अखेर इस्लामिक स्टेटचा सीरियात पाडाव; तरीही धोका कायम

अमेरिकेच्या पाठिंब्यावर लढत असलेल्या कुर्डिश सैनिकांनी इस्लामिक स्टेटचा पाडाव केल्याचा दावा केला आहे.

सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसने (SDF) बागूज या इस्लामिक स्टेटच्या गडावर ताबा मिळवत आपला पिवळा झेंडा फडकावला आहे. जगभरातून आलेल्या जिहादींसाठी हे शेवटचं ठिकाण असल्याचं सांगण्यात येतं.

SDFच्या मते सीरियामध्ये सुरू झालेल्या अघोषित बंडखोरीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

मात्र सीरियातून हा गट पूर्णपणे स्वतंत्र झाल्यावरही वैश्विक पातळीवरही त्याचा धोका अजून कायम आहे. नायजेरिया, अफगाणिस्तान, आणि फिलिपिन्स आणि अन्य देशांत या संघटनेचं अस्तित्व आहे.

बागूज येथे विजयाची घोषणा करताना SDF चे प्रवक्ते अदनान आफरीन म्हणाले, "आज SDF अधिकृतरीत्या इस्लामिक स्टेटच्या विरोधात सर्व लढाया संपवून विजयाची घोषणा करत आहे. भौगोलिक रूपात आता उत्तर पूर्व सीरियात ISचं अस्तित्व संपलं आहे."

या लढाईत वायुदलाच्या माध्यमातून मदत करणाऱ्या अमेरिकेने हा दावा शुक्रवारीच केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 21 मार्चला एक फोटो जारी करत इस्लामिक स्टेटला नेस्ताबूत करण्यात यश मिळाल्याचं सांगितलं.

गेल्या वर्षीही ट्रंप यांनीही इस्लामिक स्टेटचा पाडाव करण्याचा दावा केला होता आणि अमेरिकेच्या सैन्याला परत बोलावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही काळ सैन्य ठेवणार असल्याची घोषणा ट्रंप यांनी केली होती.

कुर्डिश सैनिकांच्या नेतृत्वात SDFने पूर्व सीरियाच्या बागूजला IS च्या ताब्यातून सोडवण्याची मोहीम मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू केली होती. मात्र सामान्य लोक तिथे फसल्याचं लक्षात येताच सैनिकांचा कारवाई मंदावली होती.

हजारो महिला आणि लहान मुलांनी SDFच्या बचाव पथकात आसरा घेतला आहे. त्यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

हजारो मुलं फरार

सामान्य नागरिकांशिवाय इस्लामिक स्टेटचे अनेक सैनिक बागूज सोडून फरार झाले आहेत. जे तिथे होते ते लष्कराशी लढले. या लढाईदरम्यान अनेक आत्मघाती हल्ले झाले.

एक वेळ अशी होती की ISने सीरिया आणि इराकच्या 88 हजार चौ. किमी परिसरावर ताबा मिळवला होता.

आपल्या ताकदीच्या जोरावर इस्लामिक स्टेटच्या नियंत्रणात असलेला सीरिया आणि इराकचा परिसर ब्रिटन एवढा मोठा होता. तिथे एक कोटीपेक्षा अधिक लोकांवर ते बंदुकीच्या धारेवर राज्य आपलं राज्य चालवत होते. इस्लामिक स्टेटमधील हजारो मुलं अजूनही फरार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)