कोरोना व्हायरस : कोव्हिड -19 चा परिणाम महिला आणि पुरुषांवर वेगवेगळा का होतो?

फोटो स्रोत, Getty Images
इंग्लंडच्या पंतप्रधानांपासून धारावीतल्या मजुरापर्यंत कोणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एक गोष्ट सिद्ध झालीये की हा व्हायरस गरीब-श्रीमंत, उच्चशिक्षित-अर्धशिक्षित, शहर-ग्रामीण, जात-धर्म-पंथ या आधारावर भेदभाव करत नाही. पण लिंग गुणोत्तराचं काय? कोरोना व्हायरस स्त्री-पुरुषांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो का? आणि असं असेल तर का?
स्त्रिया आणि पुरुष यांच्यातला कोरोना संदर्भातला फरक फक्त कोण आजारी पडतं आणि कोण नाही इतकाच नाहीये तर याचा परिणाम त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि आर्थिक स्थैर्यावरही होतो.
मृत्यूदरातला फरक
कोरोना व्हायरसचा जेवढा अभ्यास केला गेलाय त्यातून ठळकपणे समोर आलेली एक गोष्ट म्हणजे या व्हायरसचा संसर्ग झालेल्या स्त्रिया आणि पुरुषांच्या मृत्यूदरातला फरक. अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलांच्या तुलनेत दुप्पट पुरुष मरण पावले आहेत, तर पश्चिम युरोपमध्ये 69 टक्के पुरुषांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांपैकी 76 टक्के पुरुष आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी 73 टक्के पुरुष आहेत.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

पण मग असं का होत असेल? महिलांना खरंच पुरुषांच्या तुलनेत कोरोनाचा कमी धोका आहे का?
X क्रोमाझोमची मदत?
कोरोना व्हायरसचा महिलांना कमी धोका का असावा याचं स्पष्टीकरण देताना एक थिअरी मांडली जातेय, ती अशी की महिलांमध्ये असणाऱ्या X क्रोमोझोममुळे त्यांना कोरोना फॅमिलीतल्या व्हायरसेचा धोका कमी होत असावा. मानवी डीएनएची रचना अशी आहे की स्त्रियांमध्ये XX हे क्रोमोझोम्स असतात तर पुरुषांमध्ये XY.
याच अधिकच्या X क्रोमोझोममुळे महिलांचा इम्युनिटी रिस्पॉन्स पुरुषांपेक्षा वेगळा असतो. त्यांना दिलेल्या लसी जास्त परिमाणकारक ठरतात तर त्यांना झालेल्या संसर्गात त्यांची प्रतिकारशक्ती अधिक आक्रमकपणे काम करतो.

फोटो स्रोत, Getty Images
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत रोगप्रतिकार शक्ती या विषयाचे प्राध्यापक असणारे फिलीप गोल्डर म्हणतात, "कोरोना व्हायरससारखे व्हायरस शरीरात शिरल्याची जाणीव ज्या प्रोटीन्सला होते, आणि जे मग मेंदूला याची सुचना देतात, ते प्रोटीन्स X क्रोमोझोममध्ये जास्त असतात. महिलांमध्ये या क्रोमोझोमची संख्या दुप्पट असल्याने या रोगांना अटकाव करण्यासाठी महिलांची रोगप्रतिकारशक्ती लवकर कार्यान्वित होते."
जीवनशैलीचाही परिणाम
स्त्रिया आणि पुरुष यांना कोव्हिड -19 चा धोका कमी- अधिक प्रमाणात असल्याचं एक कारण त्यांची जीवनशैली असल्याचंही म्हटलं जातं. उदाहरणार्थ महिलांमध्ये पुरुषांपेक्षा ध्रूमपानाचं प्रमाण खूप कमी असतं. "त्यामुळे व्यसनाधीनतेमुळे कॅन्सर, श्वसनसंस्थेचे आजार किंवा हृदयरोग यांचा धोका वाढतो, ती शक्यता महिलांच्या बाबतीत नसते. तेच कारण कोरोना व्हायरसला लागू पडतं," गोल्डर नमूद करतात. WHO च्या आकडेवारीनुसार भारतात ध्रूमपान करणाऱ्या एकूण लोकांपैकी 70 टक्के पुरुष आहेत. चीनमध्ये 50 टक्के पुरुष धुम्रपान करतात तर धुम्रपान करणाऱ्या स्त्रियांची संख्या आहे फक्त 5 टक्के.
आर्थिक आघाडीवर महिलांचा बळी जाणार?
महिलांना कोव्हिड -19 आजाराचा पुरुषांच्या तुलनेत कमी धोका असला तरी त्यामुळे घडणाऱ्या इतर गोष्टींना त्या नक्कीच बळी पडणार आहेत. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक आघाडी.
मिशेल टेरटिल्ट या जर्मनीतल्या माईनहाईन युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्रज्ञ आहेत. सध्या त्या कोरोनाचं जागतिक संकट महिला आणि पुरुषांवर आर्थिकदृष्ट्या काय परिणाम करतंय यावर अभ्यास करत आहेत. त्यांच्यामते येत्या काही महिन्यात कोट्यवधी लोक बेरोजगार होणार आहेत आणि याचा महिलांवर जास्त परिणाम होणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"एरवी मंदीचा फटका महिलांपेक्षा पुरुषांना जास्त बसतो कारण पुरुष बांधकाम, मॅन्युफॅक्चरिंग अशा अर्थव्यवस्थेला तोलणाऱ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करत असतात. मंदीच्या फटक्यात पहिल्यांदा या इंडस्ट्रीजवर गदा येते. महिला मात्र शेती, शिक्षण, आरोग्य, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रात काम करत असतात त्यामुळे त्यांना झळ कमी बसते. पण कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका याच व्यवसायांना जास्त बसतोय, त्यामुळे महिलांची नोकरी जाण्याची शक्यता जास्त आहे," त्या म्हणतात.
याचा सरळ सरळ परिणाम जेंडर पे गॅपवर होणार आहे. म्हणजे आजही महिलांना समान कामासाठी पुरुषांपेक्षा कमी पगार मिळतो. म्हणजे आपल्या जीवनावश्यक गोष्टींवर त्या कमी खर्च करतात. अमेरिकेत पुरुष 1 रुपया कमवत असेल तर महिलेला 82 पैसे मिळतात, ऑस्ट्रेलियात 86 पैसे तर भारतात फक्त 75 पैसै.
साथीचे रोग आणि असमानता
क्लेअर वेनहॅम लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये प्राध्यापिका आहेत. त्या म्हणतात, "प्रत्येक साथीच्या रोगाचा लैंगिक असमानता वाढवण्यामध्ये हातभार आहे. फक्त याचा कधी अभ्यास केला गेला नव्हता आणि राजकारणी किंवा प्रशासकिय यंत्रणांना याची खबरबात नव्हती."
वेनहॅम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी झिका आणि इबोला व्हायरसेसनी महिलांवर काय परिणाम केला याचा अभ्यास केला आहे आणि आता त्या कोव्हिड - 19 चा अभ्यास करत आहेत.
जेव्हा आफिक्रा खंडात इबोला व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता तेव्हा सिएरा लिओन देशात माता मृत्यूदर प्रचंड वाढला होता. याचं कारण होतं की व्हायरसचा सामना करताना महिलांना मिळाणाऱ्या आरोग्यसेवेत लक्षणीय घट झाली होती.
"कोणत्याही साथीच्या रोगाच्या काळात गरोदर महिलांना योग्य त्या आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत असं WHO म्हणत असलं तरी प्रत्यक्षात तसं घडतंच असं नाही. त्याच बरोबरीने महिलांना मिळणारे सुरक्षित गर्भपाताचे हक्क, गर्भनिरोधकं यांच्यातही घट होते, ज्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो," वेनहॅम म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिड-19 मुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे घरगुती हिंसाचार आणि बाललैंगिक शोषण वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. एकट्या भारतात राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. घरात अडकलेल्या महिलांना घरगुती हिंसाचार आणि काहीवेळा लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. जगभरात हीच परिस्थिती आहे.
फ्रान्समध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटना जवळपास 33 टक्क्यांनी वाढल्यात, ऑस्ट्रेलियात 75 टक्क्यांनी वाढल्यात. तर अमेरिकेत या घटना दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे. एबोलाच्या प्रादुर्भात आफ्रिकेतही घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या होत्या.
आशेचा किरण
सामाजिक पातळीवर कोव्हिड-19 मुळे महिलांना अनेक त्रास सहन करावे लागतील असं चित्र जरी असलं तरी काळ्या ढगाला रुपेरी किनार नक्कीच आहे.
टेरटिल्ट म्हणतात, "आता जगातले हजारो बिझनेस वर्क फ्रॉम होमच्या वेगवेगळ्या सिस्टिम्स स्वीकारत आहेत. येत्या काळात या व्यवस्था काम करण्याचं मुख्य साधन बनतील. यामुळे महिलांना घर आणि काम यांच्यात समतोल साधणं शक्य होईल. मुलांकडे लक्ष देण्यासाठी हजारो महिला आपली नोकरी सोडतात. पण जर त्यांना घरातून काम करणं शक्य झालं तर त्यांना आपल्या करिअरचा बळी द्यावा लागणार नाही."
दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे पुरुषांनी घरकामाच्या जबाबदाऱ्या उचलणं. टेरटिल्ट यांच्या अभ्यासावरून लक्षात येतंय की भिन्नलिंगी जोडप्यांमध्ये 8 ते 10 टक्के जोडपी अशी आहेत ज्यांच्या नवरा-बायकोच्या जुन्या भूमिकांमध्ये बदल झालाय.
"उदाहरणार्थ बायको आरोग्य क्षेत्रात काम करते तर नवरा आयटीमध्ये. अशात नवऱ्याला घरात राहून काम करणं शक्य आहे पण बायकोला नाही. त्यामुळे बायको आता दिवसरात्र बाहेर राहून काम करतेय तर नवरा घरात राहून घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडतोय आणि मुलांकडे लक्ष देतोय."
आणि लॉकडाऊनमध्ये सतत घरात असणाऱ्या पुरुषांनाही घरकामाचं महत्त्व कळतंय. समानतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे.
कोरोना व्हायरसने सध्या जगात धुमाकूळ घातला आहे. व्हायरस भेदभाव करत नाही हे खरं असलं तरी या व्हायरसच्या प्रकोपाने जास्त वय असणारे पुरुष मृत्यूमुखी पडण्याचा धोका आहे तर महिला, ज्या आजारातून कदाचित बऱ्या होतील, पण इतर गोष्टींनी पीडित ठरण्याचा धोका आहे. अशात अशात देश, सरकारं आणि समाज सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे की दोन्ही घटकांना सुरक्षित ठेवावं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








