'मंटो' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी; अजूनही मंटोच्या विचारांची धास्ती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जुबैर अहमद
- Role, बीबीसीसाठी
दक्षिण आशियात सर्वाधिक वाचले जाणारे दोन लेखक म्हणजे सआदत हसन मंटो आणि फैज अहमद फैज. गेल्या सत्तर वर्षांमध्ये मंटोंच्या पुस्तकांना असलेली मागणी कधीच कमी झालेली नाही. त्यामुळेच आजही मंटोंच्या पुस्तकांच्या एकापाठोपाठ एक आवृत्या प्रसिद्ध होतात.
मंटोच्या पुस्तकांना मागणी असली, तरी वाद आणि बंदी यांसोबतच मंटोचं नातं आजही कायम आहे. नंदिता दास दिग्दर्शित मंटो या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
त्यानंतर लाहौरमधलं सांस्कृतिक केंद्र अल-हमरानंही मंटो महोत्सवावर बंदी घातली आहे. (13 जानेवारीला लाहौरमधल्या आर्ट्स काऊंसिल-अल-हमरानं आपल्या फेसबुक पेजवर नेशन वृत्तपत्राची बातमी शेअर केली आहे. या बातमीत दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात मंटो महोत्सव आयोजित करण्यात आला होता.)
मंटोच्या हयातीतही त्याच्या कथांवर अश्लीलतेचा आरोप करून बंदी घालण्यात आली होती. मंटोच्या ठंडा गोश्त, काली सलवार आणि बो या कथांवर बंदी घातली गेली होती. त्याच्या कथांवर पाच वेळा बंदी घालण्यात आली होती. मात्र मंटोला कधीही दोषी ठरवण्यात आलं नाही.
पाकिस्तानमध्ये मंटोवरील चित्रपट तसंच मंटो महोत्सवाला विरोध करण्याचं कारण त्याच्या कथांमधील अतिशय 'धीट' आशय असल्याचं सांगितलं जात आहे.
पाकिस्तानच्या सांस्कृतिक मंत्रालयामध्ये धर्माचा पगडा असलेल्या लोकांमुळे ही बंदी घातली गेल्याचीही चर्चा आहे. लेखकाच्या कथा या अश्लिलता पसरवणाऱ्या असल्याचा आक्षेप मंत्रालयातल्या लोकांनीच घेतला आहे.
अल-हमरानं मंटो महोत्सवावर बंदी घातल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. केवळ या महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भविष्यातली तारीख मात्र सांगितली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मंटो महोत्सवामध्ये चार नाट्य संस्था मंटोच्या कथांवर आधारित नाटकं सादर करणार होत्या. यामध्ये पाकिस्तानमधल्या प्रसिद्ध 'अजोका थिएटर' या संस्थेचाही समावेश आहे. सर्व नाट्य संस्थांनी नाटकाची तालीमही सुरू केली होती.
मंटो चित्रपटावर बंदी का?
पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाचा नंदिता दास यांच्या चित्रपटाबद्दल कोणताही आक्षेप नव्हता. मात्र या चित्रपटात भारत आणि पाकिस्तान फाळणीचं चित्रण वास्तवाला धरून नसल्याचा आक्षेप घेतल्यानं बंदी घातली गेली, असं सांगण्यात आलं आहे.
हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. इथे कोणीही हा चित्रपट पाहू शकतो.
मंटो चित्रपटावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात लाहौर, पेशावर आणि मुलतामध्ये निदर्शनं करण्यात आली होती. मंटो मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष सईद अहमद आणि इतर विचारवंतांनी लाहौरमध्ये चित्रपटावरील बंदीविरोधात निदर्शनं केली होती.
मंटोवर परिसंवादाचं आयोजन
मंटो मेमोरियल सोसायटीनं गेल्या आठवड्यात मंटो चित्रपटावर एक परिसंवादच आयोजित केला होता. या परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या इतिहासकार आयेशा जलाल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. आयेशा जलाल या ख्यातनाम इतिहासकार असून त्यांची पुस्तकं ही महत्त्वाचे संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासली जातात.
विशेष म्हणजे त्या मंटो यांच्या नातेवाईक आहेत आणि त्यांनी मंटो तसंच भारत-पाकिस्तान फाळणीवर पुस्तकही लिहिलं आहे. मंटो तेव्हाही वादाचं केंद्र होता आणि आताही त्यांच्यावरून वाद होत आहे. मग सत्तर वर्षांत नेमकं काय बदललं, असा प्रश्न आयशा जलाल यांना विचारण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
मंटो चित्रपटाबद्दल बोलताना जलाल यांनी पाकिस्तानमध्ये बनविण्यात आलेल्या सरमद खोस्टच्या चित्रपटाचाही उल्लेख केला.
नंदिता दास यांच्या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास केला नसल्याचं जलाल यांनी म्हटलं. दास यांच्या चित्रपटावर भलेही बंदी घालण्यात आलीये, मात्र हा चित्रपट आता नेटवर उपलब्ध आहे. त्यामुळं बंदीला काही अर्थच राहिला नाही, असंही जलाल यांनी म्हटलं.
फाळणीच्या सामाजिक दुष्परिणामावर टीका करणं, ही वेगळी गोष्ट आहे. जर कोणाला टीकाच सहन होत नसेल तर यामध्ये मंटोचा काही दोष नाही. जे लोक विरोध करत आहेत, त्यांच्या साहित्यिक आकलनक्षमतेचा हा प्रश्न आहेस, असं जलाल यांनी स्पष्ट केलं.
आयशा जलाल यांनी म्हटलं, की आजच्या काळातही मंटोला इंग्रजांच्या काळातील वसाहतवादी कायदे लागू केले जात आहेत. त्याकाळीही मंटोर विविध आरोप करण्यात आले होते. मात्र काही दंड आकारून त्याची सुटकाही झाली. यावेळेची परिस्थिती मात्र वेगळी आहे.
नंदिता दास यांचा चित्रपट प्रामाणिक
नंदिता दास यांच्या चित्रपटात मंटो पाकिस्तानमध्ये येण्यासाठी नाखूश होते आणि त्यांचा इथला अनुभव फारसा चांगला नव्हता, असं दाखवल्याचा मुद्दा परिसंवादात मांडण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
आयशा यांनी म्हटलं, की पाकिस्तानमध्ये उत्कृष्ट कथालेखक म्हणून एका बाजूला मंटो यांचा गौरव करण्यात आला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना राहतं घर खाली करायला सांगितलं.
हेच नंदिता दास यांच्या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. मात्र हा चित्रपट एका भारतीय दिग्दर्शिकेनं बनवला आहे. त्यामुळे पाकिस्तानात आलेली एक व्यक्ती इथं खूश होती की नाही हे एक भारतीय आम्हाला सांगणार का, हे विरोधाचं मुख्य कारण आहे.
माध्यमांवर बंधन लादण्याचा प्रयत्न होणं हेच व्यवस्था म्हणून आपल्या अपयशाचं लक्षण आहे. आणि आपण जितके अपयशी ठरत आहोत, तितके निरर्थक कायदे बनवत आहोत.
गेल्या सत्तर वर्षांत काही बदललं नाहीये, असंच वाटतंय. जर अन्याय करणाऱ्या, जबरदस्ती करणाऱ्या व्यवस्थेला आपण भीत असू तर मंटो बदलला नाहीये.
मंटो आजही जिवंत आहे. तो जमिनीखाली दफन नाहीये, तर आपल्यासोबत बसून हसत आहे. आपण महान कथालेखक होतो की द्रष्टा भविष्यवेत्ता असा प्रश्न त्याला पडला असेल, असं आयशा जलाल यांनी म्हटलं.
(लेखक लाहौरमध्ये पंजाबी भाषेसाठी काम करतात.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








