You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हजारो सौदी सैनिक हुथी बंडखोरांच्या ताब्यात?
सौदी अरेबियाच्या हजारो सैनिकांना पकडल्याचा दावा येमेनच्या हुथी बंडखोरांनी केला आहे.
सौदी अरेबियातील नाजरान शहराजवळ सौदीच्या तीन ब्रिगेड्सनी आत्मसमर्पण केल्याचं हुथी बंडखोरांच्या प्रवक्त्याने सांगितलं.
सौदी सैनिकांची संख्या हजारभर आहे. हुथी बंडखोरांनी हाती घेतलेल्या तीन दिवसांच्या मोहिमेत सौदी अरेबियासह संयुक्त सेनेचे अनेक सैनिक मारले गेल्याचं या प्रवक्त्याने सांगितलं.
सौदी अरेबियाच्या प्रशासनाने हौती बंडखोरांच्या दाव्याला पुष्टी दिलेली नाही.
टीव्हीवर परेड
जेव्हापासून येमेन-सौदी संघर्ष सुरू झाला तेव्हापासूनची ही सगळ्यात मोठी मोहीम असल्याचं हुथी बंडखोरांचे प्रवक्ते कर्नल याहिया सारिया यांनी सांगितलं.
सौदी सेनेने आत्मसमर्पण केलं. त्यांची मनुष्यहानी झाली आहे तसंच शस्त्रास्त्रांचं नुकसान झालं आहे. ज्या लोकांना पकडण्यात आलं आहे, त्यांना रविवारी हुथी बंडखोरांच्या नियंत्रणात असलेल्या अल मसीराह टीव्हीवर परेडमध्ये दाखवण्यात येतील असं सारिया म्हणाले.
2015 पासून संघर्ष सुरू
हुथी बंडखोरांनी याआधी सौदी अरेबियाच्या दोन तेल केंद्रांवर हल्ला केल्याचा दावा केला होता. 14 सप्टेंबरला हा हल्ला झाला होता. जागतिक स्तरावरच्या खनिज तेलाच्या खरेदी-विक्रीला याचा फटका बसला होता.
सौदी अरेबिया आणि अमेरिकेने मात्र या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरलं होतं. इराणने या आरोपाचं खंडन केलं होतं. इराणचं हुथी बंडखोरांना समर्थन आहे असं मानलं जातं.
येमेनमध्ये 2015पासून संघर्ष सुरू आहे. हौती बंडखोरांनी राजधानी सनावर कब्जा केला होता. राष्ट्राध्यक्ष अब्दरबू मंसूर हादी यांना देश सोडावा लागला होता. हुथी बंडखोरांनी येमेनचा उत्तर भाग काबीज केला आहे.
सौदी अरेबियाच्या राष्ट्राध्यक्षांचा हादी यांना पाठिंबा आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील फौजांनी 2015मध्ये हौती बंडखोरांविरुद्ध हवाई आक्रमण सुरू केलं. या फौजा आजही रोज हवाई आक्रमण करतात. हुथी बंडखोर सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला करतात.
गृहयुद्धामुळे येमेनमध्ये मानवी संकट गहिरं झालं आहे. येमेनच्या 80 टक्के लोकसंख्येला म्हणजेच 2 कोटी 40 लाख लोकांना मदतीची आवश्यकता आहे. जवळपास एक कोटी नागरिक उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत.
संयुक्त राष्ट्रांनुसार, 2016पासूनच्या संघर्षात 70हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)