कच्च्या तेलाच्या किमती पडल्या, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला

तेल उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये 'किंमत युद्ध' (Price War) सुरू झालंय. परिणामी सोमवारी सकाळी आशियाई बाजारपेठेत क्रूड तेलाच्या किंमती सुमारे 30% पडल्या. मुंबई शेअर बाजारातही मोठी पडझड झाल्याचे आज दिसून आले. सेन्सेक्स सकाळीच 2400 अंकांनी कोसळला.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी सौदी अरेबियाने रशियाला उत्पादन घटवण्याचा प्रस्ताव दिला होता. पण रशिया त्यासाठी राजी झाला नाही. त्यानंतर सौदी अरेबियाने शनिवार - रविवारी आपल्या कच्च्या तेलाच्या किंमतीत घट केली. याचा परिणाम भारतावरही जाणवला आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण, YES बॅंक प्रकरण आणि कोरोना व्हायरस या तीन गोष्टींमुळे भारतीय शेअर बाजारही घसरला आहे.

ओपेक गटातले तेल उत्पादक देश आणि रशिया यांनी यापूर्वी कच्च्या तेलाच्या उत्पादनाबाबत एकत्र निर्णय घेतले होते.

सोमवारी ब्रेंट तेलाच्या किंमती प्रति बॅरल 31.02 डॉलर्सवर आल्या आहेत.

शुक्रवारी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली ओपेकच्या 14 सदस्यांनी ओपेकचा भाग नसणाऱ्या रशिया आणि इतर देशांची भेट घेतली.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातून कच्च्या तेलाची मागणी कमी झालेली आहे, याला तोंड कसं द्यायचं यासाठी ही बैठक होती.

कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याबाबत यामध्ये चर्चा झाली. दररोजचं 15 लाख बॅरल्सचं उत्पादन कमी करण्याचा प्रस्ताव होता. पण उत्पादन कमी करायला रशिया राजी झाला नाही.

शुक्रवारपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत 30 टक्के घट झालीय. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 50 डॉलर्सवर आल्या होत्या. आशियाई बाजारपेठेत सोमवारीदेखील ही घसरण सुरूच राहिली.

आशियातले चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि भारत हे देश तेलाचे सर्वांत मोठे आयातदार आहेत.

सध्याच्या घडीला कच्च्या तेलाचं उत्पादन जास्त आहे आणि मागणी कमी. यामुळेच आता ओपेकमधले देश मार्केटचा जास्त हिस्सा काबीज करण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता मॉर्गन स्टॅनलीचे ऑईल अॅनालिस्ट मार्टिन रॅट्स सांगतात.

यापूर्वी जानेवारी 2016मध्ये तेलाच्या किंमती या पातळीला आलेल्या आहेत. 16 वर्षांतली ही सर्वांत खालची पातळी आहे.

ओपेक आणि रशियामधल्या उत्पादनाविषयीच्या वादामुळे बाजारपेठ चकित झाल्याचं वाँडा इनसाईट्च्या तज्ज्ञ वंदना हरी सांगतात. गेल्या वर्षी अमेरिकेने या देशांवर मात करत कच्च्या तेलाचा उत्पादक म्हणून आघाडी घेतली होती.

"ओपेकमध्ये असणाऱ्या आणि नसणाऱ्या देशांमधली चर्चा निष्फळ होणं हा तेलाच्या बाजारपेठेसाठी धक्का आहे. यामुळे या क्षेत्रासमोरची आव्हानं वाढणार आहेत. पण पुढे आणखी काय वाढून ठेवलंय, हे सांगणं अजून कठीण आहे," हरी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

मुंबई शेअर बाजारातही घसरण

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीमुळे आज सकाळपासून आशियातल्या शेअर बाजारांत मोठी घसरण झालीय.

मुंबई शेअर बाजारात ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच सेंसेक्स 1000 पॉइंट्सपेक्षा जास्त घसरला.

तर निफ्टीतही 400 पेक्षा जास्त अंकाची घसरण झाली.

कच्च्या तेलाच्या किंमतींसोबतच येस बँकच्या अडचणीत येण्याचा परिणाम शेअर बाजारावर पहायला मिळतोय.

शिवाय कोरोना व्हायरसच्या जागतिक अर्थव्यवस्थेवरच्या परिणामांची चिंताही गुंतवणूकदारांना आहे.

सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट केल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव जवळपास 30 टक्क्यांनी घसरले आहेत.

परिणामी आठवड्याच्या ट्रेडिंगला सुरुवात झाल्याबरोबर जपानचा निक्केई 225 इंडेक्स 6.1% कोसळला तर ऑस्ट्रेलियाच्या ASX 200 मध्येही ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच 6% घसरण झाली.

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्शची मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

चीनच्या शांघाय कॉम्पोझिट इंडेक्सची 2% घसरण झाली तर हाँगकाँगचा हँगसेंगही ट्रेडिंगच्या सुरुवातीला 3.7% घसरलेला होता.

गेल्या आठवड्यातही जागतिक शेअरबाजारात घसरण झाली होती.

कोरोना व्हायरसचा जगभरातला संसर्ग वाढलेला आहे आणि याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती गुंतवणूकदारांना आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्याने दुसरीकडे सोन्याच्या किंमतींत वाढ झालेली आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती 7 टक्क्यांनी वाढल्याचं Moneycontrol ने म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)