अल चॅपो ड्रग तस्करीप्रकरणी दोषी, जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता

फोटो स्रोत, Getty Images
मेक्सिकोचा कुख्यात ड्रगमाफिया अल चॅपो गूसमॅन याला न्यूयॉर्कमधील न्यायालयानं ड्रग तस्करीप्रकरणातील खटल्यात दहा विविध आरोपांखाली दोषी ठरवलं आहे.
कोकेन आणि हेरॉइनची तस्करी, बेकायदेशीरपणे शस्त्रं बाळगणं, पैशांची अफरातफर अशा आरोपांखाली 61 वर्षीय चॅपोला कोर्टाने दोषी ठरवलं. याप्रकरणी शिक्षेची सुनावणी बाकी असून, चॅपोला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
चॅपोने मेक्सिकोतील तुरुंगातून भुयाराद्वारे पलायन केलं होतं. 2016 मध्ये त्याला अटक करण्यात आली. 2017 मध्ये चॅपोचं अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आलं.
बहुचर्चित सिनालोआ ड्रग कार्टेल मागे चॅपोचा हात असल्याचा संशय होता. अमेरिकेतील सगळ्यात मोठा ड्रग सप्लायर असल्याचा चॅपो यांच्यावर आरोप होता.
न्यायालयात काय झालं?
अकरा आठवडे या प्रकरणातील विविध बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. यावेळी चॅपो काळ्या रंगाचा सूट, जॅकेट आणि टाय अशा वेशात हजर होता. दोषी असल्याचं न्यायाधीशांनी जाहीर केलं त्यावेळी त्याचा चेहरा निर्विकार होता.
न्यायालयाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर चॅपो बाहेर आला. वकिलांशी चर्चा करण्याआधी चॅपो पत्नी एमा कोरनेलला भेटला. 29 वर्षीय एमा ब्युटी क्वीन आहे.
अल चॅपो आहे तरी कोण?
शेतकरी कुटुंबात 1957 साली चॅपोचा जन्म झाला. अफू आणि गांजाच्या शेतात चॅपो काम करत असे. त्यातूनच चॅपोला ड्रग तस्करीतील खाचाखोचा समजल्या.
लवकरच चॅपो हा गॉडफादर नावाने ओळखल्या जाणाऱ्या ताकदवान ग्वाडालाजारा कार्टेलचे प्रमुख एंजेल फेलिक्स गलार्डो यांचा चॅपो चेला झाला. ड्रगतस्करी धंद्यातील बारकावे चॅपो त्यांच्याकडूनच शिकला.

फोटो स्रोत, AFP
5 फूट 6 इंच उंचीचा चॅपो ठेंगणा आहे. 1980च्या दशकात मेक्सिकोच्या उत्तर-पश्चिमेकडील भागात हुकूमत असणाऱ्या सिनालोआ कार्टेल साम्राज्याच्या चॅपो अढळस्थानी पोहोचला.
अमेरिकेला ड्रग्सचा पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा समूह झाला. 2009 मध्ये फोर्ब्स मासिकाने तयार केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 701व्या क्रमांकावर चॅपोचं नाव होतं. त्यावेळी चॅपोकडील संपत्ती 70 अब्ज रुपये एवढी होती.
अमेरिकेत शेकडो टन कोकेनची तस्करी केल्याचा चॅपोवर आरोप आहे. हेरॉइन आणि मेरवानाचं उत्पादन आणि तस्करीचाही त्याच्यावर आरोप आहे.
माजी लेफ्टनंटसह चॅपोच्या सहकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध साक्ष दिली आहे.
सिनालोआ कार्टेल म्हणजे नेमकं काय?
सिनालोआ हा मेक्सिकोचा उत्तर-पश्चिमेकडचा प्रदेश आहे. यावरूनच सिनालाओ कार्टेल असं नाव रुढ झालं आहे. चॅपोच्या आदेशावरून कार्टेलने ड्रग्स व्यापारातील प्रतिस्पर्ध्यांचा नायनाट केला. प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारल्यानंतर कार्टेल अमेरिकेला ड्रग्सचा पुरवठा करणारं सगळ्यात मोठं नेटवर्क झालं.

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकन काँग्रेसला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार कार्टेल वर्षाकाठी तीन अब्ज डॉलर्स एवढी कमाई करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या गँगचं जाळं 35 देशांमध्ये पसरलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कार्टेलसमोर नवीन प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत. चॅपोला शिक्षा घोषित झाल्यानंतर कार्टेलचा प्रभाव कमी होणार का? हा प्रश्न महत्वाचा आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








