पुणे: आंबेगावच्या बोअरवेलमध्ये 16 तास अडकलेल्या रवी पंडितला असं बाहेर काढण्यात आलं

रवी
    • Author, हलिमा कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुणे

"मला लवकर बाहेर काढा. मला तहान लागलीय, मला पाणी प्यायचंय," असा रडत रडत त्या बोअरवेलमधून 6 वर्षांच्या रवीचा आवाज यायचा.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव इथल्या थोरांदळे गावात एका बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षांचा रवीला तब्बल 16 तासानंतर सुखरूपणे बाहेर काढलं.

बुधवारी सांयकाळी 4.30 रवी उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला गुरुवारी सकाळी 9 वाजता रवीला बाहेर काढलं. तब्बल 16 तास हे बचावकार्य चाललं आहे.

बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी बुधवारी रात्री 8 वाजता NDRFचं पथक थोरांदळे गावात दाखल झालं होतं.

सध्या रवीची आरोग्य तपासणी करण्यासाठी जवळच्या मंचर इथल्या सरकारी दवाखाना हलवण्यात आलं आहे.

रवीला कसं बाहेर काढण्यात आलं?

"बुधवारी 4.30 वाजता एक मुलगा बोअरवेलमध्ये पडला अशी माहिती आम्हाला मिळाली. आम्ही 10 मिनिटांत तयार होऊन घटनास्थळाकडं रवाना झालो. अशा घटना होत असतात. त्यामुळे बचावकार्याची सामग्री आम्ही कायम तयार ठेवत असतो." असं, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकातले CRPFचे जवान युवराज शेलार, यांनी सांगितलं.

"जागेची पाहणी केल्यावर मुलगा 10 ते 15 फूट खाली असल्याचा आम्हाला अंदाज आला. बोअरवेलवर पोतं झाकलं होतं. त्यावर पाय पडल्यानं तो पोत्यासह होलमध्ये पडला. या बोअरवेलची खोली जवळपास 200 मीटर इतकी होती," असं NDRF टीमचे कमांडंट ऑफिसर आलोक कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"आम्ही बोअरवेलच्या समांतर खोदकाम करायला सुरुवात केली. पण मध्येच मोठा दगड लागला त्यामुळे पुढं खोदायला अवघड जाऊ लागलं. आमच्याकडं दगड फोडण्यासाठी मोठी मशीन होती पण त्याचा वापर करायचं आम्ही टाळलं कारणं त्यामुळं जास्त धूळ निर्माण झाली असती आणि धुळीमुळं मुलाला श्वास घ्यायला त्रास झाला असता. म्हणून आम्ही ड्रिलिंग करून दगड फोडायला सुरुवात केली," असंही त्यांनी सांगितलं.

बुधवारी 8 वाजता या ऑपरेशनला चालू केलं होतं ते सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्ण झालं.

'मला लवकर बाहेर काढा'

"अधून मधून मुलगा रडायचा. मला लवकर बाहेर काढा, असा बोअरवेलमधून मुलाचा आवाज यायचा. त्याचे वडील जवळच बसलेले होते. ते त्याला धीर द्यायचे. गावातली इतर लोकही त्याच्याशी बोलायचे, मग तो गप्प व्हायचा." असं बचाव कार्याचा अनुभव सांगताना आलोक कुमार सांगतात.

बचावकार्य

2 फूट बोअरवेलच्या समांतर खणलं की मधली भिंत तोडण्यात येत होती. हळूहळू मुलाचा चेहरा, हात दिसू लागले तसंतसं मुलाचा आत्मविश्वास वाढू लागला. असं आम्ही 12 फूटापर्यंत खोदकाम केलं.

त्याच्या पँटमध्ये माती जाऊन त्यात रवीचे पाय रुतले होते. त्यामुळे त्याला वर ओढता येत नव्हतं. शेवटी पायाभोवतीची माती बाजूला सारली आणि रवीला बाहेर काढलं.

"आम्ही ड्रिलिंग करतोय. तू डोळे बंद कर. असं सांगितलं की तो डोळे मिटून बसायचा. तहान लागली की पाणी मागायचा. आम्ही जसं सांगेल त्याप्रमाणं तो करायचा," असं बचाव कार्यात सहभागी झालेले NDRFचे जवान आलोक यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

मुलाला कोणतीही इजा न होता त्याला बाहेर काढायची आमची प्राथमिकता होती. NDRFची टीम आणि रवीमध्ये सुरुवातीपासूनच चांगला संवाद राहिला. त्यामुळेच हे ऑपरेशन यशस्वी झालं. या सगळ्या घटनेचा हिरो हा रवीच आहे. त्याच्या उत्तम प्रतिसादाशिवाय आम्ही त्याला सुखरुप बाहेर काढू शकलो नसतो, असं आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी सांगितलं.

बजाव कार्यात NDRFच्या टीम कोणती आव्हानं आली?

आमची एकूण 31 NDRF जवानांची टीम होती. मी या टीममध्ये गेल्या साडेपाच वर्षांपासून काम करत आहे. पण बोअरवेलचं बचावकार्य हाताळायची संधी मला पहिल्यांदाच मिळाली.

माझे वरीष्ठ अधिकारी मोहम्मद शकील आणि माझ्या इतर सहकाऱ्यांना मात्र याचा अनुभव होता. त्यांनी याआधी दोनदा बोअरवेलमधून मुलांना बाहेर काढलं आहे, असं आलोक कुमार यांनी सांगितलं.

बचावकार्य

बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळी रवीला सुखरुप बाहेर काढण्यापर्यंत गावकरी, पोलीस प्रशासन, गट विकास अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी होते. सगळ्यांनी एकजुटीनं प्रयत्न केल्यानं रवीला बाहेर काढण्यात यश मिळालं असं सुषमा पैकेकरी यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)