IBM, WeWork, Alphabet, Microsoft सारख्या 11 जागतिक कंपन्यांचे भारतीय वंशाचे CEO

भारतीय - अमेरिकन वंशाच्या संदीप मथरानी यांनी 'वी-वर्क' (WeWork) या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रं हाती घेतली आहेत.

सध्या जगभरातल्या तंत्रज्ञान आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. या यादीत आता संदीप मथरानी यांचंही नाव समाविष्ट झालं आहे.

आपापल्या क्षेत्रातील बलाढ्य अशा या संस्थांची धुरा सांभाळणारे भारतीय चेहरे:

1. संदीप मथरानी, वीवर्क

संदीप मथरानी वी-वर्कचे नवीन CEO असतील. 18 फेब्रुवारीपासून ते कार्यभार सांभाळतील. अॅडम न्यूमन सप्टेंबर 2019 मध्ये पायउतार झाल्यानंतर आर्टी मिन्सन आणि सबॅस्चियन गनिंगहॅम हे कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहत होते. मथरानी हे याआधी ब्रुकफील्ड प्रॉपर्टी पार्टनर्स या रीटेल ग्रुपचे प्रमुख होते.

2. सुंदर पिचाई, अल्फाबेट (गुगलची प्रमुख कंपनी)

गुगलची पेरेंट कंपनी असणाऱ्या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रं पिचाई यांनी डिसेंबरमध्ये स्वीकारली.

गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे दोघे पायउतार झाल्यानंतर हे पद पिचाईंकडे आलं. 2015 पिचाई यांना गुगलचं सीईओ बनवण्यात आलं होतं. 47 वर्षांच्या पिचाई यांनी आयआयटी - खरगपूरमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

3. सत्या नाडेला, मायक्रोसॉफ्ट

बिल गेट्स आणि स्टीम बाल्मर यांच्यानंतरचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत सत्या नाडेला.

हैदराबादमध्ये जन्म झालेले नाडेला 2014पासून मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत. मंगलोर विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरींगची पदवी घेतलेल्या नाडेला यांनी युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

4. अरविंद कृष्णा, IBM

इंटरनॅशनल बिझनेस मशीन कॉर्प्स म्हणजेच आयबीएमच्या सीईओपदी गेल्या आठवड्यातच अरविंद कृष्णा यांची नेमणूक करण्यात आली. मूळ भारतीय असलेले कृष्णा हे IIT कानपूरचे विद्यार्थी आहेत.

6 एप्रिलपासून ते 80 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असणाऱ्या आयबीएम या अमेरिकन कंपनीची धुरा हाती घेतली. 57 वर्षांच्या कृष्णा यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला असून त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. 1990 पासून अरविंद कृष्णा आयबीएममध्ये कार्यरत आहेत.

5. राजीव सुरी, नोकिया

प्रसिद्ध मोबाईल कंपनी नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे राजीव सुरी हे एप्रिल 2014 पासून नोकियाचे प्रमुख आहेत.

मूळ भारतीय वंशाच्या सुरी यांचा जन्म नवी दिल्लीचा. पण ते सिंगापूरचे नागरिक आहेत आणि सध्या फिनलंडमध्ये स्थायिक आहेत.

6. शंतनू नारायण, Adobe

हैदराबादचे शंतनू नारायण हे Adobe Inc या एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. नारायण हे 1998पासून या कंपनीत असून 2005 मध्ये त्यांची नियुक्ती कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) म्हणून करण्यात आली होती.

2007मध्ये ते कंपनीचे सीईओ झाले तर 2017मध्ये त्यांना बोर्डाचे अध्यक्ष नेमण्यात आलं. शंतनू यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं. एशियन रेगाटा स्पर्धांमध्ये शंतनू नारायण यांनी भारताचं प्रतिनिधित्वंही केलेलं आहे.

7. पुनीत रंजन - डिलॉईट (Deloitte)

गेली 33 वर्षं डिलॉईडमध्ये काम करणारे पुनीत रंजन हे जून 2015मध्ये डिलॉईट ग्लोबलचे सीईओ झाले. ते कंपनीच्या जागतिक संचालक मंडळाचेही सदस्य आहेत.

भारतामध्ये लहानाचे मोठे झालेल्या पुनीत यांनी रोहतकमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर रोटरीच्या स्कॉलरशिपने ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेले.

8. वसंत नरसिंम्हन, नोव्हार्टिस

2018पासून नोव्हार्टिसचे सीईओ असलेल्या डॉ. वसंत नरसिंम्हन यांना Vas म्हणून ओळखलं जातं. वसंत यांचे आईवडील मूळचे तामिळनाडूचे. 1970च्या दशकात ते अमेरिकेत स्थायिक झाले.

डॉ. नरसिंम्हन यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून वैद्यकीय पदवी घेतली. आणि त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठाच्या जॉन एफ. केनेडी स्कूलमधून पब्लिक पॉलिसी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 2016 ते 2018 या काळात ते नोव्हार्टिसच्या नवीन औषधं विकसित करणाऱ्या विभागाचे ग्लोबल हेड आणि चीफ मेडिकल ऑफिसर होते.

9. अजयपाल सिंह बंगा, मास्टरकार्ड

पुण्याजवळच्या खडकीमध्ये जन्मलेले अजयपाल सिंह बंगा हे 2010पासून मास्टरकार्डचे सीईओ आहेत. त्यापूर्वी ते कंपनीचे अध्यक्ष आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) होते. 2016साली भारत सरकारने त्यांचा पद्मश्रीने सन्मान केलेला आहे.

शंतनू नारायण, सत्या नाडेला आणि अजय बंगा हे तिघेही हैदराबाद पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.

10. दिनेश पालिवाल, हर्मन इंटरनॅशनल इंडस्ट्रीज

ऑडिओ आणि इन्फोटेन्मेन्ट क्षेत्रात सेवा देणाऱी कंपनी हर्मन इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे दिनेश पालिवाल 2007 मध्ये कंपनीत रुजू झाले. 2017 मध्ये ही कंपनी सॅमसंगने विकत घेतली. JBL सारखे ब्रॅण्डस या कंपनीच्या मालकीचे आहेत.

11. जयश्री उल्लाल, अरिस्टा नेटवर्क्स

अरिस्टा नेटवर्क्स ही एक क्लाऊड नेटवर्किंग कंपनी आहे. जयश्री उल्लाल 2008पासून कंपनीच्या अध्यक्ष आणि CEO आहेत.

उल्लाल यांचा जन्म लंडनचा असला तरी नवी दिल्लीत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधून इंजिनियरिंगची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)