You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसचा चीनबाहेर पहिला मृत्यू, फिलिपिन्समध्ये एकाचा बळी
फिलिपिन्समध्ये एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत पण या व्हायरसमुळे चीनबाहेर मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.
कोरोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेनी आरोग्यविषयक सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली आहे.
ही व्यक्ती चीनमधील वुहान येथे राहत होती. फिलिपिन्समध्ये येण्यापूर्वीच या व्यक्तीला व्हायरसची लागण झाली असावी असं जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलं.
त्या व्यक्तीला न्युमोनिया झाला. त्यानंतर त्यांना मनिलातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
फिलिपिन्सचे WHO प्रतिनिधी रविंद्र अभयसिंगे म्हणाले की लोकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण संबंधित व्यक्ती चीनमधून आली होती.
या व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला आहे तर 14,000 जणांना या विषाणूची लागण झाली आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी चीनमधील प्रतिबंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. चीननं आपल्या नागरिकांना परदेश यात्रा न करण्याची सूचना केली आहे.
अमेरिकेनंही आपल्या नागरिकांना चीनमध्ये न जाण्याची सूचना केली आहे.
ज्या हुबेई प्रांतातल्या वुहान शहरामधून या व्हायरसला सुरुवात झाली, तिथे अजूनही सर्व व्यवहार ठप्प असून अनेक शहरांनी दळणवळण बंद ठेवलेलं आहे.
जगभरात इतरत्र कोरोना व्हायरसच्या केसेस आढळल्या असून यामध्ये थायलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये ज्येष्ठांचं आणि ज्यांना श्वसन यंत्रणेचे विकार आधीपासूनच होते, अशांचं प्रमाण जास्त आहे.
कोरोना विषाणू आहे काय?
रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.
कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.
या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे.
सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)