You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्यावर बंदी, मग कशी उडत आहेत भारतीय विमानं?
- Author, ताहीर इमरान
- Role, बीबीसी ऊर्दू, इस्लामाबाद
काश्मीरमधल्या पुलवामामध्ये झालेला कट्टरवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय वायुदलाने पाकिस्तानातल्या बालाकोटमध्ये केलेला वायू हल्ला या सर्व घटनांना तीन महिने पूर्ण होत आहेत.
मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव अजूनही कायम आहे. याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानने त्यांचं हवाई क्षेत्र प्रतिबंधित केलं आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय हवाई सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
या घटनांनंतर पाकिस्तानने शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानच्या नियंत्रणात असलेलं हवाई क्षेत्र सर्व प्रकारच्या उड्डाणांसाठी बंद केलं. काही दिवसांनंतर निर्बंध शिथील करत हवाई क्षेत्र अंशतः उघडण्यात आलं.
मात्र, तरीही भारताला लागून असलेला भाग हवाई प्रवासासाठी खुला केलेला नाही. भारतीय उड्डाणांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रावर लागू असलेले निर्बंध 30 मे पर्यंत न काढण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
पाकिस्तानने उचललेल्या या पावलामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणावर गंभीर परिणाम झाला आहे.
या प्रतिबंधामुळे हवाई उड्डाण कंपन्यांचा खर्च तर वाढला आहेच शिवाय प्रवासाचा वेळही वाढला आहे. अनेक नॉन-स्टॉप उड्डाणांना इंधन भरण्यासाठी थांबा घ्यावा लागतोय, याचाही खर्च वेगळा आहे.
पाकिस्तानच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका आसपासच्या राष्ट्रांना बसला आहे. कमी वेळेत पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी आता लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागतोय. तसंच पूर्वेकडे आणि अमेरिकेकडे जाणाऱ्या उड्डाणांवरही मोठा परिणाम झाला आहे.
सध्याची परिस्थिती
सध्या पाकिस्तानच्या पूर्व आणि भारताच्या पश्चिम सीमेवरून विमान उड्डाणाला परवानगी नाही. त्यामुळे जगभारतून येणारी विमानं या सीमेवरून न जाता दुसऱ्या मार्गाने जातात.
पाकिस्तानच्या सरकारने यासंबंधी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आम्ही सरकारच्या निर्देशांचं पालन करतो आणि सरकार यापुढे जो निर्णय घेईल, त्याचीच अंमलबजावणी करू, असं पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचं म्हणणं आहे.
यावेळी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करून कुठलंही विमान पूर्व सीमेकडून पश्चिम सीमेकडे आणि पश्चिम सीमेकडून पूर्वेकडे जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ काबूलहून दिल्लीकडे जाणारं विमान आता पाकिस्तान मार्गे नाही तर ईराण मार्गे अरबी समुद्रावरून दिल्लीकडे जातं.
पाकिस्तानात जाणारी किंवा पाकिस्तानवरून चीन, कोरिया किंवा जपानला जाणारी विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करू शकतात. मात्र, त्यांनाही पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरून जाण्याची परवानगी नाही.
निर्बंधांचा पाकिस्तानवर परिणाम
या निर्बंधामुळे पाकिस्तानातून पूर्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
पाकिस्तानातून अतिपूर्वेकडे किंवा ऑस्ट्रेलियात जाणारे प्रवाशी सहसा थाई एअरवेजच्या विमानांनी प्रवास करायचे. मात्र, या हवाई उड्डाण कंपनीने सध्या आपली सेवा खंडित केली आहे.
क्वालालांपूरहून लाहोरसाठी स्वस्त दरात तिकीट उपलब्ध करून देणारी मलेशियातली खाजगी विमान कंपनी मालिंडो एअरची सेवाही तात्पुरती बंद आहे. त्यामुळे या कंपनीच्या विमानांची तिकीटं काढलेले प्रवासी चिंतेत आहेत.
उड्डाण रद्द झाल्यानंतर प्रवाशांना त्यांचे पैसे परत करण्याऐवजी या कंपन्या त्यांना व्हाऊचर देत आहेत. हे व्हाऊचर ते दुसऱ्या प्रवासासाठी वापरू शकतात. मात्र पाकिस्तानसाठी, मालिंडाची सेवा स्थगित असल्याने या व्हाऊचर्सचा पाकिस्तानातल्या प्रवाशांना काहीच उपयोग नाही.
हाँगकाँग मधली कॅथे पॅसिफिक ही हवाई कंपनी पाकिस्तानसाठी हवाई सेवा सुरू करणार आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत त्याची शक्यता धूसरच आहे.
पाकिस्तानातील पूर्वी हवाई सीमा बंद असल्याने एअरलाईन्स कंपन्या आणि प्रवाशी यांना फटका बसला आहेच. शिवाय पाकिस्तानातल्या नागरी उड्डाण प्राधिकारणाचं 12 ते 15 अब्ज रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचं एकूण उत्पन्न 60 ते 70 अब्ज रुपयांच्या जवळपास आहे. यातला 30 ते 35% वाटा हा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपन्या हवाई सीमेच्या वापरासाठी जे भाडं देतात, त्याचा आहे.
कुणा-कुणावर परिणाम
या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसला आहे. निर्बंधामुळे पश्चिमेकडच्या देशातून येणाऱ्या विमान प्रवासाचे दर आणि वेळ दोन्ही वाढले आहेत.
भारतातून युरोपात जाणाऱ्या विमान प्रवासाचं अंतर जवळपास 22 टक्क्यांनी म्हणजे 913 किमीने वाढलं आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ जवळपास दोन तासांनी वाढला आहे.
लंडनहून दिल्ली किंवा मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना जवळपास 300 पाऊंड्स अधिक खर्च करावे लागत आहेत. तर लंडनहून दिल्लीच्या प्रवासाचा वेळ जवळपास दोन तासांनी वाढला आहे.
वर्जिन अॅटलांटिक एअरलाईन्सने लंडनहून दिल्लीला जाणाऱ्या एका प्रवाशाने बीबीसीला सांगितलं, "आम्हाला एक तिकीट जवळपास 200 पाऊंडांनी महाग पडलं. मात्र, त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रवासाचा वेळीही वाढला आहे, हे आम्हाला कुणीच सांगितलं नाही."
त्यांनी पुढे सांगितलं, "प्रवास सुरू असताना घोषणा झाली की पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावर प्रतिबंध लावण्यात आल्याने प्रवासाचं अंतर वाढलं आहे आणि यासाठी एअरलाईने खेद व्यक्त केला."
इतकंच नाही तर भारताच्या शेजारी असणाऱ्या अफगाणिस्तानसारख्या देशांसाठीच्या प्रवासाचं अंतरही वाढलं आहे.
भारतात हवाई सेवा पुरवणाऱ्या अफगाणिस्तानातल्या सर्व हवाई कंपन्यांनी एकतर आपली उड्डाणं रद्द केली आहेत किंवा त्यांची संख्या कमी केली आहे. कारण, ज्या प्रवासासाठी एक तास लागायचा त्यासाठी आता अडीच तासांहून जास्त वेळ लागतोय. त्यामुळे तिकीट दरही वाढले आहेत.
याशिवाय सिंगापूर एअरलाईन्स, ब्रिटिश एअरलाईन्स, लुफ्तांझा, थाई एअरवेज, वर्जिन अॅटलांटिक एअरलाईन्स यासारख्या आशिया, युरोप, अमेरिका आणि पूर्वेकडच्या अनेक विमान कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर देखरेख ठेवणाऱ्या ओपीएस ग्रुपने आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनांच्या डेटावरून एक अंदाज काढला आहे. त्यानुसार या निर्बंधामुळे रोज जवळपास 350 उड्डाणांवर परिणाम झालेला आहे.
उदारणार्थ लंडनहून सिंगापूरसाठीचं अंतर 451 किमीने वाढलं आहे. तर पॅरिसहून बँकॉकला जाणाऱ्या विमानाच्या अंतरात 410 किमीची वाढ झाली आहे. केएलएम, लुफ्तांझा आणि थाई एअरवेज कंपन्यांच्या उड्डाणांना किमान दोन तास अधिकचा वेळ लागतोय.
यातून मार्ग काढण्यासाठी एअरलाईन्स कंपन्यांनी वेगवेगळ्या विमानांचा आसरा तर घेतला आहेच. शिवाय सामानाच्या वजनाचे नियमही कठोर केले आहेत. कमी वजन असल्यास विमान कमीतकमी इंधनात जास्तीत जास्त अंतर कापू शकतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)