You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींचा मालदीव दौरा: ऐतिहासिक 'जुमा' मशिदीच्या जतनासाठी भारत करणार मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'रूल ऑफ निशान इज्जुद्दीन' देण्यात आला आहे.
मोदींनी ट्वीट करून म्हटलं आहे की मालदीवने आज माझा जो सन्मान केला आहे तो मी विनम्रतेने स्वीकारला आहे. हा फक्त माझा सन्मान नाही तर दोन्ही देशांच्या मैत्रीचा सन्मान आहे.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर दोन्ही देशांचा भर असेल असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.
मोदींनी सांगितलं की मालदीवसोबतच्या नात्याला भारतात विशेष स्थान आहे. भारत मालदीवला हरप्रकारे मदत करू इच्छितो. दोन्ही देशांचे संबंध सदैव असेच राहावेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत मालदीवमध्ये क्रिकेट स्टेडियम बांधून देणार आहे. तसेच विविध बेटांवर पाणी आणि साफसफाईची व्यवस्था करणार आहे. लघु उद्योगासाठी अर्थसाहाय्य करणे, वैद्यकीय सेवा पुरवणे तसेच विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था इत्यादी कामांसाठी भारत मालदीवला मदत करेल असं मोदींनी म्हटलं.
ऐतिहासिक जुमा मशिदीचं जतन करण्यासाठी भारताकडून पूर्ण सहकार्य केलं जाईल असं मोदींनी म्हटलं आहे.
शनिवार मोदींचं मालदीवची राजधानी माले येथे भव्य स्वागत झालं. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलेह यांनी त्यांचं स्वागत केलं.
मालेमध्ये वृत्तांकनासाठी गेलेले बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव म्हणाले की पंतप्रधान मोदींचा दौरा हा यासाठी महत्त्वाचा आहे की गेल्या आठ वर्षांत भारताच्या एकाही मोठ्या नेत्याने औपचारिकरीत्या मालदीवला भेट दिली नाही. गेल्या वर्षी मोदी हे राष्ट्राध्यक्ष सोलेह यांच्या शपथविधीला हजर होते पण हा औपचारिक दौरा नव्हता. 2011मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी औपचारिकरीत्या मालदीवला भेट दिली होती.
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष सोलेह यांना भारतीय क्रिकेटपटूंची स्वाक्षरी असलेली बॅट भेट म्हणून दिली.
सोलेह हे क्रिकेटप्रेमी आहेत म्हणून त्यांच्यासाठी भारतीय क्रिकेट टीमची स्वाक्षरी असलेली बॅट भेट म्हणून दिली आहे असं ट्वीट मोदींनी केलं.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश हा दोन्ही देशातल्या व्यापारी संबंधात सुधारणा करणं हा आहे असं श्रीवास्तव म्हणाले. मालदीवमध्ये गेले काही वर्ष अस्थिरतेचं वातावरण होतं. पण गेल्या वर्षी इब्राहम सोलेह हे निवडणुकीत जिंकले. त्यानंतर त्यांनी मोदींनी शपथविधीला बोलवलं. यानंतर सोलेह यांनी भारताचा दौरा केला. त्यावेळी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर करार देखील झाले.
नितीन श्रीवास्तव सांगतात, आतापर्यंत भारताने मालदीवला दीड अब्ज डॉलरचं अर्थसहाय्य केलं आहे. मालदीववर चीनचा प्रभाव आहे. तो कमी करण्यासाठी भारताने हे पाऊल उचललं असं देखील म्हटलं जातं. मालदीववर चीनचं तीन अब्ज डॉलरचं कर्ज आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)