Nasa - SpaceX: अमेरिकेची अंतराळात ऐतिहासिक झेप, 'स्पेसएक्स' बरोबरची मोहिम महत्त्वाची आहे कारण...

फोटो स्रोत, EPA
- Author, जॉनथन अॅमोस
- Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
नासाच्या दोन अंतराळवीरांना स्पेसएक्स कंपनीने अवकाशात पाठवले आहे. नऊ वर्षांपूर्वी शटल्स बंद झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या भूमीतून अमेरिकन अंतराळवीर अवकाशात झेपावले आहेत.
या द्वारे डो हार्ले आणि बॉब बेहन्केन हे अंतराळवीर केवळ नव्या कॅप्सूल प्रणालीतून प्रवास करत नसून त्यांनी नासासाठी एका नव्या व्यावसायिक मॉडेलला सुरुवात केली आहे.
आता नासाकडे स्वतःचे यान नसेल परंतु स्पेसएक्सने दिलेली 'टॅक्सी' सर्व्हिस नासा वापरेल.
स्पेसएक्स बरोबर इतरही कंपन्या यात सहभागी होतील आणि एक नवी बाजारपेठ खुली होईल असा विचार यामागे आहे. बोइंग कंपनीनेही नासाशी याबाबत संपर्क केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्पेसएक्सचे इलॉन मस्क म्हणाले, या रॉकेटचे प्रक्षेपण पाहाणं हा एकदम भावनिक क्षण होता.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर जाण्यासाठी रशियन रॉकेट आणि कॅप्सूलवर अवलंबून राहाणं आता कमी होईल, असं मत मस्क यांनी व्यक्त केलं आहे.
प्रक्षेपण पाहायला आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही हाच मुद्दा उचलला.
ते म्हणाले, आपल्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यासाठी इतर देशांसमोर हात पसरण्याची वेळ यापूर्वीच्या नेत्यांनी आणली होती. पण आता तसे होणार नाही. आपण आता अमेरिकन अंतराळवीर आपल्या अमेरिकन यानातून पाठवले आहेत तेही अमेरिकेच्याच भूमीतून

फोटो स्रोत, Getty Images
फ्लोरिडाच्या केनेडी अंतराळ केंद्रातून प्रक्षेपणाची काल 50 टक्केच संधी असल्याचं भाकीत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. मात्र हवामान अनुकूल राहिल्याने शास्त्रज्ञ हे यान अवकाशात पाठवू शकले.

फोटो स्रोत, Getty Images
39-ए या लाँचपॅडवरून फाल्कन हे यान झेपावल्यानंतर अडीच मिनिटांमध्ये त्याचा खालचा भाग वेगळा झाला. त्यानंतर सहा मिनिटांनी या अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत सुरक्षितपणे प्रस्थापित करण्यात आले.
हार्ले आणि बेहेन्कन आज रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर पोहोचतील. ते प्रवास करत असलेल्या कॅप्सुलची ते चाचणी घेतील आणि थोडे मॅन्युअल फ्लायिंगसुद्धा करतील.

अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर जाण्यासाठी ड्रॅगन ही कॅप्सूल पूर्णतः स्वयंचलित पद्धतीवर काम करेल. तरिही ते यान निंयत्रित करण्याची वेळ आली तर ते कसे काम करेल याचीच चाचणी हे दोघे अंतराळवीर घेतील. ड्रॅगमध्ये कोणतीही कंट्रोल स्टीक नाही. सर्व आज्ञा टचस्क्रीन पॅनलच्या माध्यमातून द्याव्या लागणार आहेत.
त्यांचं पहिलं काम म्हणजे यानाला नाव देणं हे होतं. त्यांनी त्याचं नाव एंडेव्हर असं घोषित केलं.
डो हार्ले म्हणाले, "आम्ही याला एंडे्व्हर असं नाव दिलं कारण नासा, स्पेस्एक्स, अमेरिकेची काहीतरी जिंकण्याची इच्छा. दुसरं कारण, बॉब आणि माझ्यासाठी थोडं वैयक्तिक आहे. ते म्हणजे आम्ही पहिली मोहीम एंडेव्हर शटलमधून केली होती."
ब्रिटिश दर्यावर्दी जेम्स कुकने ऑस्ट्रेलियापर्यंत 18व्या शतकात ज्या जहाजातून प्रवास केला होता त्याचं नावही एंडेव्हर असं होतं. हे दोघे आता अंतराळ केंद्रात किती काळ राहातील हे सांगितलेले नाही, मात्र हा कालावधी एक ते चार महिन्याचा असेल.
स्पेस एक्स आणि नासाने 6 अंतराळ मोहिमांसाठी 2.6 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. ऑगस्ट महिन्यात पहिली मोहीम संपल्यानंतर 4 अंतराळवीर अवकाशात झेपावतील.

कोरोना व्हायरसच्या संकटातही हे प्रक्षेपण यशस्वी झाले.
केनेडी कॉम्प्लेक्सजवळ लोकांनी जमू नये असं आवाहन करण्यात आले होते तसेच प्रक्षेपणाच्या जागी नासाने अत्यंत कमी पाहुण्यांना आमंत्रित केले होते.
या अंतराळवीरांना प्रक्षेपणाआधी क्वारंटाइन करण्यात आले होते तसेच त्यांच्याशी संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्यात आली होती. तसेच ज्यांचा संपर्क अनिवार्य आहे, त्यांना मास्क व इतर काळजी घेण्यास सांगितले होते.

स्पेस एक्स कंपनी केवळ 18 वर्षांपूर्वी स्थापन झाली. या कंपनीने आता अंतराळ प्रक्षेपणात सहभाग घेतला असून मानवी मोहिमांसाठी यान तयार करण्याच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे. 2002 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने आतापर्यंत पुन्हा वापरण्याजोगी म्हणजेच रियुजेबल रॉकेट लाँच सिस्टीम तयार केलेली आहे, अंतराळात कार पाठवलीय, उपग्रह त्यांच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पाठवले आहेत.
अंतराळवीरांच्या स्पेस सूटचं वैशिष्ट्यं काय?
या मोहिमेतील अंतराळवीरांच्या सूट्सनी मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण आतापर्यंतच्या अंतराळवीराच्या स्पेस सूट्पेक्षा हे सूट्स वेगळे होते. या सूटना 'स्टारमन सूट्स' म्हटलं जातंय.
आतापर्यंतच्या बोजड सूट्सपेक्षा हे स्पेससूट सुटसुटीत होते. यातली हेल्मेट्स 3D प्रिंट करण्यात आली असून ग्लोव्हज टचस्क्रीन सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजेच हे ग्लोव्ह्ज घालूनही अंतराळवीर टचस्क्रीन वापरू शकतील.

फोटो स्रोत, AFP
पण आतापर्यंतच्या स्पेस सूट्सप्रमाणेच याही सूट्सचा उद्देश तोच आहे. क्रू मेंबर्सना कमी दबावापासून वाचवणं. यामध्ये कॅपसुलमधला हवेचा दाब कमी होतो. याशिवाय अंतराळवीरांना पुरेसा ऑक्सिजन मिळत राहील आणि त्यांच्या शरीराचं तापमान काय राहील याचीही काळजी हे स्पेस सूट्स घेतात. या स्पेससूट्सना एका 'नाळेने' जोडलं जातं ज्यातून त्यांना संपर्कासाठीच्या लिंक्स आणि श्वसनासाठीचे वायू पुरवले जातात. आणि ही केबल वा नाळ त्यांच्या सीटला जोडलेली असते.
कॅप्टन अमेरिका, सिव्हिल वॉर आणि बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन, डॉन ऑफ जस्टिस यासारख्या चित्रपटांचं काम करणारे हॉलिवुडचे कॉस्च्युम डिझायनर होजे फर्नांडिस यांनी हे स्पेस सूट्स डिझाईन केले आहेत.
हे सूट्स स्पेस एक्सच्या कॅप्स्यूलमध्ये - म्हणजेच क्रू ड्रॅगनमध्ये वापरता येतील. स्पेसवॉक्ससाठी म्हणजेच स्पेस स्टेशनच्या बाहेर पडून काम करण्यासाठी हे सूट्स वापरता येणार नाहीत.
स्पेस एक्स मोहीम महत्त्वाची का?
नासाच्या आतापर्यंतच्या सगळ्या मोहिमा आणि स्पेसएक्स मोहीमेतला मुख्य फरक म्हणजे यासाठीची संपूर्ण तयारी आणि आखणी, खर्च स्पेस एक्स या कंपनीने केलेला आहे.

फोटो स्रोत, NASA
नासाने 2011 पासून अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या मोहीमा राबवलेल्या नाहीत. कारण नासाने या वर्षी त्यांची स्पेस शटल्स वापरणं बंद केलं.
त्यानंतर अमेरिका त्यांचे अंतराळवीर पाठवण्यासाठी रशिया आणि त्यांच्या सोयूझ एअरक्राफ्टवर अवलंबून होती. आणि यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागत होता.
त्यामुळेच अंतराळवीरांना अंतराळात नेण्यासाठी वा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत नेण्यासाठी त्यांनी स्पेस एक्स आणि बोईंग या कंपन्यांशी करार केलेला आहे.
शिवाय स्पेस एक्सने डिझाईन केलेली रॉकेट्स ही पुन्हा वापरता येण्याजोगी म्हणजेच री-युजेबल असल्याने पैसा वाचणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








