वर्ल्ड कप 2019: पावसामुळे भारत-पाकिस्तान मॅच तर रद्द होणार नाही ना?

    • Author, विनायक गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी मँचेस्टरहून

मॅंचेस्टरमध्ये लखलखीत सूर्यप्रकाश होता. संपूर्ण दिवसभर अगदी असंच वातावरण होतं. भरपूर प्रवास आणि बुलेटिनचे लाईव्ह झाल्यानंतर तेव्हा साडेसहा वाजले होते. बीबीसी मराठीसाठी फेसबुक लाईव्ह सुरू करणार तितक्यात 'तो' आला आणि माझी स्वप्न त्यात वाहून गेली.

गेले दोन दिवस माझा प्रचंड प्रवास सुरू आहे. एक देशातून दुसऱ्या देशात येणं, तसंच जिथे सामने होत आहेत त्या शहरातील प्रवास हे सगळं प्रचंड दमवणारं असलं तरी आनंददायी होतं.

ज्या सामन्याची इतक्या आतुरतेने वाट पाहता त्यासमोर थकवाबिकवा या सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. आज मी नाँटिंगहम ते मँचेस्टर प्रवास केला. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात सामना होणार आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्याची जितकी उत्कंठा आहे तितकी तो होईल की नाही याबाबत धाकधूक देखील माझ्या मनात आहे.

जा रे जा रे पावसा...

आज सकाळी जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा इथं पाऊस सुरू होता. मी मुंबईतच असल्याचा भास मला क्षणभर झाला. मग मला लक्षात आलं की मी मुंबईत नव्हे तर नाँटिंगहमला आहे. कालपासून इथे सतत पाऊस पडतोय.

जेव्हा मी आणि माझ्याबरोबर असलेला व्हीडिओ जर्नलिस्ट केव्हिन मँचेस्टरला जाणाऱ्या गाडीत जेव्हा बसलो तेव्हा तिथे एक भारतीय कुटुंबही आमच्याबरोबर प्रवास करत होतं. अखिल, ज्योती आणि त्यांची दोन मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला निघाले होते. मँचेस्टरला पाऊस पडणार नाही ही सुवार्ता मला अखिलनेच दिली. अतिशय काकुळतीने त्याने मला तापमानाची स्थिती सांगितली.

यावेळी वर्ल्ड कपमध्ये सातत्याने येणाऱ्या पावसामुळे चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरलं आहे. आम्ही मॅचबद्दल बोलतच होतो तेवढ्यात केव्हिन त्याच्या विशिष्ट ब्रिटिश शैलीत म्हणाला, "आज मँचेस्टरला पाऊस पडणार नाही हे ऐकून तुम्ही खूश आहात हे मला दिसतंय पण तापमानाच्या अंदाजानुसार रविवारी दुपारी दोन वाजेनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे," हे ऐकताच अखिलचा चेहरा पडला.

आठ तासांनंतर माझीही तशीच परिस्थिती झाली. आज पाऊस पडणार नाही हे ऐकताच चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. तापमानाचे अंदाज खोटे ठरतील अशी त्यांना आशा आहे. वर्ल्ड कप चुकीच्या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल सोशल मीडियावर लोक आयसीसीवर टीका करत आहेत. मात्र इंग्लंडमध्ये असं का होतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

इंग्लंडमध्ये तापमान असं का बदलतं?

काल केव्हिन माझ्याशी बोलता बोलता म्हणाला, "जर एखाद्या ब्रिटिश व्यक्तीशी संवाद सुरू करायचा असेल तर हवामानाबद्दल बोलायला लागा." ही कल्पना चांगली होती. केव्हिनच्या रूपात एक ब्रिटिश माझ्यासमोरच होता. मग मी त्यालाच इथल्या वातावरणाबद्दल विचारलं.

इंग्लंड हे एक प्रकारचं बेट असून ते चार प्रदेशांनी वेढलं आहे. उत्तरेला आर्क्टिक महासागर आहे, पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. पूर्वेला युरोप आहे, तर दक्षिणेला इंग्लिश खाडी आहे. या सर्व भागातून विविध प्रकारचे वारे इंग्लंडमध्ये येतात. हे वारे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्यामुळेच इथल्या तापमानाचा अंदाज बांधता येणं कठीण आहे. सध्या इंग्लंडमध्ये उन्हाळा आहे. मात्र उत्तर आणि पश्चिमेकडून वारे एकमेकांवर आदळल्यामुळे इथे पावसाळी आणि थंड वातावरण आहे.

मात्र ऋतू कोणताही असला तरी इंग्लंडमध्ये सतत पाऊस असतो. म्हणूनच की काय इथले लोक सतत एक छत्री बाळगून असतात.

रविवारी पाऊस पडेल का?

सध्या मँचेस्टरमध्ये पाऊस पडतोय आणि शनिवारीही पाऊस पडेल असा अंदाज बांधण्यात येत आहे. मात्र रविवार सकाळ आणि दुपार कोरडी असेल. रविवारी दुपारी दोन नंतर पाऊस येईल असा अंदाज बांधण्यात येत असला तरी पावसाची रिपरिप असेल की मुसळधार असेल याबदद्ल कुणीही ठामपणे सांगत नाहीये. शाहीद नावाच्या कॅब ड्रायव्हरने योग्य मुद्दा मांडला. त्याच्या मते पाऊस आला तरी सामना खेळवला गेला पाहिजे. 50 ओव्हर नाही झाले तरी अगदी वीस ओव्हर जरी झाले तरी सामना झाला पाहिजे.

असं असलं तरी सध्या मँचेस्टरला पाऊस आहे. त्यामुळे आता तरी वरूण राजा शांत होऊन चाहत्यांना भारत पाक सामन्याचा आनंद घेता येईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)