कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर मृत्यूचा धोका किती आणि कुणाला?

कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रॉबर्ट कफ
    • Role, सांख्यिकी विभागप्रमुख

कोरोना व्हायरसच्या 1000 प्रकरणांमागे 5 ते 40 जणांचे मृत्यू होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.

सर्वात जवळ जाणारी आकडेवारी आहे 1000 प्रकरणांमागे 9 मृत्यू. म्हणजे जवळपास 1%.

कोरोना व्हायरसचा तुम्हाला किती धोका आहे हे तुमचं वय, लिंग, एकूण आरोग्य आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरातलं आरोग्य या सगळ्यावर अवलंबून आहे.

मृत्यूच्या प्रमाणाचा अंदाज बांधणं किती कठीण?

हे करणं अतिशय कठीण आहे. कारण कोरोना व्हायरसची प्रकरणं मोजणंच काहीसं कठीण आहे.

बहुतेक विषाणूंच्या बाधांची बहुतांश प्रकरणं नोंदवली जातच नाहीत कारण ज्यांच्यामध्ये या संसर्गांची हलकी लक्षणं आहेत, असे लोक डॉक्टरकडे जातातच असं नाही.

विषाणूचे प्रकार वेगवेगळे असल्याने जगभरामध्ये होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वेगवेगळं आहे अशातली बाब नाही.

इम्पिरियल कॉलेजने केलेल्या संशोधनानुसार विविध देशांची सौम्य लक्षणं आढळणारे, मोजदाद करायला कठीण असणारे रुग्ण शोधायची क्षमता वेगवेगळी आहे.

म्हणूनच लागण झालेल्या रुग्णांचं एकूण प्रमाण कमी मोजलं जातं. आणि मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं चित्र उभं राहातं.

एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी वा त्यामुळे मृत्यू होण्यासाठी काही कालावधी लागतो.

कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जपानमधल्या डायमंड प्रिन्स जहाजावर 621 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.

ज्या केसेस आता सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, ज्यांना हा कालावधी मिळू शकलेला नाही अशी सगळी प्रकरणं आपण मोजली तर मृत्यूचं प्रमाण कमी येईल. कारण काही प्रकरणांमध्ये मृत्यू हा काही कालावधीनंतर होईल.

म्हणूनच मृत्यूदर ठरवण्यासाठी वैज्ञानिकांनी अशा प्रत्येक प्रश्नाबद्दलचे अगदी लहानसहान पुरावेही जुळवून पाहिले.

उदाहरणार्थ परदेशांतून लोकांना स्वदेशी घेऊन परतणाऱ्या विमानांमधील अशी लोकं ज्यांच्यात प्रादुर्भावाची सौम्य लक्षणं दिसत आहेत आणि ज्यांच्यावर कडक नजर ठेवली जातेय, अशा गटाची संख्या आणि त्यातून उद्भवणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण.

अशा लहान बारकाव्यांमधून मिळणारी उत्तर काही प्रमाणात वेगळी असली तरी एकूण परिस्थितीचा विचार करता यामुळे खूप मोठा फरक पडतो.

म्हणजे जर फक्त हुबेई प्रांतातली आकडेवारी पाहिली तर इथला मृत्यूदर हा चीनमध्ये इतरत्र आढळणाऱ्या मृत्यूदरापेक्षा बराच जास्त आहे.

अशी आकडेवारी वापरली तर एकूणच मृत्यूदर फार जास्त असल्याचं चित्र निर्माण होईल.

म्हणूनच वैज्ञानिक मृत्यूदराची रेंज - किमान आणि कमाल प्रमाण देतात. शिवाय सोबत सर्वात जवळ जाणारा अंदाज (Best current estimate)ही देतात.

माझ्यासारख्या लोकांना किती धोका?

कोरोना व्हायरसची लागण झाल्यास काही लोकांना मृत्यूचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. हे लोक आहेत - ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि कदाचित पुरुष.

चीनमध्ये 44,000 प्रकरणांच्या पहिल्या मोठ्या पाहणीनुसार मध्यमवयीन रुग्णांपेक्षा वयाने अतिशय ज्येष्ठ रुग्णांच्या मृत्यूंचं प्रमाण 10 पट जास्त होतं.

30 पेक्षा कमी वय असणाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वात कमी होतं. अशा एकूण 4500 प्रकरणांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला.

कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना इंग्लंडमध्ये स्पेशालिस्ट सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. 1

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू होण्याचं प्रमाण हे पाचपटीने जास्त आहे.

शिवाय महिलांच्या तुलनेत पुरुष रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण काहीसं जास्त आहे.

या सगळ्या बाबींचा एकमेकांशी संबंध आहे आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीला किती धोका आहे, हे सांगणं शक्य नाही.

मी जिथे राहतो तिथल्या लोकांना किती धोका आहे?

चीनमध्ये राहणाऱ्या 80 वर्षांच्या पुरुषांच्या गटाला असणारा धोका हा त्याच वयातल्या युरोप वा आफ्रिकेतल्या ज्येष्ठ पुरुषांना असणाऱ्या धोक्यापेक्षा वेगळे असतील.

तुम्हाला मिळणाऱ्या उपचारांवरही अनेक गोष्टी अवलंबून असतील.

गोष्टींची उपलब्धता आणि रोगाच्या उद्रेकाचं प्रमाण यावर हा धोका अवलंबून असेल.

जर मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला तर मोठ्या प्रमाणावर रुग्ण आरोग्ययंत्रणेकडे धाव घेतील. आणि कदाचित त्या भागात फक्त काही ठराविकच अतिदक्षता विभाग (ICU) वा व्हेंटिलेटर्स उपलब्ध असण्याची शक्यता असू शकते.

फ्लूपेक्षा हा कोरोना व्हायरस जास्त धोकादायक आहे का?

'फ्लू'ची सौम्य लक्षणं असणाऱ्या व्यक्ती अनेकदा डॉक्टरकडे जातच नाहीत.

परिणामी फ्लूची किंवा इतर कोणत्याही नवीन व्हायरसची जगभरातली एकूण प्रकरणं किती हे आपल्याला माहिती नाही.

म्हणून मग फ्लू आणि कोरोना व्हायरसची तुलना करणं शक्य नाही.

कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यास त्याचा सर्वात जास्त धोका कोणाला याविषयी माहिती वैज्ञानिकांना जसजसा कालावधी उलटेल तशी मिळू शकेल.

याविषयी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO ने दिलेला प्राथमिक सल्ला असा - श्वसनाद्वारे लागण होऊ शकणाऱ्या विषाणूंपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे वारंवार हात धुणं, खोकणाऱ्या आणि शिंकणाऱ्या लोकांपासून लांब राहणं आणि नाक, तोंड आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करणं टाळणं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)