चीननं स्वतःच्याच विकासाचं लक्ष्य कमी केलं, सरकार म्हणालं 'धोरणात्मक निर्णय'

फोटो स्रोत, AFP
चीननं 2019 साठी आपल्या आर्थिक विकास दराचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. 2019 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 6 टक्के निर्धारित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी चीननं आर्थिक विकास दराचं उद्दिष्ट 6.5 टक्के निश्चित केलं होतं.
सरकारनं नॅशनल पीपल्स काँग्रेस अर्थात चीनच्या संसदेमध्ये आर्थिक वाढीसंबंधीचा अहवाल सादर केला.
देशामधील आर्थिक मंदीबद्दल लोकांची धारणा बदलण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचं पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात मांडलेल्या या अहवालात म्हटलं आहे. 5 फेब्रुवारीला हा अहवाल मांडण्यात आला होता.
"विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या संधींचा विचार करता चीन एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेमधील लवचिकता, संभाव्यता आणि सर्जनशीलता मुक्त करण्याची आवश्यकता आहे," असं या अहवालामध्ये म्हटलं आहे.
"आमच्यामध्ये अढळ इच्छाशक्ती आहे. कठीण काळामधून बाहेर पडण्यासाठी आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी हा गुण आवश्यक आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा मूलभूत ढाचा पक्का आहे आणि भविष्यातही दीर्घ काळ तो तसाच राहील," असं या अहवालामध्ये नमूद केलं आहे.
जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये चीनचा GDP वाढीचा दर हा 6.6 टक्के इतका होता. गेल्या 28 वर्षांतील हा सर्वांत नीचांकी दर होता.
यावरून चीनच्या आर्थिक प्रगतीचा चमत्कार आता ओसरत आहे, हेच स्पष्ट होत होतं. चीनच्या अर्थव्यवस्थेकडे आशेनं पाहणाऱ्या जगासाठी हा इशारा होता.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही (IMF) यासंबंधीचा इशारा देऊन ठेवला होता. चीनमधील विकासाचा दर मंदावला, तर जागतिक बाजारपेठेलाही मोठा धक्का बसेल, असं IMF नं म्हटलं होतं.
चीननं मात्र मंदावलेला विकासाच्या दिशेनं होणारी नियंत्रित वाटचाल ही आमच्या अपेक्षेनुसारच असल्याचं म्हटलं होतं.
अमेरिकेसोबत सुरू असलेलं व्यापार युद्ध, प्रचंड कर्ज आणि खासगी कंपन्यांना वित्त पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर कमी करण्यात आलेल्या विकासदराच्या उद्दिष्टाकडे पाहायला हवं.
धोरणात्मक निर्णय
दूरगामी धोरणाचा भाग म्हणून विकास दराचं उद्दिष्ट हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आल्याचं चिनी माध्यमांनी म्हटलं आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयीच्या अन्य सकारात्मक गोष्टींवरही चिनी माध्यमांनी भर दिला.
सरकारी वृत्त संस्था शिन्होआनं चीन हा "Xiaokang" चं आपलं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं भरधाव निघाला आहे, असं म्हटलं होतं. "Xiaokang" ही चिनी भाषेतील संज्ञा कम्युनिस्ट पक्षाकडून वापरली जाते. 'चिनी समाजातील प्रत्येक घटक हा सधन असावा', या पक्षाच्या उद्दिष्टासाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो.
चीन पूर्वी कधीही नव्हता एवढा या लक्ष्याच्या जवळ येऊन ठेपला आहे, असं शिन्होआ या वृत्तसंस्थेनं आपल्या विश्लेषणात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी याच दिवशी चीननं आपल्या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीनं सगळ्या जगाला प्रभावित केलं होतं, असं कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र असलेल्या People's Daily नं म्हटलं आहे.
2018 मध्ये चीनचा GDPवर आधारित विकास दर हा 6.6 टक्के असून जागतिक आर्थिक विकासदरातील 30 टक्के वाटा हा चीनचा होता, असंही People's Daily नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
People's Daily नं पुढे असं म्हटलं आहे, की चीनला आपल्या ग्राहक महागाई निर्देशांकाचा दर हा 3 टक्क्याच्या आसपास ठेवायचा आहे. तसंच 11 दशलक्ष नवीन रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे.
शहरी बेरोजगारीचा दर हा 5.5 टक्क्यापर्यंत राहिल असा अंदाज People's Daily नं आपल्या अहवालामध्ये व्यक्त केला आहे.
गुणवत्तेच्या विकासाला प्राधान्य
केवळ विकासाचा दर वाढविण्याऐवजी गुणवत्तेलाही प्राधान्य देण्याच्या उद्देशानं चीननं नियंत्रित पद्धतीनं विकास दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारी महिन्यात 2018 मधील आर्थिक विकास दराचे आकडे प्रसिद्ध झाले. त्यानंतर अमेरिका तसंच युरोपियन युनियनमधील विकसित देशांमधील घसणाऱ्या GDPच्या आकडेवारीची खिल्ली न उडवण्याची सूचना चिनी प्रसारमाध्यमांना करण्यात आली.
किंबहुना 2018 मध्ये चीनचा असलेला 6.6 टक्के विकास दर ही काळाची गरज असल्याचं चिनी माध्यमांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
चीनमधील राष्ट्रवादी वर्तमानपत्रं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्सनं परदेशी माध्यमांवर टीकाही केली होती. 'गेल्या 28 वर्षांतील नीचांकी विकास दर आणि चीनवरील दबाव' या दोनच गोष्टींवर परदेशी माध्यमांनी लक्ष केंद्रीत केल्याचं 'ग्लोबल टाइम्स'नं आपल्या अग्रलेखात म्हटलं होतं.
पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या उद्योगांवर सरकारकडून केली जाणारी कारवाई आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगतीवर केंद्रित केलेलं लक्ष यांमुळे आर्थिक विकासाचा दर मंदावल्याचं 'ग्लोबल टाइम्स'च्या लेखात म्हटलं होतं.
'एकेकाळी चीनचा आर्थिक विकास दर खूप जास्त होता. मात्र पर्यावरणाच्या हानीच्या रूपानं आपण त्याची किंमतही मोजली आहे. त्यामुळे जो पैसा अर्थव्यवस्थेत निर्माण होत होता, त्यातून लोकांना चांगलं जीवनमान देण्यात आपल्याला अपयश आलं', असंही 'ग्लोबल टाइम्स'नं म्हटलं.
कमी केलेल्या विकास दराची पाठराखण
चिनी माध्यमांकडून कमी करण्यात आलेल्या विकास दराचीही पाठराखण करण्यात येईल.
2018 मध्ये The People's Daily नं चीनचा GDP पहिल्यांदाच 90 ट्रिलियन युआन (म्हणजेच 13.2 ट्रिलिअन डॉलर्स) एवढा वाढल्याचं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
'सरकारनं उचललेलं नवीन पाऊल,' अशा मथळ्याखाली 22 जानेवारीला The People's Daily नं कमी केलेल्या विकास दराची बातमी छापली होती. चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांच्या भाषणापेक्षाही ही बातमी अधिक मोठी करून छापण्यात आली होती.
पहिल्या पानावर ही बातमी छापून The People's Daily नं दुसऱ्या पानावर आकडेवारीसह सविस्तर अहवाल छापला होता. जागतिक माध्यमांनी चीनच्या अर्थव्यवस्थेवर केलेल्या एकांगी भाष्यावरही या बातमीत ताशेरे ओढले होते. 2018 मध्ये चीनशी रस्त्यानं जोडलेल्या देशांसोबतची आयात-निर्यात ही 13 टक्क्यांनी वाढल्याचंही आवर्जून नमूद केलं होतं.
2019 या वर्षासाठी चीननं आपलं आर्थिक विकास दराचं उद्दिष्ट अजूनच कमी केलं आहे. त्यामुळे आता चिनी माध्यमं या निर्णयाचं समर्थनं कसं करतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








