You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्ताननं घेतली बॅलेस्टिक मिसाईल गझनवीची चाचणी
भारतानं काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर हा मुद्दा सातत्यानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठासमोर मांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्ताननं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र गझनवीची चाचणी घेतली आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून क्षेपणास्त्र चाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी या चाचणीचा एक व्हीडिओही ट्वीट केला आहे.
गझनवी हे क्षेपणास्त्र 290 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतं, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या क्षेपणास्त्रावरुन हत्यारं वाहून नेता येतात. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, अशीही माहिती या ट्वीटमधून दिली आहे.
ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की गझनवीच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान इमरान खान यांनी पूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.
काय असतं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र?
या क्षेपणास्त्राचा आकार प्रचंड मोठा असतो आणि ते मोठ्या वजनाचे बाँब वाहून नेऊ शकतात. एकदा सोडल्यानंतर हे क्षेपणास्त्र नष्ट करता येत नाही.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासोबत त्याचं इंधनही असतं आणि त्यात वापरला जाणारा ऑक्सिजनही सोबतच असतो.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्यानंतर हवेमध्ये अर्धचंद्राकार मार्गानं आगेकूच करतं आणि रॉकेटसोबत त्याचा संपर्क तुटल्यानंतर त्यावर असलेला बाँब गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावामुळं जमिनीवर पडतो.
याच कारणामुळं एकदा सोडल्यानंतर या क्षेपणास्त्राच्या लक्ष्यावर कोणतंच नियंत्रण राहत नाही.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर हा मुख्यत्वे अणुबाँब वाहून नेण्यासाठी होतो, मात्र कधीकधी पारंपरिक हत्यार वाहून नेण्यासाठीदेखील ही क्षेपणास्त्रं वापरली जातात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)