लॉकडाऊन एक्झिट प्लान : भारताने जगाकडून काय शिकावं?

क्वारंटाइन

फोटो स्रोत, Getty Images

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचव्यांदा देशातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. लॉकडाऊनमधून बाहेर पडताना येणाऱ्या आव्हानांविषयी यामध्ये चर्चा करण्यात आली.

भारतामध्ये 25 मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे आणि सगळ्याच राज्यांच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत. स्थलांतरित मजुरांच्या परतीचा प्रश्न, बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा रुळावर कसं आणायचं आणि राज्यांसाठीच्या आर्थिक मदतीचा प्रश्नही यात आहेच.

कोरोना व्हायरसचा संसर्ग कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यापर्यंत जाऊ नये म्हणूनही प्रयत्न करायला हवेत, असं आरोग्य मंत्रालयानेही म्हटलेलं आहे.

नकाशा

जगभरात आढळलेले रुग्ण

Group 4

संपूर्ण मजकूर नीट पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा

स्रोत : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग

आकडे - अंतिम अपडेट ५ जुलै, २०२२, १:२९ म.उ. IST

सध्याच्या घडीला भारतामधली कोरोना व्हायरसची प्रकरणं वाढत आहेत. पण त्याचवेळी लॉकडाऊनचे नियम शिथील करण्याची गरजही आता भासू लागलेली आहे. निर्बंधांमध्ये सवलत देण्यात आल्यानंतर ग्रामीण भागात कोव्हिड 19 पसरू नये याची खबरदारी घेणं हे सर्वांत मोठं आव्हान असणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच्या बैठकीत म्हटल्याचं वृत्त PTI वृत्तसंस्थेने दिलं आहे.

निर्बंधांमधल्या काही सवलतींची अंमलबजावणी आता सुरू होत आहे. मंगळवारपासून रेल्वे सेवा सुरू होत आहे. निवडक संख्येने हजेरी लावत कामावर परतण्याची परवानगीही यापूर्वीच देण्यात आली होती. येत्या काळात आणखी काही गोष्टींबाबत सवलत मिळेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जातेय.

कोरोना
लाईन

फक्त भारतच नाही, तर जगभरातले अनेक देश सध्या कोव्हिड 19 मुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडत आहेत, किंवा निर्बंध कसे उठवायचे यासाठीची आखणी करत आहेत.

काही देशांमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर संसर्गाचं प्रमाण पुन्हा वाढलेलं आहे. या देशांकडून धडे घेत भारताने आपल्याकडची स्थिती ढासळू नये, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलंय.

जगभरातल्या कोणत्या देशात लॉकडाऊन उठवल्यानंतर का घडलं, ते पाहूयात.

पाकिस्तान

भारताच्या या शेजारी देशामध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर तिथे कोरोनाची 10,000 नवीन प्रकरणं आढळली.

क्वेटामध्ये डॉक्टरांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, क्वेटामध्ये डॉक्टरांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे

पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनदरम्यान मशिदी उघडण्यात आल्या. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तान सरकारने डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत स्थानिक बाजार, शॉपिंग मॉल्स - विशेषतः कपड्यांची दुकानं, सोमवारपासून उघडायला परवानगी दिलेली आहे.

पाकिस्तानातल्या इतर प्रांतांमध्येही अशाच सवलती देण्यात आलेल्या आहेत. पण व्यापारी एका आठवड्यात फक्त चारच दिवस दुकानं उघडू शकतात आणि इतर दिवशी बाजार बंद राहील अशा स्वरूपाचे आदेश सिंध प्रांतात देण्यात आले आहेत.

दक्षिण कोरिया

कोरोनाच्या संसर्गाच्या काळामध्ये दक्षिण कोरियाने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, त्याचं जगभर कौतुक झालं आणि जगाने त्याकडे एक चांगलं मॉडेल म्हणून पाहिलं. यानंतर दक्षिण कोरियातले निर्बंध शिथील करायला सुरुवात करण्यात आली. पण यानंतर अचानक संसर्गाचं प्रमाण वाढू लागलं. राजधानी सोलमधल्या बार आणि क्लब्समध्ये गेलेल्या अनेक लोकांमध्ये कोरोनाचं संक्रमण आढळून आलेलं आहे.

दक्षिण कोरिया

फोटो स्रोत, Getty Images

सध्या सोलच्या महापौरांनी तिथले सगळे बार आणि क्लब्स पुढच्या सूचना येईपर्यंत बंद केले आहेत. सोलचे महापौर म्हणाले, "बेजबाबदारपणामुळे संक्रमण झपाट्याने पसरू शकतं."

कोरोनाच्या संसर्गाची वाढती प्रकरणं पाहात या संक्रमणाची दुसरी लाट येण्याबद्दलचा इशारा दक्षिण कोरियाने दिला आहे.

जर्मनी

लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आल्यानंतर इन्फेक्शनचं प्रमाण वाढल्याच्या बातम्या जर्मनीमधूनही आल्या. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लावण्यात आलेले निर्बंध उठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याबरोबर इथल्या संसर्गाच्या नवीन केसेस वाढू लागल्या.

अधिकृत आकडेवारीनुसार तिथला रिप्रॉडक्शन रेट म्हणजेच एखाद्या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याचा दर म्हणजे R0 वाढून एकापेक्षा जास्त झाला.

जर्मनीमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत

फोटो स्रोत, EPA

जर्मनीतली सगळी दुकानं काही दिवसांपूर्वी उघडण्यात आली होती. मुलं शाळेत परतली आणि जर्मनीतल्या सगळ्या महत्त्वाच्या फुटबॉल लीग्सही पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत.

निर्बंध वेगाने उठवण्यात यावेत यासाठी शनिवारी जर्मनीतल्या हजारो नागरिकांनी निदर्शनं केली. पण लॉकडाऊन शिथील केल्यानंतर संसर्गाची प्रकरणं वाढल्याने लोकांमधली काळजी आता वाढलेली आहे. गोष्टी पुन्हा हाताबाहेर जाऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात येतेय.

पण सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये वाढीचा दर पुन्हा एकदा कमी दिसतोय. नवीन रुग्णांचं निदान होण्यामध्ये उशीर होत असल्याने हे झालं असावं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यापूर्वीही वीकेंडच्या काळात जर्मनीतल्या आकडेवारीत असा बदल पहायला मिळाला होता. म्हणूनच जर्मनीतल्या संसर्गांचं प्रमाण सध्या कमी झाल्याचं आत्ता तरी म्हणता येणार नाही.

चीन

लागोपाठ दुसऱ्या दिवशी चीनमध्ये नवीन संसर्गांची संख्या दोन आकडी आहे. सोमवारी चीनमध्ये 17 नवीन रुग्ण आढळले. यापैकी 5 नवीन रुग्ण वुहानमध्ये आढळले. शिवाय आता उत्तर चीनमध्ये या संसर्गाचा उद्रेक होण्याबद्दल भीती व्यक्त केली जातेय.

तर चीनच्या ईशान्य भागामध्ये या विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याविषयीचा धोक्याचा इशारा चीनी अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. जिलीन प्रांतातलं एक शहर 'हाय रिस्क' असल्याचं सांगण्यात आलंय.

एकट्या वुहानची लोकसंख्या सुमारे एक कोटी दहा लाख आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकट्या वुहानची लोकसंख्या सुमारे एक कोटी दहा लाख आहे

वुहान शहरामध्ये रविवारी महिन्याभरानंतर नवीन रुग्ण आढळला. 89 वर्षांच्या या रुग्णाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यामध्ये यापूर्वी या रोगाची लक्षणं दिसली नसल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलंय. तर चीनच्या शुलान शहरामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आलाय.

भारताखेरीज इतर अनेक देश लॉकडाऊन उठवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. यामध्ये श्रीलंका आणि युरोपातल्या देशांचा समावेश आहे.

श्रीलंका

श्रीलंका सरकारनेही सोमवारपासून लॉकडाऊनमधले काही निर्बंध शिथील केले आहेत. आतापर्यंत तिथे 800 पेक्षा जास्त लोकांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला सरकारने दुजोरा दिलाय.

सर्व सरकारी आणि खासगी ऑफिसेस मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करायलाही सरकारने परवानगी दिलेली आहे.

स्पेन

स्पेनमध्ये कोव्हिड 19मुळे मरणाऱ्यांचं प्रमाण 15 मार्चनंतर कमी झालंय. इथे कडेकोट लॉकडाऊन लागू करण्यात आला होता आणि आता काही निर्बंध शिथील करण्याचा विचार करण्यात येतोय.

माद्रिद, स्पेन

फोटो स्रोत, REUTERS

पण माद्रिद आणि बार्सिलोना शहरात राहणाऱ्या नागरिकांवरचे निर्बंध शिथील केले जाणार नाहीत. ही दोन शहरं वगळता स्पेनच्या इतर शहरांमधले लोक मोकळ्या जागी असणारे बार आणि रेस्टॉरंट्समध्ये एकमेकांना भेटू शकतील.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्समध्ये प्रशासनानने रेस्टॉरंट्स, खेळाची मैदानं आणि आऊटडोअर पूल सुरू करायला शुक्रवारी परवानगी दिली. इथे मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात आल्या. आता इथल्या रुग्णांचं प्रमाण कमी होताना दिसतंय.

न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलंड या ऑस्ट्रेलियाच्या दोन मोठ्या राज्यांमध्ये मुलं सोमवारपासून शाळेत जाऊ लागली आहेत. या आठवड्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण देशातील लोक आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना भेटणं सुरू करू शकतील.

ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, Getty Images

पण सोमवारी लॉकडाऊन शिथील झाल्याबरोबर मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी बाहेर पडले. फिजीकल डिस्टंसिंगसाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचं पालन होताना दिसलं नाही. यामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची काळजी व्यक्त करण्यात येतेय.

युरोप

युरोपातले बहुतेक देश सध्या लॉकडाऊन शिथील करत आहेत. पण सोबतच संसर्गाची दुसरी लाट येऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येतेय. फ्रान्स आणि नेदरलँड्समध्ये प्राथमिक शाळा अंशतः उघडण्यात येतील.

युके

फोटो स्रोत, Getty Images

तर फ्रान्समध्ये अनेक आठवड्यांच्या कालावधीनंतर लोक सोमवारी कामावर परतू लागले आहेत. या आठवड्याच्या अखेरपासून डेन्मार्कमध्ये शॉपिंग सेंटर्स, तर पोलंडमध्ये हॉटेल्स सुरू होणार आहेत.

न्यूझीलंड

न्यूझीलंडमधले निर्बंध आता आणखी शिथील करण्यात येत आहेत. या देशात आता कोरोनाच्या फक्त 90 अॅक्टिव्ह केसेस आहेत. हा कोरोनावर जवळपास विजय असल्याचं मानलं जातंय.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन

म्हणूनच गुरुवारपासून रेस्टॉरंट्स, दुकानं आणि सिनेमा थिएटर्स सुरू करायला परवानगी देण्यात आलेली आहे. पण बार मात्र 21 मे पर्यंत बंद राहतील.

ब्रिटन

जे लोक घरून काम करू शकत नाहीत, म्हणजेच वर्क फ्रॉम होम करू शकत नाहीत, ते बाहेर जाऊ शकतात, असं ब्रिटनमध्ये सांगण्यात आलंय. कामाच्या सर्व ठिकाणी 'कोव्हिड 19 सिक्युअर' या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं लागेल. सोबतच लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरताना वा दुकानांमध्ये चेहरा झाकण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तीन टप्प्यांमध्ये इथले निर्बंध उठवण्यात येतील. पण विषाणू संसर्गाच्या परिस्थितीचा अंदाज घेत या टप्प्यांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असं सरकारने म्हटलंय. सोबतच संसर्गाचं प्रमाण वाढल्यास पुन्हा निर्बंध लावले जाऊ शकतात, असंही सांगण्यात आलेलं आहे.

स्कॉटलंड

पण काही देशांनी इतक्यात लॉकडाऊन संपुष्टात न आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्कॉटलंडच्या लोकांनी शक्य तितकं घरात रहावं असं स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला यांनी म्हटलंय.

आताच निर्बंध उठवणं घाईचं ठरेल असं त्यांनी म्हटलंय. कामासाठी प्रवास करणाऱ्यांना स्कॉटलंड आणि इंग्लंडदरम्यान प्रवासाची परवानगी असेल का, याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं, "तुम्ही स्कॉटलंडमध्ये असाल तर स्कॉटलंडमध्येच रहावं असा माझा सल्ला आहे. लोकांनी कारणाशिवाय प्रवास करू नये."

लॉकडाऊन

फोटो स्रोत, ANI

लॉकडाऊन नंतरचं आयुष्य

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या सक्त नियमांमधून आता अनेक देशांमध्ये सवलत दिली जातेय. पण लॉकडाऊननंतरच्या या आयुष्याविषयी लोकांच्या मनात भीती असल्याचं मानसिक आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. स्टीव्हन टेलर सांगतात, "लोकांसाठी हा तणावाचा काळ आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना सुरक्षित वाटत होतं. पण नंतर त्यांना अडचणी येतील कारण घराबाहेर पडायची त्यांना भीती वाटू शकते."

हेही नक्की वाचा -

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)