कोरोना व्हायरसः जयपूरमध्ये सापडला आणखी एक रुग्ण

फोटो स्रोत, EPA
राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 या रोगाचा पहिला रुग्ण सोमवारी आढळून आला आहे. त्यानंतर आज दिल्लीजवळील नोएडामधील दोन खासगी शाळा काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. तर जयपूरमध्येही कोरोना व्हायरसची लागण झालेला एक रुग्ण सापडला आहे.
याआधीच कोव्हिड-19 झालेल्या एका इटालियन नागरिकाच्या पत्नीस कोव्हिड-19 झाल्याचं दिसून आलं. पीआयबीने याची माहिती ट्वीटरवर दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मंगळवारी नोएडातील दोन शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना इ-मेल आणि व्हॉट्सअॅप संदेश पाठवून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवत असल्याचे कळवण्यात आले.
ज्या व्यक्तीला काल कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले त्याची मुले या नोएडाच्या शाळेत शिकतात. परदेशातून आल्यावर त्या व्यक्तीच्या घरी पार्टी झाली होती. त्या पार्टीमध्ये पाच कुटुंबं आणि दहा मुलं सहभागी झाली होती. त्यानंतर त्याचा मुलगा शाळेतही गेला होता. पार्टीनंतर त्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इतर पालकांमध्ये घबराट पसरली.
कोरोना दुसरा रुग्ण तेलंगणामध्ये आढळला आहे. दिल्लीत आढळलेला रुग्ण इटलीहून प्रवास करुन आल्याचं कळतंय. तर तेलंगणातील रुग्ण दुबईहून आला आहे. या दोन्ही रुग्णांच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती घेण्यात येत आहे. यापूर्वी केरळमध्येही कोरोनाचे तीन रुग्ण सापडले होते.
दोन्ही रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे आता अंटार्क्टिका वगळल्यास जगातल्या सर्वच खंडात आता कोरोना व्हायरस पसरलाय. चीनमध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आणि आता चीनबाहेरही अत्यंत वेगानं तो पसरतोय.
जगभरात कोरोना व्हायरस पसरत असताना मोठ्या शहरांची चिंता वाढणं सहाजिक आहे. याचं कारण या शहरांमध्ये लोक केवळ मोठ्या संख्येत राहत नाहीत, तर नोकरीनिमित्त शहरभर फिरत असतात, शहरात लोकांची वर्दळ असते.
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली आव्हानं आपण पाहूया आणि जगातल्या काही शहरांनी या आव्हानांना तोंड कसं दिलंय, तेही पाहूया.
सार्वजनिक वाहतूक
खरंतर कुठल्याही विषाणूचा प्रसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून सर्वाधिक होऊ शकतो. कारण ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी कुणी खोकतो किंवा शिंकतो, त्यावेळी थुंकीचे कण बाहेर उडतात आणि त्यातून विषाणूचा प्रसार होतो.

फोटो स्रोत, AFP
कुठल्याही फ्लूची साथ पसरल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून तिचा सहापट प्रसार होऊ शकतो, असं फ्लूच्या अभ्यासातून समोर आलंय.
त्यामुळेच दक्षिण कोरियापासून ते इटलीपर्यंत आणि इराणसह बहुतेक देशांच्या स्थानिक प्रशासनानं रेल्वेगाड्या, बसेस आणि स्थानकं यांची साफसफाई करण्याचे आदेश दिलेत.
गर्दी
खेळांचे सामने किंवा तत्सम गर्दीच्या कार्यक्रमांमधून संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता अधिक असते. विशेषत: कोरोना व्हायरससारख्या विषाणूंबाबत तर अधिकच भीती असते. हेच लक्षात घेऊन शांघायमध्ये आयोजित करण्यात आलेली फॉर्म्युला वन ग्रँड प्रिक्स पुढे ढकलण्यात आली.
सहावी एशियन चॅम्पियन्स लीगसुद्धा पुढे ढकलण्यात आलीय. यामुळे इराणच्या चार संघांना फटका बसलाय.
युरोपमध्येही काही वेगळी स्थिती नाहीय. इटालीयन संघांचा सहभाग असणारे रग्बी आणि फुटबॉलचे सामने स्थगित करण्यात आलेत.

फोटो स्रोत, AFP
क्रीडा क्षेत्राचा विचार करता, कोरोनामुळे सर्वात मोठी भीती टोकियो ऑलिंपिकला आहे. टोकियो ऑलिंपिक 24 जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रसार पाहता ऑलिंपिकवर टांगती तलवारच आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं आतापर्यंत केवळ मशाल माघारी बोलावली आहे, मात्र कोरोना व्हायरसचा प्रसार असाच सुरू राहिल्यास, ऑलिंपिक रद्द करण्यास नकार दिलेला नाहीय.
केवळ क्रीडच नव्हे, तर धार्मिक कार्यक्रमांवर सुद्धा बंधन आलीत. सौदी अरेबियानं मक्का-मदिना इथं येणाऱ्या परदेशी भाविकांना येण्यास मनाई केलीय.
शाळा
कोरोना व्हायरसचा सामना कसा करायचा, याबाबतचं नियोजन तयार ठेवण्याचं जगातील अनेक सरकारांनी त्यांच्या देशांमधील शाळांना सांगितलंय.
जपान, थायलंड, इराण आणि इराक यांसारख्या देशांमध्ये तर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांसाठी शाळा-महाविद्यालयं बंदच ठेवण्यात आली आहेत.

फोटो स्रोत, AFP
यूके आणि अमेरिकेनं शाळा-महाविद्यालयं बंद ठेवली नाहीत. पण इंग्लंडमधील चार शाळा स्वच्छ करण्यात आल्यात. कारण या शाळांमधील काही विद्यार्थी इटलीत सहलीला गेले होते.
ज्या विद्यार्थ्यांचे पालक इराण, चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि उत्तर इटली या देशांमध्ये जाऊन आलेत, अशा विद्यार्थ्यांना शाळेत न येता घरातच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कार्यालयं
जगातल्या काही महत्त्वाच्या टेक हबमधील व्यावसायांना कोरोना व्हायरसचा मोठा फटका बसलाय.
सॅन डिएगो आणि सॅन फ्रान्सिस्को या दोन्ही ठिकाणी सार्वजनिक आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. इथल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलंय की, कंपनीला भेट देणाऱ्या कुणालाही हात मिळवू नका.

फोटो स्रोत, Reuters
फेसबुकनं मार्चमधील नियोजित वार्षिक मार्केटिंग कॉन्फरन्स रद्द केलीय. तर दुसीरकडे, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होऊ घातलेल्या जगातील सर्वांत मोठ्या सायबर सिक्युरिटी कॉन्फरन्समधून प्रायोजकांनी काढता पाय घेतलाय.
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नं कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास मार्गदर्शक नियमावलीच काढलीय. टेलिवर्क, वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीनं काम करण्यास सुचवलंय.
जनजागृती
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी काय काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, हात कसे धुतले पाहिजेत इत्यादी गोष्टी कोरोना व्हायरसच्या प्रसाराला रोखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असं अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Reuters
जागतिक आरोग्य संघटने (WHO) नं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही गोष्टी सांगितल्यात, ज्या प्रत्येकानं केल्या पाहिजेत :
- हात नियमित स्वच्छ धुवावेत.
- खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकावं.
- आजाराची लक्षणं ज्या व्यक्तीत दिसतील, तिच्या संपर्कात येणं टाळावं.
- जंगली प्राण्यांच्या संपर्कात येणं टाळावं.
हॉस्पिटल
कोरोना व्हायरसवर अद्याप ठोस औषध उपलब्ध नसल्यानं हॉस्पिटल आपापल्या परीनं लक्षणं दूर करण्याचा प्रयत्न करतायत.
हॉस्पिटलना सल्ला देण्यात आलाय की, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला स्वतंत्र खोलीत ठेवावं आणि त्यावर उपचार करण्यास जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी कपडे किंवा तत्सम आवश्यक उपायोजना कराव्यात.

अमेरिका आणि यूकेमधील प्रशासनानं आधीच अंदाज वर्तवलाय की, जर कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला, तर ज्या आजारांवर तातडीनं उपचाराची गरज नाही, त्यासाठी हॉस्पिटलकडून उशीर होऊ शकतो किंवा फोनवरून त्याबाबत सल्ले दिले जाऊ शकतात.
काही हॉस्पिटलच्या सेवेवर आधीच ताण असतो, अशावेळी कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यास ती हॉस्पिटल्स कसा सामना करतील, हा चिंतेचाच विषय आहे.
संशयित/रुग्णाला एकटं ठेवणं महत्त्वाचं
कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेल्या ठिकाणांहून परतणाऱ्या लोकांनी स्वत:हून काही काळ वेगळं राहावं, असं यूकेमध्ये सांगण्यात आलंय.
चीनमधील वुहान शहराला एकटं पाडण्यात आलंय. याच शहरात पहिल्यांदा कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला. इटलीतल्याही अनेक शहरात कोरोना व्हायरस पसरलाय. तिथंही असंच करण्यात आलंय.
मात्र, तज्ज्ञ म्हणतात, कोरोना व्हायरस ज्याप्रकारे जगभरात वेगानं पसरतोय, ते पाहता या उपाययोजना कुचकामी आहेत. शिवाय, या उपायोजना दुसरीकडे लागू करणंही कठीण असतं.

फोटो स्रोत, AFP
"चीननं ज्याप्रकारे कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेल्या शहराला एकटं पाडलंय, तसं इतरही देश करू शकतात," असं टॉम इंगल्सबी यांनी ट्विटरवर म्हटलंय. इंगल्सबी हे जॉन्स हॉपकिंस सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे संचालक आहेत.
मात्र, अमेरिकेतील एका अधिकाऱ्यांनं इंगल्सबी यांचं म्हणणं खोडून काढलं.
"एखाद्या भागाला एकटं पाडण्यानं कुटुंबांना एकमेकांपासून दूर केलं जाईल, लोकांना औषधं पुरवण्यास अडचणी येतील, जीवनावश्यक वस्तू पुरवणंही कठीण होऊन बसेल," असं अमेरिकेतील अधिकारी म्हणतात.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








