You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या 15 वर्षांच्या मुलीने हरवलं व्हिनस विल्यम्सला
कोरी 'कोको' गॉफ सध्या चर्चेत आहे. कारण विम्बल्डनमध्ये 15 वर्षांच्या कोरीने पाच वेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या व्हिनस विल्यम्सला हरवलं.
1968मध्ये 'ओपन एरा'ला म्हणजे महत्त्वाच्या टूर्नामेंट्समध्ये व्यावसायिक खेळाडूंसोबत नवख्यांना खेळू द्यायला सुरुवात झाली.
15 वर्षं आणि 122 दिवस वय असणारी कोरी गॉफ ही तेव्हापासून आतापर्यंतची विम्बल्डनसाठी पात्र होणारी सर्वात लहान खेळाडू ठरली आहे. विम्बल्डन पाच वेळा जिंकणाऱ्या व्हिनस विल्यम्सचा तिने 6-4,6-4 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
"लोक गेली अनेक वर्षं कोकोबद्दल बोलत आहेत," दोन वेळा युएस ओपन जिंकलेली अमेरिकन खेळाडू ट्रेसी ऑस्टिनने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"आता तिला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. ती अर्थातच एक चांगली अॅथलिट आहे, पण कोर्टवर उतरून ती जिला आदर्श मानते त्या व्हिनसचा सामना करणं ही कठीण गोष्ट आहे."
"ती खूप मोठी होणार आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे."
तीन वेळा विम्बल्डन जिंकणारे जॉन मॅकेंरो म्हणतात, "गॉफ ही फक्त शारीरिकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही सक्षम आहे. तिचा खेळ मी पाहिला. जर ती 20 वर्षांची होईपर्यंत पहिल्या क्रमांकाची खेळाडू बनली नाही, तर मला आश्चर्य वाटेल."
खेळाचा वारसा लाभलेली गॉफ सात वर्षांची असल्यापासून टेनिसचं प्रशिक्षण घेत आहे. तिचे वडील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीसाठी बास्केटबॉल खेळायचे. तिची आई कँडी ही पूर्वी जिमनॅस्ट होती, आणि नंतर अॅथलेटिक्समध्ये भाग घ्यायची. या दोघांची लेक दोन वर्षांपूर्वी महत्त्वाच्या टूर्नामेंट्स खेळू लागली. 13 वर्षांची असताना ती युएस ओपन गर्ल्स सिंगल्स फायनल मध्ये पोहोचणारी सर्वात लहान खेळाडू ठरली. गेल्या वर्षी तिने मुलींसाठीची फ्रेंच ओपन जिंकली. त्यावेळी तिने नुकताच 14वा वाढदिवस साजरा केला होता.
यावर्षी गॉफचं ध्येय होतं विम्बल्डनसाठी पात्र ठरणं. पण तिच्या 301 क्रमांकाच्या रँकिंगमुळे तिला संधी मिळण्याची शक्यता कमी होती. पण आपल्याला वाईल्ड कार्ड मिळाल्याचं एकदा ऑनलाईन शॉपिंग करत असताना तिला समजलं.
पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तिने 6-1, 6-1 ने बेल्जियमच्या ग्रीट मिन्नेनवर विजय मिळवला. ग्रीटचं जागतिक रँकिंग होतं 129. आणि गंमतीची गोष्ट म्हणजे ही मॅच खेळण्याआधी रात्री 11 वाजता कोकोने विज्ञानाची परीक्षा दिली होती.
अटलांटामध्ये जन्मलेल्या कोकोच्या आदर्श आहेत व्हीनस आणि सेरेना या विल्यम्स भगिनी. म्हणूनच जेव्हा ड्रॉमध्ये कोकोची पहिली मॅच विल्यम्स भगिनींमध्ये मोठ्या असणाऱ्या व्हीनसविरोधात लागली, तेव्हा कोकोकडे जगाचं लक्ष वळलं.
या खेळातल्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असणाऱ्या व्हीनससमोर कोकोचा टिकाव लागणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला.
पण मॅचमध्ये सुरुवातीलाच तिला सूर गवसला आणि तिने पहिल्या सेटमध्ये तिने 3-2 अशी आघाडी घेतली होती तर दुसऱ्यामध्ये 5-4. आणि सरतेशेवटी तिचा जन्म व्हायच्या आधीच ज्या खेळाडूने 4 ग्रॅण्ड स्लॅम जिंकल्या होत्या अशा खेळाडूला तिने हरवलं.
आपण व्हीनस विल्यम्सला हरवलं या कल्पनेनेच गॉफ 'सुपर शॉक्ड' होती.
मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना तिने सांगितलं, "मला माझ्या स्वप्नातला ड्रॉ मिळाला. मला याचाच आनंद आहे की मला यशस्वी होणं जमलं. व्हीनस खूपच छान खेळली आणि माझ्यासोबत छान वागली. मी तिला पूर्वी एक-दोनदा भेटले होते तेव्हाही ती माझ्याशी छान वागली होती."
कोरी 'कोको' गॉफ विषयी
1991नंतर आता गॉफ ही विम्बल्डनमध्ये मॅच जिंकणारी सर्वात तरूण खेळाडू ठरली आहे. 1991मध्ये 15 वर्षांच्या अमेरिकन जेनिफर कॅप्रियाटीने 9 वेळा विम्बल्डन विजेत्या मार्टिना नवरातिलोवाचा पराभव केला होता.
गॉफचं बालपण अटलांटा, जॉर्जियामध्ये गेलं. त्यानंतर ती टेनिसखेळण्यासाठी फ्लोरिडाला आली.
गॉफचे सध्याचे कोच आहेत जिन-क्रिस्टोफ फॉरेल (माजी एटीपी खेळाडू आणि एड्रियन मनारिनोचे कोच )
तिला कोडी आणि कॅमरॉन हे दोन लहान भाऊ आहेत.
2018मध्ये तिने 3 प्रसिद्ध कंपन्यांसोबत काही वर्षांचा स्पॉन्सरशिपचा करार केला आहे.
या खेळात तिला का उद्दिष्ट गाठायचं आहे असं कोरीला विचारल्यानंतर ती म्हणाली, "मला सर्वोत्तम व्हायचा ध्यास आहे."
"मी हे करू शकते असं मला आठ वर्षांची असतानाच माझ्या वडिलांनी सांगितलं होतं," गॉफ म्हणाली. सेरेना विल्यम्सचे कोच पॅट्रिक मोराटोग्लू आता तिला घडवत आहेत.
"अशा गोष्टींवर तुमचा कधीच विश्वास बसत नाही. मला अजूनही खात्री नाही की मी जिंकलेय," मॅच संपल्यावर कोरीने प्रतिक्रिया दिली.
माजी अमेरिकन खेळाडू चंदा रुबिन यांनीही गॉफचा प्रवास जवळून पाहिलेला आहे. त्यांनी सांगितलं, "हे काहीतरी भन्नाट आहे. ती फक्त 15 वर्षांची आहे, तिच्या पहिल्यावहिल्या ग्रॅण्ड स्लॅममधला मुख्य ड्रॉ, तोही व्हिनस विल्यम्सविरोधात. ती खूपच छान खेळली. मला वाटतंय की आपण भविष्यातला एक चॅम्पियन घडताना पाहतोय."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)