पाकिस्तान: रावळपिंडीत लष्करी विमान रहिवासी भागात कोसळलं, 18 ठार

महिला दुःख व्यक्त करताना

फोटो स्रोत, Reuters

'पहाटेचे दोन वाजले होते, पण मी जागा होतो. विमान माझ्या घरावरून गेलं. त्याने हवेतच पेट घेतला आणि माझ्या डोळ्यांदेखत ते शेजारच्या घरावर पडलं. तो आवाज खूप भयानक होता. ते एक छोटं विमान होतं. आमच्या शेजारीच राहणाऱ्या कुटुंबीयांच्या घरावर ते पडलं."

हे शब्द आहेत रावळपिंडीतल्या गुलाम खान यांचे.

पाकिस्तानी लष्करी तळाजवळच्या रहिवासी भागात राहणाऱ्या खान यांच्या घरापासून थोड्याच अंतरावर पाकिस्तानी लष्कराचं विमान पडलं. या दुर्घटनेत सुमारे 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 क्रू मेंबर आणि 13 रहिवाशांचा समावेश आहे, असं बचावपथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

'द किंग एअर 350 टर्बोप्रॉप' नावाचं हे विमान प्रशिक्षणासाठी झेपावलं होतं. रावळपिंडीच्या विमानतळावर उतरण्यासाठी हवेत तीव्र वळण घेत असताना विमान खालच्या रहिवासी भागात कोसळलं. विमान पडण्यापूर्वी त्याच्या मागील भागात आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे. हे विमान पाकिस्तानी लष्कराच्या वायुसेनेचं होतं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. तसंच जखमींनी तातडीनं बरं होण्यासाठी प्रार्थना केल्याचं पाकिस्तान सरकारने ट्विटर करून सांगितलं.

विमान कसं क्रॅश झालं?

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, विमान रात्री दोनच्या सुमारास (07.00 GMT) रहिवासी भागात कोसळलं.

यासीर बलोच सांगतात, "विमानाच्या शेपटीने पेट घेतला होता. दोन ते तीन सेकंदातच ते समोरच्या चार घरांवर पडलं आणि आग लागली.

दुर्घटनेतून वाचलेल्या यामीन यांच्या घरातील तीन सदस्य मृत्युमुखी पडले. विमान पडून आग लागलेली असताना यामीन, त्यांची पत्नी, आई-वडील बाहेर पडले. मात्र त्यांचे भाऊ आणि कुटुंबीय बाहेर पडू शकले नसल्याचं त्यांनी सांगितलं.

रावळपिंडी मॅप

फोटो स्रोत, Google

घटनास्थळाहून AFP वृत्तसंस्थेचा एक वार्ताहर सांगत आहे, "दुर्घटनेनंतर बराच वेळ घटनास्थळी धुराचे लोट निघत आहेत. विमानाचे अवशेष आजूबाजूला पसरलेले अजूनही पाहू शकता."

दुर्घटनेत बळी पडलेल्यांचे मृतदेहांचा कोळसा झाला आहे. त्यामुळे ओळख पटवण्यासाठी 'DNA टेस्ट' करण्याची गरज असल्याची माहिती बचावपथकाचे प्रवक्ते फारूख बट यांनी दिली.

पाकिस्तानातील एअर क्रॅशचा इतिहास

पाकिस्तानला आतापर्यंत अनेकदा विमान कोसळण्याच्या घटनांना सामोरं जावं लागलं आहे.

2010 मध्ये 'एअरब्ल्यू' कंपनीचं विमान इस्लामाबादजवळ कोसळलं होतं. त्यामध्ये तब्बल 152 जणांचा मृत्यू झाला होता. ही पाकिस्तानातील सर्वांत मोठी हवाई दुर्घटना मानली जाते.

विमान दुर्घटना

फोटो स्रोत, AFP

2012 मध्ये बोईंग 737-200 हे 'भोजा एअर' कंपनीचं विमान खराब हवामानामुळे लॅंडींग करता न आल्यामुळे क्रॅश झालं. त्यामध्ये 121 प्रवाशांचा मृत्यू झाला.

तर 2016 मध्ये 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स'चं विमान हवेतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं. त्यामध्ये 47 प्रवाशांना आपल्या प्राणास मुकावं लागलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)