नवाज शरीफ तुरुंगात शिक्षा भोगत असताना उपचारासाठी लंडनला का गेले?

    • Author, तरहब असगर
    • Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मनी लाँडरिंग प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने लाहोर हायकोर्टाने 25 ऑक्टोबरला त्यांना वैद्यकीय दृष्टिकोनातून जामीन दिला आणि उपचारांसाठी ते लंडनला रवाना झाले.

नवाझ शरीफ यांना घेऊन जाण्यासाठी कतारच्या राजघराण्याची VIP एअर अॅम्ब्युलन्स मंगळवारी सकाळी लाहोरमध्ये दाखल झाली होती. सकाळी 10 वाजताच्या सुमारास नवाझ शरीफ यांना घेऊन एअर अॅम्ब्युलन्स ब्रिटनसाठी रवाना झाली. शरीफ यांच्यावर लंडनमध्ये उपचार करण्यात येतील, असं सांगितलं गेलं.

शरीफ हे त्यांचा भाऊ, खासगी डॉक्टर आणि दोन नोकरांसह नवाझ शरीफ ब्रिटनला गेले आहेत. शरीफ यांना उपचारांसाठी परदेशात पाठवण्यात यावं, अशी मागणी त्यांच्या कुटुंबाकडून गेल्या काही काळापासून करण्यात येत होती. पण आतापर्यंत ही मागणी मंजूर झाली नव्हती.

नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोने (NAB) नवाझ शरीफ यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले होते. NABच्या कोर्टाने शरीफ यांच्याविरोधात निर्णय सुनावला, म्हणूनच नवाझ शरीफ तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

यानंतर NABने त्यांच्याविरोधात तिसरं प्रकरण दाखल केलं. या खटल्यासाठी त्यांना तुरुंगातून लाहोरमधील नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोमध्ये बोलवण्यात आलं होतं.

अथक प्रयत्नांनंतर परदेशी जाण्याची परवानगी

नवाझ शरीफ यांचे वैयक्तिक डॉक्टर गेला काही काळ ट्विटरवरून सतत याविषयी लिहीत होते आणि याविषयीच्या तक्रारी करत होते. उपचारांसाठी परवानगी मागूनही ती देण्यात येत नसल्याचं, शरीफ यांना भेटता येत नसल्याचं त्यांनी ट्वीट केलं होतं.

पण जेव्हा या डॉक्टरना परवानगी मिळाली तेव्हा नवाझ शरीफ यांची प्रकृती फारशी बरी नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर शरीफ यांना लाहोरमधल्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

गेले पाच-सहा आठवडे त्यांच्यावर इथे उपचार करण्यात आले. नवाझ शरीफ यांच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. त्यांना 'ऑटो इम्यून डिसीज' असल्याने त्यांच्या प्लेटलेट्स कमी होत असल्याचं सांगण्यात आलं.

त्यांना औषधं देण्यात आली, इंजेक्शन्सही देण्यात आली. पण प्लेटलेट्स थोड्या वाढून पुन्हा कमी होत.

पाकिस्तान सरकारने एका मेडिकल बोर्डाला या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितलं होतं. नवाझ शरीफ यांना हृदयरोग, मधुमेह, किडनी विकारांसारखे अनेक आजार असल्याचं या मेडिकल बोर्डाने सांगितलं.

यामुळे प्लेटलेट्स नेमके कशामुळे कमी होत असल्याचं लक्षात येत नव्हतं. हा असा आजार असू शकतो ज्यासाठीच्या चाचण्या पाकिस्तानात होत नसल्याचं सांगण्यात आलं. म्हणूनच सरकारी मेडिकल बोर्डाने त्यांना लंडनला पाठवण्याची शिफारस केली.

शरीफ यांच्या कुटुंबाला त्यांना परदेशी नेण्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागली कारण नवाझ शरीफ यांचं नाव इसिल म्हणजेच एक्झिट कन्ट्रोल लिस्टमध्ये आहे.

यामुळे नवाझ शरीफ यांना देश सोडून जाणं शक्य नव्हतं. पण हे कोर्टाचं प्रकरण असल्याने शरीफ यांनी हमीपत्र द्यावं, असं पाक सरकारने म्हटलं. देशात परत येऊन स्वतःच्या विरोधातल्या प्रकरणांना सामोरं जाण्याची हमी म्हणून शरीफ यांनी सात अब्ज रुपये गॅरंटीच्या रूपात ठेवले तरच त्यांना परवानगी देण्यात येईल, असं पाकिस्तान सरकारने त्यांना सांगितलं.

पण नवाझ शरीफ यांचा PML(N) पक्ष आणि स्वतः शरीफ यांनी हे मान्य करायला नकार देत न्यायालयात धाव घेतली. नवाझ शरीफ यांना चार आठवड्यांसाठी जाण्याची परवानगी एकदा देण्यात यावी, असा निर्णय लाहोर हायकोर्टाने सुनावला.

याच निर्णयाच्या आधारे नवाझ शरीफ लंडनला उपचारांसाठी गेले आहेत.

चार आठवड्यांत उपचार पूर्ण झाले नाहीत तर?

उपचारांसाठी चार आठवड्यांचा कालावधी कमी पडला तर कालावधी वाढवण्यासाठीचं अपील करत पद्धतशीरपणे कालावधी वाढवून घेणार असल्याचं PML(N) पक्षाने म्हटलंय.

तर नवाझ शरीफ यांच्या गैरहजेरीत त्यांच्या पक्षाचं काम सुरू राहील आणि गरज पडल्यास फोनवरून नवाझ शरीफ आणि शहबाज शरीफ यांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचंही PML(N) पक्षाने म्हटलंय.

पण नवाझ शरीफ उपचारांनंतर पाकिस्तानात परतले नाहीत तर त्यांच्या विरुद्ध कोर्टाच्या अवमानाची कारवाई करण्यात येणार असल्याचं सत्ताधारी पक्ष तहरीक - ए - इन्साफने म्हटलंय.

पण आपण कोर्टाच्या सूचनांनुसार सर्वकाही करणार असून गरज पडल्यास कायदेशीर प्रक्रियेनेच पुढील गोष्टी ठरवणार असल्याचं नवाझ शरीफ यांनी म्हटलंय.

नवाझ शरीफ यांच्या आजाराचं राजकारण करणार नाही, पण त्यांना त्यांच्यावरच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांचा सामना करावा लागेल, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)