कोरोना व्हायरस : अमेरिकेत युरोपीय प्रवाशांना बंदी, तर भारताकडूनही व्हिसा रद्द

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना व्हायरसला आता 'जागतिक आरोग्य संकट' (Pandemic) म्हणून घोषित केलं आहेत. तर भारत सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून 15 एप्रिलपर्यंत सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आतापर्यंत 60 लोकांना याची लागण झाली आहे.

अमेरिकेत युरोपिय प्रवाशांना बंदी

अमेरिकेनं युरोपातून येणाऱ्या प्रवाशांवर 30 दिवसांची बंदी घातली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ही घोषणा केली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही घोषणा लागू होणार आहे.

राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात ट्रंप यांनी ही घोषणा केली आहे. "कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मी सर्व प्रकारच्या यंत्रणांचा वापर करण्यासाठी तयार आहे," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

"कोरोना व्हायरस हा सर्वांचा समान शत्रू आहे. संपूर्ण जगाचा शत्रू आहे. सुरक्षित पद्धतीने आपल्याला त्याला लवकरात लवकर हारवावं लागेल. अमेरिकी लोकांची सुरक्षा आणि त्यांच्या जीवनापेक्षा मला काहीच महत्त्वाचं नाही," असं सुद्धा त्यांनी ट्वीट केलं आहे.

अमेरिकेत आतापर्यंत 1135 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारताकडून व्हिसा रद्द

आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत देशातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत 15 एप्रिलपर्यंत राजनैतिक, सरकारी, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था तसंच रोजगार आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून इतर सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसंच ओसीआय कार्डधारकांचा व्हिसा फ्रि प्रवेशही 15 एप्रिलपर्यंत रोखण्यात आला आहे.

सर्व विमानतळं आणि बंदरांवर 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू होणार आहे.

भारतात येण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी आता त्यांच्या देशात असलेल्या भारतीय दुतावासाशी संपर्क करावा असं सरकारचं जाहीर केलं आहे.

15 फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून भारतात आलेल्या सर्व प्रवाशांना 14 दिवसांसाठी विलग केलं जाणार आहे. या देशांमध्ये फिरायला गेलेल्या भारतीय नागरिकांचाही त्यामध्ये समावेश असेल.

गरजेचं असेल तरच भारतात परत या किंवा भारताबाहेर प्रवास करा असे निर्देशही देण्यात आले आहेत.

पण महत्त्वाची कामं असलेल्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना तपासणी केल्यानंतर विदेशात जाऊ दिलं जाईल, पण परत आल्यानंतर मात्र त्यांना विलग केलं जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरस आता जागतिक आरोग्य संकट

बुधवारी कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेनं 'जागतिक आरोग्य संकट' (Pandemic) म्हणून घोषित केलं आहे.

कोरोना व्हायरससारखी महामारी आम्ही आतापर्यंत पाहिलेली नाही. अशा प्रकारची नियंत्रणात न येणारी महामारी पाहिली नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

आतापर्यंत जगातल्या 114 देशांमध्ये या महामारीचा फैलाव झाला आहे. ज्यातले 90 टक्के रुग्ण 4 देशांमधले आहेत. त्यात चीन आणि कोरियाचा समावेश आहे.

जगभरात आतापर्यंत 1,18,000 जणांचा याची लागण झाली आहे. तर 4291 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)