You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UK election: काँझर्व्हेटिव्ह पक्षाला स्पष्ट बहुमत, लेबर पार्टीला धक्का
12 डिसेंबर रोजी युकेतल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आज युकेतले निकाल लागले आहेत. 650 खासदार असलेल्या संसदेत काँझर्व्हेटिव्ह पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत 326 चा आकडा पार केला आहे.
सध्या असलेल्या कलानुसार काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 363 जागा येतील असं सांगितलं जात आहे. विरोधी पक्ष लेबर पार्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांची संख्या कमी होऊन 200 हून खाली जाण्याची शक्यता दिसत आहे.
याचाच अर्थ असा की सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
काँझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळाल्यावर युकेचा युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असं मत बीबीसीच्या राजकीय संपादक लॉरा क्युएन्सबर्ग यांनी केला आहे.
या निवडणुकीत लेबर पक्षाला 191, लिबरल डिमोक्रॅट्सला 13, SNP पार्टीला 55 तर नव्यानेच स्थापन झालेल्या ब्रेक्झिट पक्षाला शून्य खासदार मिळण्याची शक्यता एक्झिट पोलनं वर्तवली होती.
लेबर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी आपला पराभव मान्य केला आहे. ही लेबर पक्षासाठी काळरात्र ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
स्पष्ट बहुमतामुळे ब्रेक्झिटचा मार्ग मोकळा झाला आहे.
गृह सचिव प्रिती पटेल यांनी सांगितलं की सरकारची स्थापना झाल्यानंतर 'ब्रेक्झिट'ची म्हणजेच युकेनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या कामाला वेग येईल. सत्तेत आल्यानंतर क्रिसमसच्या आधी ब्रेक्झिटचं विधेयक संसदेत ठेवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
'जगातली सर्वांत महान लोकशाही'
ज्या लोकांनी मतदान करून लोकशाही बळकट केली त्या सर्वांचे मी आभार मानतो असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निवडणुकांनंतर म्हटलं होतं.
"पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपण जगातल्या सर्वांत महान लोकशाहीत राहतो," असं जॉन्सन म्हणाले होते.
'गेट ब्रेक्झिट डन'
या बहुमतामुळे बोरिस जॉन्सन हे पुन्हा पंतप्रधान होतील असा अंदाज आहे. युरोपियन युनियनमधून युके पुढच्याच महिन्यात बाहेर पडेल असं बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं. या बहुमतामुळे 'गेट ब्रेक्झिट डन' ही आमची घोषणा प्रत्यक्षात उतरणार असल्याचं जॉन्सन यांनी म्हटलं.
बोरिस जॉन्सन हे पश्चिम लंडनच्या उक्सब्रिज या मतदारसंघातून निवडून आले. ते म्हणाले असं दिसत आहे की युकेच्या जनतेनी काँझर्व्हेटिव्ह पक्षाला स्पष्ट बहुमत देऊन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आता ब्रेक्झिटचा प्रश्न मार्गी लावला जाईल असं जॉन्सन म्हणाले.
ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक ठरली. ही निवडणूक लादण्याची आमची बिल्कुल इच्छा नव्हती पण परिस्थितीच अशी उद्भवली की निवडणूक घ्यावी लागली. युकेच्या नागरिकांनी मोठ्या संख्येनी मतदान केलं. म्हणून मी त्यांचे आभार मानतो असं जॉन्सन म्हणाले.
'ब्रेक्झिटशिवाय कसलीच चर्चा नाही'
आम्ही या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरलो होतो आणि आम्ही आशावादी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. पण पूर्ण निवडणुकीत ब्रेक्झिट हाच मुद्दा गाजला असं लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी म्हटलं आहे. लेबर पक्षाच्या मतदानाच्या आकडेवारीत 8 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
राजकीय प्रतिनिधी निक एर्डली यांचं निवडणूक निकालानंतरचं विश्लेषण
काँझर्व्हेटिव्ह पक्षासाठी हे फारच चांगले निकाल आहेत. त्यांनी जी अपेक्षा केली होती त्याहून अधिक चांगले निकाल लागले आहेत. त्यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे ब्रेक्झिटचा निर्णय ठामपणे घेतील. बोरिस जॉन्सन म्हणत असल्याप्रमाणे पुढच्याच महिन्यात युके हे युरोपियन युनियनमधून बाहेर पडू शकतं.
काही निकाल हे धक्कादायक आहेत. लेबर पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात काँझर्व्हेटिव्ह पक्षाने बाजी मारली आहे. यामुळे लेबर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांचं भवितव्य काय राहील या चर्चेला आरंभ झाला आहे. कॉर्बिन यांनी नेतेपद तत्काळ सोडावं अशी इच्छा लेबर पक्षातली काही नेत्यांची आहे.
स्कॉटलॅंड नॅशनल पार्टीला चांगल्या जागा मिळाल्यामुळे स्कॉटलॅंडच्या स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
राजकीय संपादक लॉरा क्युएन्सबर्ग याचं एक्झिट पोलवर आधारित विश्लेषण
जर एक्झिट पोल खरे ठरले तर बोरिस जॉन्सन यांनी बहुमत मिळवलं असंच म्हणावं लागेल. याचाच अर्थ असा की युकेला युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे खासदारांचं पुरेसं पाठबळ असेल. ब्रेक्झिट जर घडलं तर जागतिक इतिहासात जे युकेला स्थान मिळालं आहे ते डळमळीत होण्याची शक्यता आहे. इतक्यावरच हे थांबणार नाही. या निकालानंतर कंझर्व्हेटिव्ह सरकारला पाच वर्षं सत्ता मिळणार आहे.
लेबर पक्षासाठी हा खूप मोठा धक्का ठरू शकतो. हा त्यांचा ऐतिहासिक पराभव ठरू शकतो. गेल्या काही वर्षांत लेबर पक्ष डावीकडे झुकला आहे.
SNP चा ( स्कॉटिश नॅशनल पार्टी) स्कॉटलॅंडमध्ये प्रभाव निश्चितपणे वाढला आहे. लिबरल डेमोक्रेटिक पक्षाने प्रचाराच्या वेळी आशा उंचावल्या होत्या पण एक्झिट पोलचे आकडे वेगळंच काही सांगत आहे.
मंत्रिमंडळावर काय परिणाम होऊ शकतो?
असं म्हटलं जात आहे की लेबर पार्टीचं जिथं नुकसान झालं तिथं काँझर्व्हेटिव्ह पक्षांचा फायदा झाला आहे. 2016 साली ब्रेक्झिटसाठी जनमत चाचणी झाली होती. त्यावेळी लेबर पार्टीला काही मतदारसंघात आघाडी मिळाली होती ती मतं यावेळी काँझर्व्हेटिव्हला गेली असण्याची शक्यता आहे. 1987 च्या निवडणुकांमध्ये काँझर्व्हेटिव्ह पक्षांची कामगिरी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ठ कामागिरी मानली जाते. पण या निवडणुकीत काँझर्व्हेटिव्ह पक्षाची कामगिरी 1987 च्या निवडणुकीहून सरस ठरू शकते.
जर एक्झिट पोल खरे ठरले तर मंत्रिमंडळात फार बदल होणार नाहीत असं पंतप्रधान कार्यालयाने सूचवलं आहे. सर्वकाही बोरिस जॉन्सन यांच्या नियोजनाप्रमाणे पार पडलं तर फेब्रुवारीपर्यंत युके युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेलं असेल असं म्हटलं जात आहे. त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा खातेवाटप होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)