वर्ल्ड कप 2019: इंग्लंड अडचणीत; मॉर्गनही माघारी

इंग्लंड, न्यूझीलंड, वर्ल् कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जॉनी बेअरस्टो
    • Author, नितीन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, लंडनहून

क्रिकेट वर्ल्ड कप 2019च्या अंतिम लढतीत न्यूझीलंडने दिलेल्या 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था 89/4 अशी झाली आहे.

जेसन रॉय (17), जॉनी बेअरस्टो (36), जो रूट (7), इऑन मॉर्गन (9) यांच्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही.

बेन स्टोक्स आणि जोस बटलर खेळत आहेत.

पाऊस पडून गेल्यामुळे ढगाळ वातावरण आहे. खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आल्याने गोलंदाजांना साथ मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र केन विल्यमसनमुळे कोणताही धोका न पत्करता बॅटिंगचा निर्णय घेतला.

दोन्ही संघांनी सेमी फायनलमध्ये खेळवलेल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे वर्ल्ड कप नवा विजेता मिळेल.

इंग्लंड, न्यूझीलंड, वर्ल् कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.

दरम्यान ख्रिस वोक्सने मार्टिन गप्तीलला एलबीडब्ल्यू केलं. स्पर्धेत धावांसाठी झगडणाऱ्या गप्तीलचा संघर्ष वोक्सने संपुष्टात आणला. त्याने 19 धावा केल्या.

न्यूझीलंडने सेमी फायनलच्या लढतीत भारतीय संघाला नमवलं तर इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला होता.

15 गुणांसह अव्वल स्थानी असूनही, भारतीय संघाने सेमीफायनलच्या सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली आणि न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला विश्वचषकातून पॅकअप करण्यास भाग पाडलं.

पाकिस्तानचेही न्यूझीलंडइतकेच 11 गुण होते, म्हणजे सेमीफायनलसाठी त्यांनीसुद्धा आपलं तिकीट जवळपास पक्कं केलं होतं. पण कमी नेट रनरेटमुळे ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या चारमध्ये येऊ शकले नाहीत आणि त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.

दुसरीकडे, दहा दिवसांपूर्वी यजमान इंग्लंड विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर होती. मात्र, आता तोच संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात चषक जिंकण्याच्या इच्छेने लॉर्ड्स मैदानात उतरणार आहे.

असंच किवीजच्या बाबतीत घडलंय. त्यांनी विश्वचषकाच्या मध्यापासून चांगली खेळी करण्यास सुरुवात केली आणि आता ते विजयापासून अवघा एक पाऊल दूर आहेत. मात्र, न्यूझीलंडला हे चांगलं ठाऊक आहे की, आपण इंग्लंडच्या विरुद्ध खेळणार आहोत आणि सामना काही सहजसोपा नसेल.

न्यूझीलंडने काय करायला हवं?

ज्या संघाच्या सलामीवीर जोडीने धडाकेबाज खेळी केली, त्या संघाने बहुतांश सामने जिंकले, असं या विश्वचषकाने पुन्हा एकदा सिद्ध केलं. अर्थात, समोरील संघाचे गोलंदाज फॉर्ममध्ये असताना, एखाद्या खेळाची सुरुवात थरारक आणि धडाकेबाज करण्याची आवश्यकता नाहीय.

याचं कारण इंग्लंडचे गोलंदाज सर्वांत घातक ठरू शकतात. विशेषत: वोक्स, आर्चर आणि स्टोक्स यांची गोलंदाजी लॉर्ड्स मैदानात चालते. याचा अर्थ न्यूझीलंडच्या सलामीवीरांना अंतिम सामन्यात सांभाळून खेळलं पाहिजे.

इंग्लंड क्रिकेट संघ

फोटो स्रोत, Getty Images

न्यूझीलंडसमोर सर्वांत पहिलं आणि मोठं आव्हान हे आहे की, त्यांचा सलामीवर मार्टिन गप्टील हा या विश्वचषकात फार काही चमक दाखवू शकला नाही. विश्वचषकात न्यूझीलंडने आतापर्यंत नऊ सामने खेळले आणि या नऊही सामन्यात गप्टील केवळ 167 धावा करू शकला.

गप्टीलने विश्वचषकात आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक ठोकलं. मात्र, सेमीफायनलमध्ये गप्टीलने फेकलेल्या चेंडूने स्टम्प उडवला आणि धोनी धावबाद झाला, ही गप्टीलची मोठी कामगिरी मानायला हवी. त्याच्या या नेमामुळे भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडला आणि किवीजचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला.

महेंद्रसिंह धोनी आतापर्यंत 300 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला आहे आणि 297 वेळा तो मैदानात फलंदाजीसाठी उतरला होता. यात धोनी आतापर्यंत 16 वेळा धावबाद झाला आहे.

विश्वचषकातील आपल्या निराशाजनक कामगिरीबद्दल स्वत: गप्टील म्हणतो, "मी जे करतोय, ते अधिक उत्तमपणे करण्याचा प्रयत्न करतोय. अधिक लक्ष देऊन सराव करतोय आणि मला आशा आहे की, पुढल्या सामन्यात चांगल्या खेळीसाठी सर्व नीट जुळून येईल."

न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीतील दुसरा फलंदाज अर्थात निकोलस हा सुद्धा चिंतेचं कारण बनू शकतो. कारण गेल्या तीन सामन्यात त्याने केवळ 12 धावा केल्या आहेत.

केन विल्यम्सन

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात, फलंदाजांच्या क्रमवारीत फेरबदल करणं न्यूझीलंडच्या थिंकटँकला अवघड गोष्ट असेल. कारण विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कुठलेही प्रयोग करणं महागात पडू शकतं.

पहिली फलंदाजी असो किंवा इंग्लंडने उभारलेल्या आव्हानांचा पाठलाग करणं असो, न्यूझीलंडच्या सलामीवीर जोडीने दमदार खेळी करावी, अशीच प्रार्थना बहुधा कर्णधार केन विल्यम्सन करत असेल.

यंदाच्या संपूर्ण विश्वचषकात केन विल्यम्सनचा फॉर्म जबरदस्त राहिला आहे आणि त्याने गोलंदाजीतही दबदबा राखला आहे.

या विश्वचषकात आतापर्यंत विल्यम्सनच्या नावावर दोन शतकं आणि दोन अर्धशतकं नोंदवली गेली आहेत. त्याने आतापर्यंत 90 च्या सरासरीने खेळी केली आहे. विल्यम्सनची विकेट घेण्यावर इंग्लंडच्या गोलंदाजांचा अधिक भर असेल आणि न्यूझीलंडसाठी तो मोठा फटका ठरू शकतो.

फलंदाजीसाठी थोडं लवकर येऊन मैदानात स्थिरावण्यासाठी विल्यम्सननं मानसिकरित्या तयारी केली पाहिजे, जसं त्याने सेमीफायनलमध्ये भारताविरोधात आणि आधीच्या सामन्यांमध्येही केलं होतं.

स्टोक्स आणि लियाम प्लंकेट यांसारख्या इंग्लंडच्या गोलंदाजांचे अधिकाधिक प्रयत्न विल्यम्सनची विकेट काढण्यासाठी असतील. त्याचवेळी, आदिल रशीदच्या गुगलीपासूनही सावध राहायला हवं.

आदिल रशीद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आदिल रशीद

न्यूझीलंडच्या मधल्या फळीवर लक्ष टाकल्यास, रॉस टेलर महत्त्वाचा ठरणार आहे. सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध रॉस टेलरने 74 धावांची दमदार खेळी केली होती. इंग्लंडचा गोलंदाज आदिल रशीद याच्या निशाण्यावर प्रामुख्याने रॉस टेलर हाच असेल.

यंदाच्या विश्वचषकात 400 धावांसह निशाम आणि ग्रँडहोमने विक्रमी भागीदारी केली आहे. या दोघांनी पाचव्या आणि सहाव्या स्थानी मैदानात उतरुन फलंदाजी केल्यास संघाला सुस्थितीत ठेवण्यात मदत होईल.

सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासह न्यूझीलंडने गोलंदाजीतही या विश्वचषकात चांगली कामगिरी करून दाखवली.

ट्रेंट बोल्ड सध्य त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे आणि त्याला फर्ग्युसन आणि हेन्रीची सुद्धा चांगली साथ मिळतेय. यांनीच ट्रॅफोर्डवर भारतीय संघाची टॉप ऑर्डर कोसळवली होती. या तिघांच्याही निशाण्यावर इंग्लंडचे सलामीवर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो हे असायला हवेत.

जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो या सलामीवीरांनी इंग्लंडला सर्व महत्त्वाच्या सामन्यात निर्णायक खेळी करून दिलासा दिला आहे.

जेसन रॉय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेसन रॉय

रूट, मॉर्गन आणि स्टोक्स हेही इंग्लंडच्या मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज आहेत.

इंग्लंडच्या संघातील फक्त जॉस बटलर फॉर्म हरवल्याचं दिसतं आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून बटलरने आशादायी सुरुवात केली होती. मात्र, मागच्या पाच सामन्यात बटलर धावांसाठी प्रचंड संघर्ष करताना दिसतोय. तो मागच्या पाच सामन्यात एकूण 68 धावाच करू शकला.

इंग्लंडच्या फलंदाजीची मधली फळी धावसंख्या वाढवणार नाही, यासाठी निशामने प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात, सॅन्टनरने सुद्धा त्याला साथ दिली पाहिजे.

दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन बाऊन्सरमुळे त्रस्त असल्याचा दिसून आलं. त्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी या गोष्टीवर लक्ष ठेवायला हवं.

सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांबाबत बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, "जर गोलंदाजांसाठी स्थिती अनुकूल असेल आणि धावसंख्याही पुरेशी असेल, तर ते खतरनाक ठरू शकतात, हे तुम्ही सेमीफायनलमध्ये पाहिलंच असेल."

लॉर्ड्सवरच इंग्लंडने न्यूझीलंडला 119 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानात उतरण्याआधीच इंग्लंड मानसिकरीत्या सक्षम असेल, हे निश्चित.

मात्र, इंग्लंडला हेही चांगलं माहीत असणार की, यापूर्वी लॉर्ड्सवर खेळलेल्या एकूण सामन्यांपैकी निम्म्यापेक्षा कमी सामने आपण जिंकलो आहोत. इंग्लंडची लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यांची कामगिरी काही खास नाही.

आणि हो, इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना याच विश्वचषकात लॉर्ड्सवर पराभव पत्कारावा लागला आहे. या दोन्ही संघांना ऑस्ट्रेलियन संघाने पराभूत केले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)