Exit Poll: ऑस्ट्रेलिया निवडणुकीचे सर्व एक्झिट पोलचे आकडे जेव्हा दोनच दिवसांपूर्वी चुकले होते...

भारतात सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकीनंतर एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील NDAला बहुमत मिळणार, असं बहुतांश संस्थांचा अंदाज आहे.

मात्र हा अंतिम निकाल नसला तरी अनेक जाणकारांनी या आकड्यांवरही शंका उपस्थित केली आहे. एक्झिट पोलचे आकडे खरंच किती विश्वासार्ह असतात, याची प्रचिती दोनच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात आली.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत सर्व एक्झिट पोलची आकडेवारी फोल ठरली आणि सत्ताधारी पक्षाकडेच पुन्हा पंतप्रधानपद आलं. त्याची विविध कारण सांगितली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

ऑस्ट्रेलियात पंतप्रधानपदासाठी दर तीन वर्षांनी निवडणुका होता, पण गेल्या दहा वर्षांत तिथे पाचव्यांदा पंतप्रधान बदलण्यासाठी निवडणुका झाल्या.

निकालांपूर्वी जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोल्समध्ये विरोधी पक्ष म्हणजे मजूर पक्षाला मत मिळेल, असं भाकित वर्तवण्यात आलं होतं. किंबहुना गेल्या दोन वर्षांपासून विरोधी पक्ष सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवला होता.

पण प्रत्यक्ष मतमोजणीत सत्ताधारी लिबरल पक्षाच्या आघाडीलाच विजय मिळाला आणि विद्यमान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची पंतप्रधानपदी फेरनिवड झाली.

हे निकाल धक्कादायक तर होतेच, पण त्यामुळे तिथल्या एक्झिट पोल्सच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

ऑस्ट्रेलियात न्यूजपोल ही संस्था एक्झिट पोल घेण्याचं काम करते. लोकांची टेलिफोन वापरण्याची पद्धत काळानुरूप बदलल्यामुळे हे अंदाज चुकले, असं या संस्थेने ABC न्यूजशी बोलताना सांगितलं.

"प्रत्येकाकडे आता लँडलाईन नंबर नाही आणि असलेले नंबर अपूर्ण आहेत," असं या संस्थेचे प्रमुख ओशानेसी यांनी सांगितलं.

त्यांनी ही संस्था 2015 मध्ये सोडली. "त्यावेळी प्रोबॅबलिटीच्या तत्त्वावर सर्वेक्षण करण्यात यायचं. त्यावेळी देशातल्या कुणालाही फोन करून त्यांचं मत विचारलं जायचं," असं त्यांनी ABC न्यूजशी बोलताना सांगितलं.

ABC न्यूजचे निवडणूक तज्ज्ञ अँटनी ग्रीन यांच्यामतेही आधी सँपलिंगची पद्धत विश्वासार्ह होती. "आता मिळणारा प्रतिसादही कमी झाला आहे आणि मिळणाऱ्या माहितीचा दर्जा खालावला आहे," असं ते पुढे सांगत होते.

ग्रिफिथ विद्यापीठाच्या प्राध्यापक बेला स्टॅनिक यांनी डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा ट्रंप निवडून येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. लोकांची मतं जाणून घेण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यांच्या मते सोशल मीडिया ही लोकांची मतं जाणून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जागा आहे.

टास्मानियातील निवडणूक तज्ज्ञ केव्हिन बोन्हम यांच्यामते या घटना म्हणजे निवडणुकीतील अपयश आहे. सर्वेक्षणातील नमुना गोळा करण्यातील दिरंगाई, जे लोक राजकारणाशी संलग्न आहेत, त्यांचा या नमुन्यात (सँपल) समावेश करणं, ही काही महत्त्वाची कारणं त्यांनी नमूद केली.

स्पर्धकांपेक्षा आपण वेगळे दिसू नये, यासाठी इतर संस्थांच्या आकडेवारीच्या नजीक जाणारी आकडेवारी जुळवणं, हे देखील एक्झिट पोल चुकीचा येण्याची कारणं असल्याचं त्यांनी SBS न्यूजशी बोलताना सांगितलं.

जर स्वतंत्रपणे सर्वेक्षण केलं तर दुसऱ्या संस्थांशी निकाल जुळण्याची शक्यता अतिशय कमी असते, असंही बोन्हम यांना वाटतं.

तसंच या निवडणुकीत पोलिंग कंपन्यांनी लोकांच्या भावना व्यवस्थितपणे लक्षात घेतल्या नाहीत तसंच सोशल मीडियावरची मतं लक्षात घेतली नाहीत, असंही काही तज्ज्ञांना वाटतं.

ऑस्ट्रेलियात मतदान कसं होतं?

ऑस्ट्रेलियात नेहमी शनिवारीच मतदान होतं. यावेळी देशभरात 7 हजाराहून अधिक मतदान केंद्रं उभारण्यात आली होती. काही ठिकाणी प्री-पोलिंग बूथ असतात, जिथे तुम्ही मतदानाच्या तारखेपूर्वीच जाऊन मतदान करता येतं.

गेल्या निवडणुकांमध्ये अंदाजे 40 लाख लोकांनी प्री-पोलिंग बूथमध्ये जाऊन मतदान केलं होतं.

मतदान करणं हे बंधनकारक आहे. जर कुणी मतदान टाळलं तर त्या व्यक्तीला 14 डॉलरचा दंड पडतो. गेल्या निवडणुकीत 95 टक्के लोकांनी मतदान केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)