पौष्टिक शेवाळ! शेवाळाचा कपकेक खायला तयार आहात का?

केमिकल, फर्टिलायजर्सचा मारा आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या आजच्या काळात आरोग्यदायी खाद्यान्नासाठी अनेकजण हवे तेवढे पैसे मोजायला तयार आहेत. मार्केट रिसर्चमध्येही ही बाब सिद्ध झाली आहे. सुदृढ आरोग्य देणाऱ्या अशा पदार्थांना सुपरफुड म्हणून संबोधलं जातं. पण, तळ्याच्या पाण्यात उगवणारं शेवाळ सुपरफुड आहे, असं सांगितलं तर.

अगदीच तोंड वेंगाडण्याची गरज नाही. कारण हे शेवाळ तुम्हाला स्वतः तळ्यातून काढून खायचं नाही. तर या शेवाळापासून अगदी कपकेक ते स्मूदीपर्यंत वेगवेगळे पदार्थ बनवले जाऊ शकतात.

एका आकडेवारीवर नजर टाकूया. 2023 सालापर्यंत जगाची लोकसंख्या 8 अब्ज होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार पृथ्वीचं कुठल्याही प्रकारे शोषण न करता खाद्यान्न निर्मिती करायची म्हटलं तर केवळ 3 अब्ज 40 कोटी लोकांचंच पोट भरू शकतं. एवढीच आपल्या अन्न यंत्रणेची (Food System) क्षमता आहे.

त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचं उदरभरण करायचं असेल तर शेवाळ म्हणजेच विशिष्ट प्रकारची मायक्रोअल्गी आणि सायनोबॅक्टेरिया खूप उपयोगी ठरू शकतात.

पण, यात काही तथ्य आहे की हेसुद्धा नवीन आलेलं खुळ आहे? बघूया.

मायक्रोअल्गी आणि सायनोबॅक्टेरिया म्हणजे काय?

यांची शास्त्रीय नावं आहेत क्लोरेला आणि स्पिरुलिना.

मायक्रोअल्गी म्हणजे क्षारयुक्त किंवा गोड्या पाण्यात येणारी एकपेशीय वनस्पती आहे. फोटोसिन्थेसिस म्हणजेच प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून ते स्वतःसाठी ऊर्जा मिळवतात. हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने हवेतील कार्बनडायऑक्साईड आणि पाणी वापरून अन्न तयार करतात. याला प्रकाशसंश्लेशन किंवा फोटोसिन्थेसिस असं म्हणतात.

सायनोबॅक्टेरिया हेसुद्धा पाण्यात राहणारे जिवाणू आहेत आणि हे जिवाणूसुद्धा हिरवे असल्याने प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेतूनच ऊर्जा मिळवतात.

मायक्रोअल्गी म्हणजे शेवाळाचे शेकडो प्रकार आहेत. मात्र, मायक्रोअल्गीचा क्लोरेला आणि सायनोबॅक्टेरियाचा स्पिरुलिना हे दोन प्रकार फूड सप्लिमेंट म्हणून प्रामुख्याने वापरले जातात.

इन्स्टाग्राम सेंसेशन

काही वर्षांपूर्वी #spirulina हा हॅशटॅग सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.

या हॅशटॅगसोबत 'मर्मेड स्मूदी' आणि 'ओशन बोल्स' या खास शेवाळापासून बनवलेल्या डिशचे फोटो लाखो लोकांनी शेअर केले होते. अतिशय सुंदर निळा रंग असलेल्या या पदार्थांनी अनेकांना आकर्षित केलं होतं. स्पिरुलिनामध्ये निळं रंगद्रव्य असल्याने त्यापासून बनवलेल्या पदार्थामध्ये हा खास निळा रंग उतरतो.

तेव्हा अचानक स्पिरुलिनाबद्दल बरीच चर्चा सुरू झाली. स्पिरुलिना आणि क्लोरेलाची पावडर किंवा टॅबलेट म्हणजे जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स), खनिजं (मिनरल्स), लोह (आयन) आणि प्रथिनं (प्रोटीन) यांचा खजिना असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यांची विक्री वाढली. अशाप्रकारे या शेवाळवर्गीय वनस्पतीला सुपरफुडचा दर्जा मिळाला.

लंडनमधल्या पॅडिंग्टन भागातल्या येओटाऊन किचन या रेस्टोरंटमध्ये तर स्पिरुलिना आणि क्लोरेला स्वयपाकातले मुख्य घटक आहेत.

या रेस्टोरंटमध्ये तुम्हाला स्पिरुलिनापासून बनवलेल्या कुकीज, आईसक्रीम, एनर्जी बॉल्स आणि चीजकेक असे अनेक पदार्थ मिळतात.

मात्र, शेवाळ खाण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून होती, असं कॅम्ब्रिज विद्यापीठात वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख आणि जगविख्यात अल्गी वैज्ञानिक प्रा. अलिसन स्मिथ सांगतात.

ते म्हणतात, "निळं-हिरवं शेवाळ लोक फार पूर्वीपासून खात आले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत जेवणातला एक पदार्थ म्हणून लोक तळ्यातून स्पीरुलिना हे शेवाळ काढून खायचे, याचे पुरावे आहेत."

शेवाळाचे फायदे

मायक्रोअल्गी (शेवाळ) हाय प्रोटीन पदार्थ आहे. म्हणजे यात प्रथिनाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असणाऱ्या वेगन आहारशैलीच्या लोकांसाठी प्रोटीन मिळवण्याचा हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

सध्या आरोग्यवर्धक म्हणून काही पदार्थांमध्ये छोट्या प्रमाणावर याचा वापर होतो. मात्र, केक, पास्ता यासारख्या पदार्थांमध्ये अंड्याऐवजी क्लोरेलाचा वापर करावा, असं Algenuity कंपनीचे सीईओ अँड्रू स्पायसर यांना वाटतं.

तर स्पिरुलिना अंड्यातील पिवळ्या बलकाप्रमाणे असल्याने मेयोनिजमध्येही त्याचा वापर होऊ शकतो.

अंड्यातील पिवळ्या बलकाप्रमाणेच स्पिरुलिनाला घुसळल्यावर त्यातील कण उघडले जातात आणि यामुळे न मिसळणाऱ्या दोन द्रव पदार्थांना मिसळण्याचं काम ते करतात.

शेवाळातील त्रुटी

स्पिरुलिनाची चव आणि वास दोन्ही अत्यंत वाईट आहे.

स्पिरुलिनाचा वास बंदरात उभं राहिल्यावर मासे आणि लोखंड यांचा एकत्रित येणाऱ्या वासासारखा असतो, असं एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ असणारे सायमन सांगतात.

याशिवाय स्पिरुलिनाचा रंग हीदेखील एक समस्या आहे. स्पिरुलिनाचा रंग साधारणपणे हिरवा असतो. कुणालाही हिरव्या रंगाचा ब्रेड खरेदी करायला आवडणार नाही.

याशिवाय मायक्रोअल्गी खरंच आरोग्यवर्धक आहे का, यावरूनही वाद आहेत.

स्पिरुलिना आणि क्लोरेला दोघांमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे. मात्र, आपल्या सर्व समस्यांवर स्पिरुलिना हे पौष्टिक उत्तर आहे, या दाव्याचं विज्ञान समर्थन करत नाही.

आहारतज्ज्ञ असणाऱ्या रिनन लॅम्बर्ट म्हणतात, "स्पिरुलिनामध्ये वजनाच्या 55 ते 70 टक्के प्रथिनं असतात आणि यात अमिनो असिडचं प्रमाणही इतर वनस्पतीवर्गीय पदार्थांपेक्षा जास्त आहे. मात्र, याचा अर्थ हा नाही की मांसाहारातून मिळणाऱ्या प्रथिनांपेक्षा ते जास्त चांगलं आहे."

मायक्रोअल्गीमध्ये ओमेगा 3 फॅटी असिड मुबलक प्रमाणात आहे. मात्र, हा वनस्पतीजन्य स्रोत आहे. ज्याला DHA (Docosahexaenoic acid) म्हणतात.

ओमेगा 3 आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असलं तरी माशांमधून मिळणाऱ्या ओमेगा 3 फॅटी असिडच्या तुलनेत मायक्रोअल्गीमधून मिळणारं ओमेगा 3 शरीरात सहजासहजी शोषलं जात नाही.

मायक्रोअल्गीमध्ये असणाऱ्या B12 या मायक्रोन्युट्रीयन्टच्या बाबतीतही हेच आहे. पचन आणि मज्जासंस्थेसाठी B12 मायक्रोन्युट्रीयन्ट अत्यंत गरजेचं आहे. मात्र, मायक्रोअल्गी या वनस्पतीजन्य स्रोतातून मिळणारं B12 शरीरात शोषलं जात नाही.

रिनन सांगतात, "स्पिरुलिनामध्ये मोठ्या प्रमाणावर B12 असल्याचं सांगितलं जातं. मात्र, यात अडचण अशी आहे की त्याचा काही उपयोग होत नाही. कारण खाल्ल्यानंतर ते रक्तात शोषलं जात नाही."

शेवाळ भविष्यातलं सुपरफुड ठरेल का?

शेवाळामध्ये चव, रंग, वास आणि महत्त्वाचं म्हणजे सुपरफुड म्हणून असणाऱ्या गुणधर्माविषयी वाद अशा काही त्रुटी असल्या तरी भविष्यासाठी यात बऱ्याच शक्यता आहेत.

वाढणारी लोकसंख्या आणि कमी होणारी शेतजमीन हे भविष्यातील एक मोठं आव्हान असणार आहे. अशावेळी खाद्यान्न उत्पादन वाढीसाठीचे नवे पर्याय शोधावे लागणार आहेत.

प्रथिनांच्या इतर स्रोतांप्रमाणे शेवाळ उगवण्यासाठी उत्तम दर्जाच्या शेतजमिनीची गरज नाही.

अलिसन स्मिथ सांगतात, "सर्व प्रकारच्या जागेवर स्पिरुलिनाचं उत्पादन घेता येतं. पाण्यात, समुद्रात, तळ्यात, तलावात अगदी कुठेही. घराच्या अंगणात किंवा बर्फातसुद्धा."

म्हणजेच शहरातही शेवाळाचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं.

इतकंच कशाला अंतराळातसुद्धा शेवाळ उगवता येतं. म्हणजे भविष्यातल्या मंगळ मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी तिकडेच शेवाळ पिकवून त्यांच्या पौष्टिक जेवणाची व्यवस्था करता येऊ शकते.

राहता राहिला प्रश्न रंगाचा आणि वासाचा. तर त्यावरही तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शेवाळाला हिरवा रंग आणि उग्र वास देणारं क्लोरोफिल हे हरितद्रव्य काढून त्याऐवजी नगण्य रंग आणि चव असणारा घटक असलेलं शेवाळ विकसित करण्यासाठी Algunity मध्ये संशोधन सुरू आहे.

कंपनीचे सीईओ अँड्रू सांगतात, "प्रथिनांचा असा वेगन स्रोत तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे जो प्रासंगिक, काळानुरुप आणि अनेक प्रकारच्या खाद्यान्नात वापरला जाऊ शकेल."

"अन्नपदार्थांच्या नव्या संधी आणि एका पदार्थाऐवजी त्यासारखाच असणारा दुसरा पदार्थ वापरण्याऐवजी पदार्थ वापरण्याचे नवे मार्ग शोधण्याची वेळ आता आली आहे."

अशावेळी शेवाळ भविष्यातील पदार्थ ठरू शकेल का? हे तर आपल्यालाच ठरवायचं आहे.

(हा लेख BBC रेडियो 4 च्या फूड प्रोग्राम या कार्यक्रमातून घेण्यात आला आहे. शैला डिलन यांनी हा कार्यक्रम सादर केला होता.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)