पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन अली करणार भारताच्या शामिआ आरझूशी लग्न

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन अली 'भारताचा जावई' होणार आहे. हसन अली आणि दिल्लीजवळच्या फरिदाबाद इथे राहणाऱ्या शामिआ आरझू यांचं 20 ऑगस्टला दुबईत लग्न होणार आहे. शामिआ सध्या दुबईतच असते.
शमिआ एअरोनॉटिकल इंजिनिअर असून, फरिदाबादमधील मानव रचना संसद विद्यापीठात तिने शिक्षण घेतलं आहे. ती जेट एअरवेज कंपनीत काम करत होती. सध्या ती एमिरेट्स एअरलाईन्समध्ये एअरोनॉटिकल इंजिनिअर म्हणून काम करत आहे.
सात भावंडांपैकी एक असलेल्या आरझूचं शालेय शिक्षण फरिदाबादमधील सेक्टर 16 मधील सेंट पीटर्स शाळेत झालं. मानव रचना संसद विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर आरझूने काही काळ इंग्लंडमध्येही शिक्षणासाठी गेली होती.

फोटो स्रोत, Twitter
हसन आणि 26 वर्षीय शामिआचं लग्न रोजी दुबईत होणार आहे.
शामिआचे वडील लियाकत अली हे रिटायर्ड ब्लॉक ऑफिसर असून ते फरिदाबादमध्ये राहतात.
आरझूचे कुटुंबीय चांदेनी गावचे म्हणजेच हरियाणातील मेवातचे आहेत. भारतीय मुलीशी लग्न करणारा हसन चौथा पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरणार आहे. हसनच्या आधी झहीर अब्बास, मोहसीन खान, शोएब मलिक यांनी भारतीय मुलीशी लग्न केलं होतं.
दोन्ही कुटुंबांची यंदा दुबईत भेट झाली. त्यानंतर लग्नाची बोलणी पक्की करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
आरझूच्या पूर्वजांपैकी एक खान बहादूर फाळणीनंतर पाकिस्तानात रवाना झाले. ते पाकिस्तानातील कसूर जिल्ह्यातील कोठी नायकी गावात स्थायिक झाले. खान बहादूर यांचे चिरंजीव सरदार तुफैल आणि आरझू कुटुंबीय यांचे चांगले संबंध होते. तुफैल पाकिस्तान रेल्वे बोर्डाचे चेअरमन होते.
शामिआ सतत हवेत भरारी घेण्याविषयी बोलत असे. हरियाणाचीच लेक असणाऱ्या कल्पना चावलाकडून तिने प्रेरणा घेतल्याचं सांगितलं जातं. तिला हवाई भरारीचं विलक्षण आकर्षण आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती दुबईत आहे.
दरम्यान हसन पाकिस्तानातील गुजरानवाला भागात राहतो. हसनच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
हसनने या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत सस्पेन्स संपुष्टात आणला. "20 ऑगस्टला आम्ही विवाहबद्ध होत आहोत. आम्हाला हा घरगुती स्वरुपाचा सोहळा करायचा होता. मात्र आता प्रसारमाध्यमांना याची कल्पना आहे. वर्षभरापूर्वी शामिआ आणि माझी भेट झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मी तिला लग्नाची मागणी घातली. आमच्या कुटुंबीयांनी या नात्याला मान्यता दिली," असं हसनने सांगितलं.
हसनने 2016 मध्ये पाकिस्तानसाठी वनडे आणि ट्वेन्टी-20 पदार्पण केलं. दोन वर्षांपूर्वी हसनने कसोटी पदार्पण केलं. स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध हसन नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचा भाग होता. भारताविरुद्धच्या लढतीत मात्र त्याची कामगिरी सुमार झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
हसनने 9 टेस्ट, 53 वनडे आणि 30 ट्वेन्टी-20 लढतीत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे.
हसन पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत पेशावर झाल्मी संघासाठी खेळतो. कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत हसन सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघाचं प्रतिनिधित्व करतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








