कोरोना व्हायरस : भीतीचा फायदा घेऊन हॅकर्सची कॉम्प्युटरमध्ये घुसखोरी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जो टिडी
- Role, सायबर सिक्युरिटी रिपोर्टर, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
कोरोना व्हायरसचा जगभर पसरत चालल्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. हॅकर्स या भीतीचा फायदा कॉम्प्युटर व्हायरस पसरवण्यासाठी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार सुरु झाल्यापासून सायबर सिक्युरिटी संस्थांकडे आलेल्या अहवालाची माहिती बीबीसीने मिळवली. यामध्ये ईमेल फिशिंग स्कॅमची शेकडो उदाहरणं समोर आली आहेत.
म्हणजेच कोरोनाचा उगम झाल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
हॅकर्स नेटकऱ्यांना फसवण्यासाठी फिशिंग स्कॅम करण्याच्या बातम्या नव्या नाहीत. पण कोरोनो व्हायरसशी संबंधित लिंकवरून सायबर हल्ला करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढल्याचं सायबर तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सायबर हल्लेखोर प्रामुख्याने इंग्रजी, फ्रेंच, इटालियन, जापनीज आणि टर्कीश भाषेचा उपयोग करुन लोकांना ठगवत आहेत.


हे असे मेल जगभरात कुठे-कुठे पाठवत आहेत, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पण त्यांना ओळखण्यासाठी तुम्हाला ही बातमी उपयोगी ठरेल.
कोरोना व्हायरसवरच्या उपचारांसाठी क्लिक करा
कुतुहलापोटी किंवा माहिती घेण्यासाठी प्रामाणिकपणे केलेल्या एका क्लिकने याची सुरुवात होते.
प्रुफप्रिंट या संशोधक कंपनीतील संशोधकांना फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अशा प्रकारचे काही मेल आढळून आले. हा मेल एका अज्ञात डॉक्टरकडून आलेला होता. कोरोना व्हायरसवरची लस उपलब्ध झाली आहे, असा दावा करणाऱ्या या मेलमध्ये चीन आणि युके सरकारचाही उल्लेख करण्यात आलेला होता.

फोटो स्रोत, Proofpoint
सुरुवातीला हे पाहून कुणालाही त्यावर क्लिक करावं वाटेल. पण या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर हल्लेखोर त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती विचारतात. एकदा का तुमची माहिती यात भरली की तुमची वैयक्तिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. यानंतर त्यांना तुमच्या अकाऊंटचा संपूर्ण अॅक्सेस मिळतो. ते त्याचा वापर कशासाठीही करु शकतात.
एकाचवेळी 2 लाख लोकांना अशा प्रकारचे मेल पाठवण्यात येत आहेत. प्रुफप्रिंटचे संशोधक शेरोड डेग्रिपो सांगतात, "गेल्या एक महिन्यापासून कोरोनाव्हायरसच्या भीतीचा वापर करुन लोकांना ठगवण्यासाठीचे मेल पाठवण्यात येत आहेत. सध्या याप्रकारचे मेल पाठवण्याची संख्याही वाढली आहे. याचा अर्थ यामधून त्यांना आर्थिक फायदा मिळाला आहे."
अशा लिंक्स ओळखण्यासाठी तुम्ही त्या लिंकवर एकदा माऊसचं कर्सर फिरवा. त्यानंतर यूआरएल लेबल दिसेल. जर लेबलवरून लिंक संशयास्पद वाटली तर अजिबात क्लिक करू नका.
WHOच्या नावाचा वापर
कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर काही दिवसांपासूनच हॅकर्स जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाचा वापर करत आहेत, हे सांगितल्यास आश्चर्याचा धक्का बसेल.

फोटो स्रोत, Proofpoint
पण हॅकर्सच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, या लिंकवर क्लिक केल्यानंतर आरोग्यविषयक माहिती तर मिळत नाही. पण तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एजंटटेस्ला की-लॉगर या नावाचा एक गूढ सॉफ्टवेअर प्रवेश करतो.
हा एकदा इंस्टॉल झाला की आपल्या कॉम्प्युटरमधली माहिती या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅकर्सपर्यंत पोहोचते. यामुळे तुमच्या ऑनलाईन खात्यांचे पासवर्ड आणि माहिती हॅकर्सना कळण्याची शक्यता आहे.
हे टाळण्यासाठी WHOच्या नावाने येत असलेल्या मेलकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला माहिती हवीच असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटला स्वतः भेट द्या. त्याशिवाय त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरूनही तुम्हाला माहिती घेता येईल.
लक्षवेधी वाक्यरचना आणि दहशत
कोरोना व्हायरसबाबत लोकांच्या मनातली भीती लक्षात घेऊन याचा वापर करण्यासाठी हॅकर्सनी युक्ती वापरण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना तुमच्या घरापर्यंत पोहोचला, कोरोनामुळे इतके लोक मृत्यूमुखी अशा प्रकारचं लक्षवेधी हेडींग देऊन तुम्हाला मेल पाठवण्यात येईल.

फोटो स्रोत, Cofense
हा मेल कोरोना नियंत्रण विभागाकडून पाठवण्यात आल्याचंही सांगितलं जाईल. पण अशा प्रकारच्या मेलपासून दूर राहिलेलंच बरं. हे फक्त कोरोनाबाबत दहशत पसरवण्यासाठी करण्यात येत आहे.
याचा वापर करून तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याची ही योजना आहे, हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे.
भावनिकतेचा वापर
WHOच्या नावानेच मेल करून तुम्हाला मदत करण्याचं आवाहन करण्यात येईल. भावनिक होऊन तुम्ही मदत करण्यासाठी तुमच्या खात्याचा तपशील द्याल.

फोटो स्रोत, Kaspersky
पण असं करण्यापूर्वी विचार करा. कारण आपल्या खात्याची माहिती घेऊन ठगवण्याचा हासुद्धा एक मार्ग आहे.
कॅस्परस्काय या अँटीव्हायरस तयार करणाऱ्या कंपनीने याबाबत माहिती दिली. हॅकर्सनी कोरोना नियंत्रण समितीच्या नावाने एक फेक वेबसाईट बनवली आहे. तुमची मदत स्वीकारून ते बिटकॉईन बनवू शकतात.
हॅकर्समार्फत पाठवण्यात येणारे मेल हे खरेखुरे असल्याचं तुम्हाला वाटू शकतं. पण अशा लिंकवर क्लिक करून जाळ्यात अडकण्यापेक्षा यांच्यापासून दूर राहिलेलं बरं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








