You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंतप्रधानांच्या पत्नीवरच चालणार सवतीच्या खुनाचा खटला
लेसोथो या दक्षिण आफ्रिकेजवळच्या देशाच्या 'फर्स्ट लेडी' म्हणजेच पंतप्रधानांच्या पत्नीवरच खुनाचा गुन्हा चालणार आहे. तो देखील त्यांच्या पतीच्या म्हणजेच पंतप्रधानांच्या पूर्व पत्नीच्या खुनाचा गुन्हा.
फर्स्ट लेडी मसीहा थबाने या स्वतः पोलिसांना शरण आल्या असून दक्षिण आफ्रिकेतल्या डोंगराळ भागात असणाऱ्या या साम्राज्याचे पोलीस आता त्यांची चौकशी करतील.
या खुनाबाबत पंतप्रधान थॉमस थबाने यांचीही चौकशी करण्यात आलेली आहे.
लेसोथोची राजधानी मसेरू येथील राहत्या घरासमोर पंतप्रधानांच्या पूर्व पत्नी लिपोलेलो थबाने यांची 2017मध्ये हत्या करण्यात आली होती. थबाने यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं घेण्याच्या दोनच दिवस आधी ही हत्या झाली.
त्यावेळी या जोडप्यामधला वाद विकोपाला गेला होता आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती.
ओळख न पटलेल्या शस्त्रधारी व्यक्तींनी हा हल्ला केल्याचं सुरुवातीला म्हटलं गेलं होतं. पण लेसोथो देशाचे पोलीस कमिशनर होलोमो मोलीबेली यांच्याकडे नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
42 वर्षांच्या मसीहा थबानेंच्या नावे 10 जानेवारीला अटक वॉरंट जारी करण्यात आलं, पण त्यापूर्वीच त्या गायब झाल्या होत्या.
मंगळवारी त्यांना दक्षिण आफ्रिकेजवळच्या सीमेजवळून अटक करण्यात आल्याचं पोलिसांचे प्रवक्ते मपिती मोपेली यांनी AFP या वृत्तवाहिनीला सांगितलं.
मसीहा थबाने यांच्यावर अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त होलोमो मोलीबेली यांनी बीबीसीला सांगितलं.
मसीहा थबाने या जामीन अर्ज करणार का, याविषयीची माहिती मिळालेली नाही. पण त्या पळून जायची भीती असल्याने पोलीस त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.
लिसोथो आणि दक्षिण आफ्रिकेतल्या इतर आठ जणांवर या खुनाचे आरोप आहेत.
पंतप्रधान थबाने यांनी त्यांची पोलिसांद्वारे चौकशी केली जाण्याला गेल्या महिन्यात परवानगी दिली. ज्या दिवशी त्यांची चौकशी झाली त्यादिवशी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षाचे अनेक लोक राजधानी मसेरूच्या रस्त्यांवर उतरले होते.
दबाव वाढल्यानंतर आपण राजीनामा द्यायचा आपला विचार असल्याचं थबाने यांनी 16 जानेवारीला जाहीर केलं. पण नेमका राजीनामा कधी देणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही.
निवृत्ती घ्यायचा विचार असल्याने आपण राजीनामा देणार असल्याचं थबाने यांनी म्हटलं होतं. त्यांच्यावर वा त्यांच्या पत्नीवर झालेल्या आरोपांचा त्यांनी दाखलाही दिला नव्हता.
आपल्या पूर्व-पत्नीच्या खुनाच्या तपासात पंतप्रधान अडथळा आणत असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्षानेही केला होता.
थबाने आणि त्यांच्या आताच्या पत्नी मसीहा यांनी याविषयी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
लिपोलेलो थबानेंचं काय झालं?
थॉमस थबाने यांनी जून 2017मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेण्याच्या दोन दिवस आधी लिपोलेलो थबाने यांची हत्या झाली. 2012 पासून त्या पतीपासून वेगळ्या राहात होत्या.
एका संध्याकाळी त्या घरी परतत असताना त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. अगदी जवळून त्यांच्यावर अनेकदा गोळ्या झाडण्यात आल्या आणि रस्त्याच्या कडेलाच त्यांचा मृत्यू झाला.
सगळा देश या खुनाने हादरून गेला. 'क्रूर हत्या' असं याचं वर्णन थबाने यांनी आपल्या पहिल्या भाषणात केलं होतं.
सुरुवातीला अनोळखी व्यक्तींवर या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण जानेवारीच्या सुरुवातीला कोर्टात याविषयीचे नवे पुरावे सादर करण्यात आले.
या पुराव्यांमध्ये पोलीस प्रमुखांनी पंतप्रधान थबाने यांना लिहीलेल्या पत्राची कॉपीही आहे. AFP वृत्तसंस्थेने हे पुरावे पाहिले आहेत.
23 डिसेंबर 2019च्या या पत्रात लिहीलंय, "जिथे हा गुन्हा घडला त्या ठिकाणाहून दुसऱ्या एका मोबाईल फोनशी संभाषण झाल्याचं तपासातून उघडकीला आलंय. हा मोबाईल नंबर तुमचा आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)