डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया सुरू

अमेरिका, युक्रेन, डेमोक्रॅट्स, रिपब्लिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नॅन्सी पलोसी आणि डोनाल्ड ट्रंप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी महाभियोग सुरू करण्याची घोषणा केली.

डेमोक्रॅट्स म्हणजेच ट्रंप यांच्या प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार जो बिडेन आणि त्यांचा मुलगा हंटर यांच्याविरुद्धच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू करावी यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर आहे.

ट्रंप यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. मात्र या प्रतिस्पर्ध्यांसंदर्भात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केल्याचं ट्रंप यांनी मान्य केलं आहे. ट्रंप यांनी अमेरिकेच्या राज्य घटनेच्या कलमांचं उल्लंघन केलं आहे, असं नॅन्सी पलोसी यांनी म्हटलं आहे.

राष्ट्राध्यक्षांचं देशाप्रती उत्तरदायित्व असतं. ते नेमकं काय हे स्पष्ट व्हायला हवं. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही असंही त्या म्हणाल्या.

ट्रंप यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी किमान 20 रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या शब्दांत ट्रंप यांच्याच पक्षाच्या 20 खासदारांना पक्षाविरोधात तसंच राष्ट्राध्यक्षांविरोधात बंडखोरी करावी लागेल.

आतापर्यंत अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांना महाभियोग चालवून पदावरून हटवण्यात आलेलं नाही.

जो बिडेन यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेचं समर्थन केलं आहे. ट्रंप यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया चालवणं हे देशाचं दुर्दैव आहे. मात्र हे त्यांच्याच कर्माचं फळ आहे, असं म्हटलंय.

पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत जो बिडेन हे ट्रंप यांच्या दावेदारीला आव्हान देऊ शकतात.

अमेरिका, युक्रेन, डेमोक्रॅट्स, रिपब्लिक, ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नॅन्सी पलोसी

दरम्यान, हे राजकीयदृष्ट्या माझ्यासाठी सकारात्मक असेल असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, डेमोक्रॅट्स पक्षाच्या 235 खासदारांपैकी 145 महाभियोगाच्या बाजूने आहेत. महाभियोग प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात कनिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली तरी सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत असलेल्या सभागृहात पारित होणं अवघड आहे.

ओपिनियन पोल्सचे कल बघता अमेरिकेच्या नागरिकांना ही प्रक्रिया फारशी रुचलेली नाही.

ट्रंप यांच्याविरोधातलं नेमकं प्रकरण काय आहे?

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने सरकारच्या एका वॉचडॉग यंत्रणेकडे तक्रार केली होती. ट्रंप यांनी विदेशी राष्ट्राध्यक्षांशी एका अंतर्गत मुद्यावरून चर्चा केली, असं तक्रारीचं स्वरुप होतं. विदेशी नेता म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की असल्याचं नंतर उघड झालं.

इंटेलिजन्स इन्स्पेक्टर जनरल यांना व्हिसल ब्लोअरच्या तक्रारीत तथ्य आढळलं. त्यानुसार कारवाई करणं आवश्यक आहे यासाठी त्यांनी आवश्यक प्रक्रियेला सुरुवात केली.

अमेरिका, युक्रेन, डेमोक्रॅट्स, रिपब्लिक, ट्रंप

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप

व्हिसल ब्लोअरच्या तक्रारीची प्रत संसदेत देण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅट्स पक्षाच्या खासदारांनी केली होती, मात्र व्हाईट हाऊस तसंच न्याय विभागाने प्रती देण्यास नकार दिला.

ट्रंप आणि जेलेन्स्की यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र डेमोक्रॅट्स पक्षाचा असा आरोप आहे की जो बिडेन आणि त्यांच्या मुलाची कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू व्हावी यासाठी ट्रंप यांनी जेलेन्स्की यांच्यावर दबाव आणला. तसं न केल्यास युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदत रोखण्यात येईल अशी धमकी ट्रंप यांनी दिली, असा डेमोक्रॅट्सचा आरोप आहे.

जेलेन्स्की यांच्याशी बिडेन यांच्याबाबत चर्चा केल्याचं ट्रंप यांनी मान्य केलं तसंच युक्रेनची लष्करी मदत रोखण्याचंही त्यांनी मान्य केलं जेणेकरून युरोपने मदतीसाठी पुढे यावं यासाठी असं वागल्याचं ट्रंप यांचं म्हणणं आहे.

डेमोक्रॅट्स पक्षाने त्या फोनकॉलचा तपशील नीट पाहिलेला देखील नाही. हे माझ्याविरुद्धचं कारस्थान आहे असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर जे बोलणं झालं त्याचा तपशील जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)