डोनाल्ड ट्रंप महाभियोग प्रकरण: डेमोक्रॅट नेत्यांवर खवळले ट्रंप

देशाचं भलं करण्याकडे लक्ष देण्याऐवजी डेमोक्रॅटिक नेत्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याविरोधात महाभियोगाचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनी केला आहे. .

डेमोक्रॅटिक नेत्यांबद्दल बोलताना अयोग्य भाषा वापरत ट्रंप यांनी त्यांच्यावर बेईमानीचा तसंच देशद्रोहाचा आरोप केला.

ट्रंप यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांविषयीचे सगळे पुरावे देण्याची मागणी काँग्रेसच्या एका समितीने केली आहे.

युक्रेनच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या चर्चेदरम्यान एक डेमोक्रॅट नेता आणि त्याच्या मुलाविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाखांली चौकशी सुरू करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप ट्रंप यांच्यावर आहे. पण ट्रंप यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

डेमोक्रॅट नेत्यांनी या चौकशीचं समर्थन केलं असून याबाबतची तपासणी निष्पक्षपणे पूर्ण करण्याचं वचन दिलं आहे.

हे तपास प्रकरण नेमकं काय आहे?

ट्रंप यांच्याविरोधातल्या महाभियोग प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आपल्या एका प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध कट केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जर यामध्ये ट्रंप दोषी आढळले तर त्यांना पदावरून काढून टाकलं जाऊ शकतं.

या वर्षीच 25 जुलैला राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून एक फोन कॉल करण्यात आला. एका व्हिसल ब्लोअरने या कॉलविषयीचा सगळा तपशील मागितला होता.

हा व्हिसल ब्लोअर एक अमेरिकन अधिकारी होता. त्यांनी दाखल केलेली तक्रार ही 'ताबडतोब दखल घेण्याजोगी' आणि विश्वासार्ह मानली गेली. या व्यक्तीने केलेल्या तक्रारीची प्रत संसदेत मांडण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅट खासदारांनी केली होती.

यानंतर अमेरिकन संसदेच्या खालच्या सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी राष्ट्रपती ट्रंप यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली.

युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर जेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून बोलताना जो बायडेन आणि त्यांच्या मुलाविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची तपासणी सुरू करण्यासाठी ट्रंप यांनी जेलेन्स्की यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे.

जो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत ते पक्षाचे उमेदवार असू शकतात. म्हणजचे ते राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचे या निवडणुकीतले प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे.

बायडेन यांचा मुलगा युक्रेनमधल्या एका गॅस कंपनीत काम करत होता. याप्रकरणी अद्याप बायडेन यांच्या विरोधातला कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

युक्रेनचे नवे राष्ट्रपती जेलेन्स्की सत्तेत आल्यानंतर ट्रंप यांनी युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा डेमोक्रॅट नेत्यांचा आरोप आहे.

2020 च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रंप यांनी स्वतःच्या फायद्यासाठी युक्रेनमध्ये हस्तक्षेप घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचं डेमोक्रॅट नेत्यांचं म्हणणं आहे.

ट्रंप यांचं म्हणणं

ज्यो बायडेन आणि त्यांचा मुलगा 'जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करत असल्याचं' ट्रम्प यांनी फिनलंडचे राष्ट्रपती साऊली नीनिस्तो यांच्यासोबतच्या एका संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान बुधवारी म्हटलं.

हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे अध्यक्ष अॅडम शिफ यांच्याविषयीही त्यांनी वक्तव्यं केली. ट्रंप यांनी त्यांना 'शिटींग शिफ' आणि 'छोटा माणूस' म्हटलं. 'या अपमानाबद्दल त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा,' असंही ट्रंप यांनी म्हटलं. 'देशद्रोहाबद्दल शिफ यांचा तपास व्हायला हवा' असंही ट्रंप यांनी म्हटलं.

तक्रार लिहिण्यासाठी व्हिसल ब्लोअरला शिफ यांनीच मदत केल्याचा आरोप ट्रंप यांनी केलाय. पण आपण केलेल्या आरोपांचं समर्थन करण्यासाठी ट्रंप यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.

आपल्याविरुद्ध करण्यात आलेली तक्रार बरखास्त करण्याची मागणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली असून फक्त 'योग्य' व्हिसल ब्लोअरनाच संरक्षण देण्यात यावं असंही त्यांनी म्हटलंय.

ट्रंप यांनी म्हटलं, "ही व्यक्ती कोण आहे हे देशाला समजणं गरजेचं आहे. कारण माझ्या मते ही व्यक्ती हेर आहे."

आपल्याविरोधात सुरू असणारी चौकशी हा 'धोका' असून हा 'अमेरिकन लोकांवरचा अन्याय' असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या तपासामध्ये काँग्रेसला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आहे.

कोणती गोष्ट देशद्रोह असल्याचं त्यांना वाटतं, असा प्रश्न रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने ट्रंप यांना विचारल्यावर ट्रंप यांनी म्हटलं, "मी चांगलं चारित्र्य असणारा माणूस असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. आणि ज्या लोकांनी रशियाच्या विरोधातल्या तपासात सहभाग घेतला होता, त्यांच्याविरुद्ध अनेक कायदेशीर पावलं उचलण्यात येतील."

या पत्रकाराने आणखी काही प्रश्न विचारल्यानंतर ट्रंप यांनी हे प्रश्न टाळले आणि म्हटलं, "मर्यादेचं उल्लंघन करू नका."

हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजच्या अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक नेत्या नॅन्सी पलोसी आणि अॅडम शिफ हे 'फालतू गोष्टींवर' लक्ष देत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी याआधी सोशल मीडियावरून केला होता.

पलोसी यांनी स्वतःच्या सॅन फ्रान्सिस्को शहराकडे अधिक लक्ष द्यावं, हे शहर बेघरांचा अड्डा झालं असून 'तंबुंचं शहर' झाल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं.

डेमोक्रॅट नेत्यांचं म्हणणं काय?

काँग्रेसच्या चौकशीमध्ये व्हाईट हाऊस अडथळा आणत असून, करण्यात आलेल्या विनंत्या दाखल करून घेतल्या जात नसल्याचा आरोप डेमोक्रॅट नेत्यांनी केलाय.

हाऊस ओव्हरसाईट समितीचे अध्यक्ष एलिजा कमिंग्स यांनी या मेमोबद्दल म्हटलं, "ठरवण्यात आलेल्या गोष्टींचं स्वेच्छेने पालन व्हावं आणि सगळ्याची नोंद करण्यात यावी असा प्रयत्न समितीने गेले काही आठवडे केला आहे. पण व्हाईट हाऊस समितीला उत्तर देण्यास मात्र नकार देण्यात आला आहे."

राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि युक्रेनचे राष्ट्रपती यांच्यामध्ये झालेल्या फोन कॉलविषयीच्या सगळ्या तपशीलाची मागणी या मेमोद्वारे व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ - मिक मुलवाने यांच्याकडे करण्यात आली आहे.

नॅन्सी पलोसी आणि अॅडम शिफ यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेत महाभियोगाच्या या प्रक्रियेची पाठराखण केली. शिफ म्हणाले, "आम्ही इथे कोणताही मूर्खपणा करत नाही."

हा तपास लवकर संपावा अशी डेमोक्रॅट नेत्यांची इच्छा असल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलंय.

ट्रंप यांनी व्हिसलब्लोअरच्या विरोधात केलेलं वक्तव्य म्हणजे 'साक्षीदाराला स्पष्टपणे घाबरण्याचा प्रयत्न' असून 'हिंसेसाठीची चिथावणी' असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

व्हिसलब्लोअरने केलेली तक्रार आधीच समितीकडे आलेली होती या ट्रंप यांच्या आरोपाचं शिफ यांनी एका निवेदनाद्वारे खंडन केलंय. समितीला कोणत्याही व्हिसलब्लोअरची तक्रार आधी मिळाली नव्हती, आणि याविषयी आधी विचार करण्यात ला नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

महाभियोगाची प्रक्रिया

महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारण्यात आल्यानंतर अमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्षाला देशद्रोह, लाच आणि इतर गंभीर अपराधांबद्दल महाभियोगाला सामोरं जावं लागतं.

महाभियोगाची ही प्रक्रिया अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजपासून सुरू होते आणि ती मंजूर करण्यासाठी साधारण बहुमत गरजेचं असतं.

सिनेटमध्ये यावर एक सुनावणी होते पण इथे महाभियोगाला मंजुरी देण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते.

अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे हटवण्यात आलेलं नाही. आतापर्यंत फक्त दोनच राष्ट्राध्यक्षांना महाभियोगाला सामोरं जावं लागलं आहे.

1868मध्ये जॉन्सन यांच्या विरुद्ध महाभियोग आणण्यात आला होता. जॉन्सन यांचं प्रकरण बिल क्लिंटन यांच्या अगदी विरुद्ध होतं. केवळ एका मताने जॉन्सन यांच्यावरचा महाभियोग वाचला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)