‘आम्हाला मूल नकोय कारण...’ : तरुण जोडप्यांमध्ये वाढतंय अँटीनेटलिझम?

फोटो स्रोत, Getty / BBC
- Author, प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठीसाठी मुंबईहून
तुम्ही माझ्या परवानगीशिवाय मला जन्माला का घातलं, म्हणत मुंबईच्या रफाएल सॅम्युएल या 27 वर्षांच्या तरुणाने त्याच्याच आईवडिलांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. ज्या 'मानव जन्मविरोधी' किंवा anti-natalism तत्त्वज्ञानावर त्याचा हा निर्णय आधारित आहे, त्याची या प्रकरणामुळे बरीच चर्चा होते आहे.
ज्यांनी या जगात आणलं त्यांच्याच विरोधात एखाद्या मुलाने तरुण वयात असं पाऊल का उचलावं, हा एक प्रश्न पडतोच. पण जर खुद्द आई-वडिलांनीच मूल जन्माला घालण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला तर कदाचित पुढील अनेक प्रश्न उद्भवणारच नाहीत.
विशेष म्हणजे मूल जन्माला घालणं, हे आपलं आद्य कर्तव्य मानणाऱ्या लोकांच्या गर्दीत समाजात अशी अनेक तरुण जोडपी आहेत, ज्यांनी ठरवून मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांची कारणंही तितकीच ठोस आहेत. त्याच कारणांचा घेतलेला हा वेध.

'नवीन पिढीसाठी मागे काय सोडून जातोय?'
"लोकसंख्येचा महापूर आल्याचं आपण सगळेच बोलतो, पण त्यावर काय करतो? आत्ताच आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा मुक्तहस्तपणे वापर करत आहोत, तर मग पुढच्या पिढीसाठी मागे काय सोडून जातोय, हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच आम्हाला मूल नको असण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत," असं मत पुण्याच्या संग्राम खोपडे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना व्यक्त केलं.

डॉ. रिचा आणि संग्राम यांच्या लग्नाला दोन वर्षं झाली असली तरी गेली सहा वर्षं ते एकमेकांना ओळखतात. त्यामुळे लग्नाच्या आधीच त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
डॉ. रिचा यांच्या मते, "98 टक्के लोकांचे जेनेटिक्स हे चांगले नसतात. मग नवीन पिढी जन्माला घालण्याचा अटट्हास कशाला करायचा?"
"वैद्यकशास्त्र पुढे जातंय त्यामुळे माणसाचं आयुर्मान वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे, एवढंच आम्हाला वाटतं," असं रिचा म्हणाल्या.
"आमच्या कुटुंबीयांनी आमच्या निर्णयाला कधीच विरोध केला नाही. एवढंच नव्हे तर आमचे अनेक तरुण मित्र-मैत्रीणदेखील याच विचारांचे आहेत. माझ्या बहिणीला सहा वर्षांची मुलगी आहे आणि माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. मुलांवर प्रेम असण्याची ही भावना मला पुरेशी वाटते," असंही रिचा पुढे म्हणाल्या.

'नवीन जीवाला धकाधकीचं आयुष्य देण्याची इच्छा नाही'
सुप्रिया आणि कौशिक वर्तक यांच्या लग्नाला दहा वर्षं झाली असून सध्यातरी ते पक्के मुंबईकर आहेत. मुंबईचं धकाधकीचं जीवन ते रोज अनुभवतात आणि त्यामुळे आणखी दहा वर्षांनी त्यांना स्वत:लाच हे शहर सोडून मुंबईबाहेर राहायला जायचं आहे.
"असं असताना आणखीन एका नवीन जीवाला जन्म देऊन त्याला हे धकाधकीचं आयुष्य देण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही," असं सुप्रिया वर्तक बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या.
"मूल जन्माला घालण्याचा निर्णय विचार करूनच घ्यायचा, असा निर्णय आम्ही सुरुवातीपासूनच घेतला होता," असं कौशिक वर्तक सांगतात. "त्यामुळे मूल होऊ देण्याच्या बाबतीत आमच्या कुटुंबीयांचं कुठलंच दडपण आमच्यावर नाही. त्यांनी तो निर्णय आमच्यावर सोपवलेला आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत."
"खरंतर मीसुध्दा या जगात आले नसते तर फार काही फरक पडला नसता," असं सुप्रिया अगदी मोकळेपणाने सांगतात. "पण एकदा का तुम्ही जन्म घेतलात की तुम्हाला जगण्याच्या स्पर्धेला तोंड द्यावंच लागतं. नवीन जीवाच्या बाबतीत आम्हाला ते अजिबात करायचं नाहीए," असं सुप्रिया यांचं ठाम मत आहे.

'एखाद्या जोडप्याला मूल हवं असतं तसं आम्हाला मूल नकोय'
एखाद्या जोडप्याला मूल हवं असतं तसं आम्हाला मूल नको आहे आणि हे इतकं सोपं आहे, असं मुंबईस्थित नीरव आणि मीरा शाह सांगतात.
"ज्यांना मूल हवंय त्यांना आपण प्रतिप्रश्न करत नाही. मग ज्यांना नको आहे, तो त्यांचा निर्णय आहे आणि त्यावर वादविवाद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असं नीरव पुढे म्हणाले.
मीरा आणि नीरव यांचं सात वर्षापूर्वी अरेंज मॅरेज झालं आहे. "पण लग्नानंतर मूल जन्माला घालण्यापेक्षा एखादी मुलगी दत्तक घेऊयात, असं लग्नाच्या आधीच नीरवने मला सांगितलं होतं," मीरा सांगतात.
"नवऱ्याकडूनच हा प्रस्ताव आल्याने मीसुध्दा त्याला होकार दिला होता. पण मग लग्नानंतर मूल दत्तक घेण्याचाही विचार मागे पडला," त्या सांगतात.

"खरंतर त्यानंतर स्वत:च्या निर्णयाला सिद्ध करण्यासाठी मी कारण शोधत होते. आम्ही स्वत:ला प्रश्न विचारत होतो, कारण आम्हाला स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे, हा विचार कायम डोक्यात होता. पण आपण खूप टोकाचा विचार करत आहोत का? तर तसंही नव्हतं. कारण फक्त वंश वाढविण्यासाठी आम्हाला मुलांना जन्म द्यायचा नाहीए.
"लोकसंख्यावाढ, पर्यावरणाची समस्या, स्वत:ला सिद्ध करण्याची जीवघेणी स्पर्धा, धकाधकीचं आयुष्य, शिक्षण, नोकरी आणि त्यांच्या नशिबीसुध्दा पुन्हा तेच चक्र अशी अनेक कारणं मूल होऊ न देण्यास आमच्यासाठी पुरेशी आहेत. म्हातारपणी तुमची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न लोकं विचारतात, पण आजही आपल्या आजूबाजूला अनेकजणांची मुलं परदेशात स्थायिक झालेली दिसतात आणि दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढताना दिसत आहे. मग या प्रश्नालाही काही अर्थ उरत नाही," असं मीरा यांना वाटतं.
"माझ्या सासूने काही वेळेस या निर्णयाबाबत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कधीच स्वत:चं मत माझ्यावर लादलं नाही. माझ्या आई-वडिलांनीही कधी मला हा प्रश्न विचारला" नसल्याचं मीरा सांगतात.
नीरव यांच्या मते, "आम्हाला मुलाची जबाबदारी घ्यायची नाहीए, असं नाहीए. खरंतर जबाबदारी हा खूप वेगळा शब्द आहे. पण आम्हाला मूल नकोच आहे, हे इतकं सोपं आहे. आम्हाला आमचं आयुष्य जगायचं आहे आणि त्यात काहीही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि त्याबाबत मी कधीच मुद्दामहून कारणं शोधायचा प्रयत्न केला नाही.

'एकच आयुष्य आहे आणि ते मनसोक्त जगायचंय'
मूळचे भारतीय पण सध्या सॅन फ्रॅन्सिको येथे वास्तव्यास असलेले आश्का रावल आणि सुमीत हसवल हे शाळेपासून एकमेकांना ओळखतात.
"आमच्या लग्नाला आठ वर्षं झाली आहेत. मूल होऊ न देण्याचा निर्णय आम्ही एका रात्रीत घेतलेला नाही तर तो विचारपूर्वक घेतलेला आहे," असं सुमीत सांगतात.
आश्का यासद्धा बीबीसी मराठीला सांगतात की त्यांना "आई होण्यात अजिबात रस नाही आणि माझ्या निर्णयाबद्दल सुमितला कोणताही आक्षेप नाही. त्यामुळे आपल्याला मूल नसल्याचा पश्चात्ताप आम्हाला आजवर झालेला नाही आणि यापुढेही नक्कीच होणार नाही."
"आपल्याला एकच जन्म मिळालेला आहे आणि या जगात करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. आम्हाला आमचं आयुष्य मनसोक्त जगायचंय. मुलांना जन्म दिल्याने त्यांची जबाबदारी अंगावर येऊन पडते आणि नाही म्हटलं तरी आयुष्य थांबल्यासारखं होतं. त्यामुळे मला आई व्हायचं नव्हतं," असं आश्का ठामपणे सांगतात.
"शिवाय, एकदा का तुम्ही मुलाला जन्म दिलात की आयुष्यमभर त्याच्यासाठी मन तुटत राहतं, जे आम्हा दोघांनाही मान्य नाही."
सुमित एक खुलासा करतात - "आश्काच्या आईवडिलांना आमचा हा निर्णय माहीत आहे. पण माझ्या आई-वडिलांसोबत अद्याप आम्ही मोकळेपणाने चर्चा केलेली नाही. सध्या तरी आम्ही त्यांच्याशी याबाबत बोलणं पुढे ढकलतोय. पण कधीतरी अगदीच युद्धप्रसंग उद्भवला तर नक्की बोलू."

मुलांना ग्लोबल आणि जबाबदार नागरिक बनवायचंय
बंगळुरू येथे वास्तव्यास असलेल्या उत्तरा नारायणन आणि अरुण कुमार यांनी लग्नानंतर दोन मुलांना दत्तक घेतलेलं आहे. उत्तरा ही लग्नाच्या आधीपासूनच सुष्मिता सेनपासून प्रभावित झालेली होती. त्यामुळे तिच्याप्रमाणेच लग्नानंतर मूल दत्तक घ्यायचं होतं आणि त्याला अरुणचाही पाठिंबा मिळाला.
स्वत:चं मूल जन्माला घालायचं नाही, असा कोणताही निर्णय दोघांनीही घेतला नसल्याचं उत्तरा म्हणाल्या. मूल दत्तक घेणं आणि स्वत:च्या मुलासाठी प्रयत्न करणं हे एकत्रितरीत्या सुरू होतं. मुख्य म्हणजे त्यांना विशेष मूल दत्तक घ्यायचं होतं. त्यासाठीचा अर्ज त्यांनी केला होता.
साधारणपणे या संपूर्ण प्रक्रियेला दोन वर्षांचा कालावधी जातो, परंतु त्यांना अवघ्या दीड महिन्यात हवी तशी मुलगी मिळाली. तेव्हा ती नऊ महिन्याची होती. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2017 साली त्यांनी साडे सहा वर्षांचा आणखी एक विशेष मुलगा त्यांनी दत्तक घेतला.

"आपल्या घराण्याचा वंश पुढे जाण्यापेक्षा मानव वंश पुढे जायला हवा, असा विचार आम्ही केला आणि त्यासाठी आपलंच मूल असण्याची गरज नाही," असं उत्तराला वाटतं.
"शिवाय जगात जर प्रश्न असतील तर त्यांना सोडवणारे लोकही हवेत. आम्ही दोघेही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. आम्ही स्वत:ला एक जबाबदार नागरिक समजतो. त्यामुळे आम्हाला आमच्या मुलांना जबाबदार नागरिक बनवायचं आहेच, पण त्याचबरोबर 'ग्लोबल सिटीझन' बनवायचं आहे," असं उत्तरा पुढे म्हणाली.
"आम्हाला म्हातारपणासाठी मुलं नको आहेत. आमचा प्रयत्न आहे की त्यांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणं," असं अरुण सांगतात. "आमच्या दोघांच्याही कुटुंबात यापूर्वी मुलं दत्तक घेतली गेली आहेत, त्यामुळे हा निर्णय आमच्यासाठी फारसा कठीण नव्हता."
उत्तरा सांगतात, "जीवनाच्या शेवटी काय साध्य होईल, याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. म्हणूनच आम्हाला जीवनाच्या प्रवासात अधिक रस आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








