वर्ल्ड कप 2019 लाईव्ह: रोहित-राहुलच्या शतकासह टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या शतकी खेळींच्या बळावर टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. रोहितने 103 तर राहुलने 111 धावांची खेळी केली.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 264 धावांची मजल मारली. अँजेलो मॅथ्यूजने 113 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी साकारत टीम इंडियाने दणदणीत विजय साकारला.

वर्ल्ड कपमध्ये पाच शतकी खेळी साकारणारा रोहित शर्मा पहिलावहिला फलंदाज ठरला. श्रीलंकेविरुद्ध राजिथाच्या गोलंदाजीवर चौकार खेचत रोहितने यंदाच्या वर्ल्ड कपमधलं पाचवं शतक पूर्ण केलं. राहुलनेही रोहितकडून प्रेरणा घेत शतक झळकावलं.

मात्र शतकानंतर लगेचच रोहित रजिथाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 14 चौकार आणि 2 षटकारांसह 103 धावांची खेळी केली.

रोहितच्या बरोबरीने राहुलने शतकी खेळी साजरी केली. मलिंगाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत राहुलने वर्ल्ड कपमधली पहिलीवहिली शतकी खेळी साकारली. राहुलने 11 चौकार आणि एका षटकारासह 111 धावांची खेळी केली.

वनडे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने कारकीर्दीतील तिसरं शतक साजरं केलं. हार्दिकच्या गोलंदाजीवर चौकार खेचत मॅथ्यूजने शतक पूर्ण केलं. मॅथ्यूजच्या शतकाच्या बळावर श्रीलंकेने 264 धावांची मजल मारली. भारतातर्फे जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

4 बाद 55 अशा स्थितीतून मॅथ्यूजने डाव सावरला. लहिरु थिरिमानने 53 तर धनंजय डिसिल्व्हाने 29 धावा करत मॅथ्यूजला चांगली साथ दिली.

मॅथ्यूजने 10 चौकार आणि 2 षटकारांसह 113 धावांची मॅरेथॉन खेळी केली.

शेवटच्या साखळी लढतीत भारताविरुद्ध श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवला संघात समाविष्ट केलं आहे. युझवेंद्र चहल आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच ओव्हरमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेला बाद केलं. पुढच्याच ओव्हरमध्ये बुमराहने कुशल परेराला धोनीकडे झेल देण्यास भाग पाडलं.

बुमराहने 57व्या वनडेत 100 विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम केला. यापेक्षा कमी वनडेत 100 विकेट्स मिळवण्याचा भारतीय विक्रम मोहम्मद शमीच्या (56व्या वनडेत) नावावर आहे.

युझवेंद्र चहलऐवजी खेळणाऱ्या रवींद्र जडेजाने पहिल्याच ओव्हरमध्ये कुशल मेंडिसला बाद केलं. त्याने 3 धावा केल्या. हार्दिकच्या फसव्या बाऊन्सरवर आविष्को फर्नांडोने धोनीकडे झेल दिला.

अँजेलो मॅथ्यूज आणि लहिरु थिरिमाने यांनी पाचव्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी करत डाव सावरला. थिरिमानेला कुलदीप यादवने आऊट केलं. त्याने 53 धावांची खेळी केली.

भारतीय संघ याआधीच सेमी फायनलसाठी पात्र झाला आहे. दुसरीकडे श्रीलंकेचे सेमी फायनलचे मार्ग बंद झाले आहेत.

भारतीय संघाला श्रीलंकेला नमवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. सेमी फायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंड किंवा न्यूझीलंड यांचा सामना करायचा आहे.

श्रीलंकेने या लढतीसाठी जेफ्री व्हँडरसे याच्याऐवजी थिसारा परेराला संधी दिली आहे.

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना आहे. बांगलादेशविरुद्धची मॅच जिंकत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. श्रीलंकेविरुद्धची मॅच निव्वळ औपचारिकता आहे.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांना नमवलं. न्यूझीलंविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

दुसरीकडे श्रीलंकेचं सेमी फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. श्रीलंकेने 8 मॅचपैकी तीन जिंकल्या आहेत तर तीनमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. दोन मॅच पावसामुळे रद्द झाल्या.

हे वाचलंत का?

बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)