिड-19 ची साथ पसरण्यास राष्ट्राध्यक्ष ट्रंपच कारणीभूत असल्याचं चीनने म्हटलं होतं.
या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झो लिजान यांनी पत्रकार परिषद घेतली. "राष्ट्राध्यक्ष ट्रंप लोकांची दिशाभूल करून कोरोना महामारीचा दोष चीनच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या नाकर्तेपणामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे," असं वक्तव्य लिजान यांनी केलं होतं.
दरम्यान, WHO मधील सदस्य राष्ट्रांनी कोरोना व्हायरस साथीसंदर्भात स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









