जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मृत्यू झाला?

    • Author, शुमाईला जाफरी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अफवांचं पीक जोरात सुरू आहे. रविवारी भारतीय माध्यमांत एका बातमीने राळ उडवून दिली होती.

रविवारी दुपारी भारतात ट्विटरवर मौलाना मसूद अझहरचं पाकिस्तानात निधन झाल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर शेअर होऊ लागल्या होत्या. ही 'बातमी' मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही उचलून धरली. बऱ्याच माध्यमांना या बातमीची खात्री नव्हती, तरीही अनधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी चालवली जात होती.

या अफवांचं उगम कशात आहे, हे जरी शोधणं कठीण असलं तरी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी CNNला दिलेली एक मुलाखत या सर्वांच्या मुळाशी असावी, असं दिसतं.

या मुलाखतीत त्यांनी अझहर फार आजारी असून तो घरातून बाहेर पडू शकत नाही, असं म्हटलं होतं.

पण भारतातील काही ट्विटर अकाऊंटवर अझहरचा मृत्यू हा भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात झाल्याचं सांगितलं जात होतं. अझहरचा मृत्यू या हल्ल्यात झाला पण ते झाकण्यासाठी पाकिस्तान अझहरची प्रकृती बिघडली असल्याचं सांगत आहे, असा दावा अकाऊंटवरून केला जात होता.

#MasoodAzharDEAD हॅशटॅग रविवारी सायंकाळपर्यंत टॉपचा ट्विटर ट्रेंड झाला होता.

तर पाकिस्तानच्या बाजूने या वृत्ताचं खंडण करण्यात आलं. पाकिस्तानचे पत्रकार साबूख सय्यद अनेक वर्षं धार्मिक आणि कट्टरवादी संघटनांचं वार्तांकन करतात. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये अझहरच्या मृत्यूच्या बातम्या आधारहीन असल्याचं म्हटलं आहे.

साबूख यांनी पूर्वी 3 वेळा अझहरची मुलाखत घेतली आहे. पण 2016ला झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर अझहर माध्यमांच्या संपर्कात नसल्याचं त्यांनी सांगितलं.

बीबीसी हिंदीशी बोलताना ते म्हणाले, "मी जैश ए मोहम्मदमधील सूत्रांशी बोललो आहे. अझहरची प्रकृती चांगली असल्याचं मला सांगण्यात आलं."

"2010पासून अझहरला मूत्रपिंडाची समस्या आहे. त्याच्यावर 9 वर्षं उपचार सुरू आहेत पण तो गंभीर आजारी नक्कीच नाही," असं ते म्हणाले.

जैश ए मोहम्मदच्या नेत्यांशी संपर्कात असल्याचा दावा करणारे आणखी एक पत्रकार एझाझ सय्यद यांनी अझहरच्या मृत्यूची बातमी चुकीची आहे, असं ट्वीट केलं आहे.

बीबीसी हिंदीशी बोलताना ते म्हणाले, "मी अझहरच्या संबंधितांशी बोललो आहे आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित लोकांशीही बोललो आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं."

एझाझ म्हणाले मजूदच्या प्रकृतीबद्दल जे सांगितलं जात आहे त्यात अतिशयोक्तीच जास्त आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी रविवारी रात्री उशिरा एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत हे दावे फेटाळून लावले. मसूद अझहरचा मृत्यू झाला आहे, असं भारतीय माध्यमांत सांगितलं जात आहे, असं त्यांना विचारण्यात आलं यावर, 'मला याबद्दल काहीच माहिती नाही,' असं ते म्हणाले.

सुरक्षा संबंधित विषयांचे जाणका अमिर राणा यांनाही या दाव्यांबद्दल शंका वाटते. "हे दावे सत्य आहेत, हे सिद्ध करणारा एकही पुरावा माझ्या पाहण्यात आलेला नाही," असं ते म्हणाले. राणा पाक इन्स्टिट्यूट ऑफ पीस स्टडीजमध्ये काम करतात.

ते म्हणाले, "लोकांनी अपप्रचाराबद्दल सजग असलं पाहिजे. कारण संघर्षाच्या स्थितीत अशा बातम्या जास्त वेगाने पसरतात."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)