You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीतील 7 महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली. 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला. या मुलाखतीचा पहिला भाग आज (3 फेब्रुवारी) प्रसारित आणि प्रकाशित झाला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की ते विधान परिषदेतून निवडून जाणार आहेत.
काँग्रेससोबत गेलो, पण हिंदुत्व सोडलं नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये अनेक बाबींवर भाष्य केलं. मुलाखत त्यांच्याच पक्षाचे खासदार असलेल्या संजय राऊतांनी घेतली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 'सामना'शिवाय कुणालाही मुलाखत दिली नाही. त्यामुळे अडचणीचे ठरू शकणारे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले नाहीयेत.
मुलाखतीतील 7 महत्त्वाचे मुद्दे
1) 'मुख्यमंत्रिपद हे माझं कधीच स्वप्न नव्हतं'
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणं हा तुमच्यासाठी धक्का होता का, या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्रिपद स्वीकारणं धक्का नसला, तरी ते माझं स्वप्न नव्हतं. बाळासाहेबांना दिलेलं वचन होतं आणि त्यासाठी कुठल्याही थराला जायचं ठरवलं होतं."
मुख्यमंत्रिपद ही वचनपूर्ती नाही, तर त्या दिशेनं टाकलेलं पाऊल असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
2) 'वचनभंग झाल्याचं दु:ख आणि रागही'
भाजपनं विधानसभा निवडणुकीआधी दिलेल्या कथित वचनाबद्दल या मुलाखतीतही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, "वचन देणं आणि वचन निभावणं यात फरक आहे. वचनभंग झाल्यावर सहाजिकच दु:ख आहे, रागही आहे. 'त्यांनी' कशासाठी हे केलं? का वचन दिलं आणि का वचन मोडलं? मग त्यांनी अशा पद्धतीनं वचन मोडल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता."
ते पुढे म्हणाले, "असं काय मोठं मागितलं होतं? आकाशातले चंद्र-तारे मागितले होते का? लोकसभा निवडणुकीआधी झालेल्या वाटाघाटीनुसार ठरलेलंच मागितलं होतं."
3) 'नाईलाजानं मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वाकारावीच लागली'
ठाकरे कुटुंब म्हणजे संसदीय राजकारणाबाहेर राहून राजकारण करणारे समजले जात असे. मात्र आधी आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढणं असो वा नंतर उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणं, यानं ही अलिखित परंपरा मोडली.
यासंदर्भातील प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेनाप्रमुखांनी सत्तेचं कोणतंही पद स्वीकारलं नाही. माझीही तशी इच्छा नव्हती. पण जेव्हा लक्षात आलं की, ज्यांच्यासोबत आहोत, त्यांच्यासोबत वचनपूर्तीच्या दिशेनं जाऊ शकत नाही, तेव्हा वेगळी दिशा स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळं नाईलाजानं जबाबदारी स्वीकारावी लागली."
4) 'तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे का?'
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपकडून सातत्यानं शंका उपस्थित करण्यात आली. यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना भाजपचं नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, "मी काय धर्मांतर केलंय का? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे का? की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व."
आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा आव कुणी आणू नये, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपला लगावला.
5) काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेल्यानंतर भाजपनं केलेल्या टीकेवर काय म्हणाले?
पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात, मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? असा प्रतिप्रश्न करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
काँग्रेसमधले नेते भाजपनं सामावून घेतले. त्यांना आमदरक्या-खासदारक्या दिल्या. ते सुद्धा विचारधारेवरच होते ना? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
6) 'बेळगावसाठी कठोर पावलं टाकावी लागतील'
संयुक्त महाराष्ट्राचं काम थोडं अपुरं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बेळगावच्या मुद्द्यालाही हात घातला. बेळगावचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी 'कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र' असा केला.
"बेळगावप्रश्नी कठोर पावलं तर टाकावी लागतील, पण त्याचसोबत या विषयावरील समितीच्या सर्व लोकांना मला बोलवायचं आहे. दोन मंत्र्यांचीही या मुद्द्यासाठी नेमणूक केलीय. सर्व पाठपुरावा केला जाईल," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तसंच, बेळगावप्रश्नी गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात आश्चर्यकारकरित्या कर्नाटकची बाजू मांडतंय, हे संतापजनक आहे, असंही ते म्हणाले.
7) उद्धव ठाकरे विधानपरिषदेत जाणार की विधानसभेत?
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी ते अजून विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. शपथविधीपासून सहा महिन्यात त्यांना कुठल्यातरी एका सभागृहाचं सदस्य होणं अनिवार्य आहे. ते विधानपरिषदेत आमदार म्हणून जाणार की विधानसभेच्या रिंगणात उतरणार, याची उत्सुकता अनेकांना आहे.
यावर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत आमदार म्हणून जाण्याचे संकेत मुलाखतीतून दिलेत. ते म्हणाले, "आता लगेच विधानपरिषदेच्या निवडणुका येतील. विधानसभेवर जायचं म्हणजे निवडून आलेल्याला राजीनामा द्यायला लावून निवडणूक घ्यावी लागेल."
"कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन, तर का नाही जायचं? या दारातून त्या दारातून सगळं बोलायला ठीक आहे. मी तर म्हणेन मी छपरातून आलोय," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आता पुढच्या भागात मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)