ब्रिटनमध्ये शिक्षण घ्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी

ब्रिटनमध्ये शिकायला गेलेले विद्यार्था आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षं त्याच देशात राहून नोकरी शोधू शकतील. ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने नुकतीच अशी घोषणा केली.

या नव्या प्रस्तावामुळे 2012मध्ये तत्कालीन गृहमंत्री थेरेसा मे यांनी घेतलेला निर्णय रद्द होईल ज्याच्या अंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर 4 महिन्यात नोकरी मिळाली नाही तर देश सोडणं भाग होतं.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं की या नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता जोखायची आणि ब्रिटनमध्ये आपलं करिअर सुरू करायची संधी मिळेल.

पण ब्रिटनमधला कँपेन ग्रुप 'मायग्रेशन वॉच'ने याला एक 'मागासलेलं पाऊल' म्हटलं आहे.

हा नवा नियम त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लागू होईल जे पुढच्या वर्षापासून ब्रिटनमध्ये ग्रॅज्युएशन किंवा त्यापुढच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील.

मागच्या वर्षी ब्रिटनमध्ये अशा विद्यार्थ्यांची संख्या जवळपास साडेचार लाख होती.

नव्या नियमांचा फायदा स्थलांतराचे नियम पाळले जातात की नाही याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवणाऱ्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळेल.

या प्रस्तावित नियमांतर्गत विद्यार्थ्यांची संख्या आणि ते कोणत्या प्रकारची नोकरी शोधू शकतील यावर कसलीही मर्यादा नाही.

बीबीसीचे ब्रिटनच्या गृहखात्यांच्या घडामोडींचे संपादक मार्क इस्टन यांनी सांगितलं की, "जर कोणालाही सध्याच्या सरकारने स्थलांतरितांच्या बाबतीत नवा दृष्टीकोन स्वीकारला आहे याचा पुरावा हवा असेल तर त्यांनी आजच्या या घोषणेकडे नजर टाकावी."

ईस्टन यांच्या म्हणण्यानुसार, "जिथे थेरेसा मे यांनी ब्रिटनमध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी कडक प्रवासी कायद्यांचा आधार घेताल तिथे बोरिस जॉन्सन मात्र प्रतिभावान आणि योग्य विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये राहाण्याची आणि काम करण्याची मुभा देत आहेत."

भारतीय विद्यार्थी काय म्हणतात?

बीबीसीसोबत बोलताना भारतातून आलेली विद्यार्थिनी श्रेया स्वामीने हा नवा प्रस्ताव भविष्याच्या दृष्टीने चांगला असल्याचं सांगितलं.

सोबतच आजचा दिवस आपल्यासाठी 'दुखःद दिवस' असल्याचंही श्रेया म्हणते कारण आधीपासून ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या दृष्टीने हा निर्णय खूप उशीरा घेण्यात आलाय.

श्रेयाने काही काळापूर्वीच 'युनिव्हर्सिटी फॉर द क्रिएटिव्ह आर्ट्स'मधून मार्स्टर्सची डिग्री घेतली. सध्याच्या नियमांनुसार चार महिन्यांच्या आत नोकरी शोधण्यासाठी तिला खूप प्रयत्न करावे लागल्याचं ती सांगते.

नोकरीचा अनुभव नसल्याने परदेशी विद्यार्थ्यांसाठी ब्रिटनमध्ये नगण्य नोकऱ्या असल्याचं श्रेया सांगते.

तिने सांगितलं, "करियर उभं करण्यासाठी मी गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या अडचणी झेलल्या आहेत ते मी शब्दांतही सांगू शकत नाही. चार महिन्यांच्या आत ब्रिटनमध्ये नोकरी मिळवणं अशक्य आणि अव्यवहार्य आहे. मला अगदी अगतिक वाटलं. शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये येण्याचा निर्णय घेऊन चूक झाली असं मला अनेकदा वाटतं. असं वाटतं की एक महागडी डिग्री घेऊन भारतात परतणार आहे."

बोरिस जॉन्सन सरकारच्या या निर्णयाची प्रशंसादेखील केली जातेय.

हे नवे प्रस्ताव काळानुरूप असून सरकाने जुनी चुकीची धोरणं अनेक वर्षांपूर्वीच बदलायलाच हवी होती, असं चॅन्सलर साजिद जाविद यांनी ट्विट केलंय.

माजी 'युनिव्हर्सिटी मिनिस्टर' जो जॉन्सन यांनी ट्वीट केलंय, "अखेर यश मिळालं." जो जॉन्सन हे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे बंधु आहेत आणि त्यांनी गेल्या आठवड्यात पदाचा राजीनामा दिला होता.

ब्रिटनमधले परदेशी विद्यार्थी

ब्रिटनमध्ये सध्या साडेचार लाखांपेक्षा जास्त परदेशी विद्यार्थी शिकत असल्याचा बीबीसी रिएलिटी चेक टीमचा अंदाज आहे. यातले दोन तृतीयांश विद्यार्थी युरोपियन युनियनच्या बाहेरचे आहेत आणि ब्रिटनमध्ये राहून शिक्षण घेण्यासाठी त्यांना स्टुडंट व्हिसा घ्यावा लागतो.

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य परदेशी विद्यार्थ्यांना इथे थांबून पुढचं शिक्षण घ्यायचं असल्याने दरवर्षी ब्रिटनमध्ये सुमारे 40,000 स्टुडंट व्हिसांचा कालावधी वाढवला जातो.

पण यासगळ्यानंतरही ब्रिटनमध्ये दरवर्षी एक लाखांहून अधिक असे परदेशी विद्यार्थी असतात जे आपल्या व्हिसाचा कालावधी वाढवून घेत नाहीत. ग्रॅज्युएशननंतर किती विद्यार्थी ब्रिटन सोडतात, याविषयी नेमकी माहिती मिळू शकली नाही.

पण ब्रिटनच्या नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय)नुसार सुमारे 97% विद्यार्थी योग्य कालावधीत ब्रिटनमधून बाहेर पडतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)