पाकिस्तानी रुपया गडगडला, नेपाळपेक्षाही कमकुवत झालं आहे पाकिस्तानी चलन

आर्थिक विश्वात अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या न्यूज पोर्टल ब्लूमबर्गनं पाकिस्तानी रुपया हे आशिया खंडातील सर्वांत कमकुवत चलन म्हणून घोषित केलं आहे.

गेल्या वर्षी पाकिस्तानी रुपयाची किंमत जवळपास 20 टक्क्यांनी घसरली. त्यामुळेच आशिया खंडातील 13 महत्त्वाच्या चलनांमध्ये पाकिस्तानी रुपया हा अतिशय कमकुवत ठरला आहे.

'जंग' या वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार पाकिस्तानी रुपया मे महिन्यातच 29 टक्क्यांनी घसरला.

पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळचं चलन मात्र स्थिर असल्याचं ब्लूमबर्गनं म्हटलं आहे.

डॉलरच्या तुलनेत अफगाणिस्तानी चलनाचं मूल्य 79, भारतीय रुपयाचं मूल्य 70, बांगलादेशी टाक्याची किंमत 84 तर नेपाळी रुपयाचं मूल्य 112 नोंदविण्यात आलं आहे.

दरम्यान गुरूवारी पाकिस्तानी शेअर बाजारात बरीच उलथापालथ पहायला मिळाली. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया घसरल्यामुळं शेअर बाजारही 800 अंकांनी घसरला. पाकिस्तानी शेअर बाजारात गेल्या दीड दशकात झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे.

डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 149 पर्यंत घसरल्यामुळे मार्केटमध्येही गोंधळाचं वातावरण होतं.

एक्सचेंज कंपनीज असोसिएशन ऑफ पाकिस्ताननं दिलेल्या माहितीनुसार खुल्या बाजारात एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत 151 इतकी झाली.

2008 च्या मंदीच्या आठवणींना उजाळा

अवघ्या दोन दिवसांतच पाकिस्तानी रुपयामध्ये पाच टक्क्यांनी घसरण झाल्यानं उद्योग आणि व्यावसायिक जगतालाही चांगलाच फटका बसला.

गेल्या 17 वर्षांतला शेअर बाजारामधला हा सर्वांत खराब आठवडा होता.

'डॉन' या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार रुपयाच्या सातत्यानं होत असलेल्या अवमूल्यनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इमरान खान यांचे आर्थिक विषयावरील सल्लागार डॉ. हाफिज शेख यांनी गुरूवारी शेअर मार्केटमधील व्यापाऱ्यांची भेट घेतली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं 'मार्केट सपोर्ट फंड' तयार करावा अशी मागणी शेअर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी डॉ. हाफिज शेख यांच्याकडे केली.

मार्केटमधील अस्थिरतेमुळं 2008 साली आलेल्या मंदीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.

स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार या भेटीमध्ये हाफिज शेख नॅशनल इन्व्हेस्टमेंट ट्रस्टला 20 अब्ज रुपयांची मदत करण्याचं आश्वासन दिलं.

या भेटीनंतर वित्तीय सल्लागार आणि शेअर बाजारातील व्यापाऱ्यांनी स्टेट बँकेचे नवे गव्हर्नर रजा बकीर यांची भेट घेतली.

बेल आउट पॅकेजच्या आधीच अवमूल्यन

डॉन या वृत्तपत्रानं या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीमध्ये सपोर्ट फंड, विनिमय दर आणि व्याज दरावर चर्चा झाली.

सोमवारी पत धोरणांची घोषणा करण्यात येईल, असं स्टेट बँकेने स्पष्ट केलं आहे.

व्याज दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आणि रुपयाचं सातत्यानं होत असलेलं अवमूल्यन या दोन पाकिस्तानी अर्थव्यवस्थेसमोरच्या समस्या आहेत.

वास्तविक पत धोरण मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार होतं. मात्र कोणतंही कारण न देता पत धोरणाची तारीख नियोजित वेळेच्या 10 दिवस आधी घेण्यात आली.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) बेल आउट पॅकेज घेऊन वाटाघाटी सुरू झाल्यापासून डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयामध्ये घसरण होत आहे.

पाकिस्तानी चलनाचं अवमूल्यन हे IMF सोबत 6 अब्ज डॉलरच्या वाटाघाटींवर झालेल्या सहमतीचा एक भाग आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आरिफ हबीब रिसर्च या संस्थेचे संचालक सैमुल्लाह तारीक सांगतात, की आता हे थांबायला हवं. रोज होणारं अवमूल्यन आणि सातत्यानं अवमूल्यनाच्या येणाऱ्या बातम्यांनी शेअर बाजाराच्या विश्वासाला तडा गेला आहे. त्यामुळं बरंच नुकसानही झालं आहे.

महागाई वाढण्याचा अंदाज

तारीक यांनी सांगितलं, की ऑटो, सिमेंट आणि औषधोद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे आयातदर वाढल्यामुळे ग्राहकांवर आर्थिक भार पडू शकतो.

या उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढल्याचा परिणाम अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

काही लोकांच्या मते अवमूल्यन आवश्यक आहे, मात्र ते एकाचवेळी करायला हवं, लांबत जायला नको.

एका ज्येष्ठ बँकरनं 'डॉन'शी बोलताना सांगितलं, की एका महिन्यापर्यंत डॉलरचं मूल्य 141 रूपये होतं. याकडे स्थैर्याचं लक्षण म्हणून पहायला हवं.

मात्र गेल्या दोन्ही तिमाहींमधील आर्थिक घडामोडींमुळं आयातकांच्या विश्वासाला तडा गेला आहे.

IMF सोबत ज्या काही वाटाघाटी झाल्या आहेत, त्या सर्वांसमोर मांडल्या जायला हव्यात आणि पूर्ण वर्षभरासाठी एकदाच अवमूल्यन व्हायला हवं, असं या बँकरने स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)