बांगलादेशची विकासाच्या मार्गावर आगेकूच, भारतालाही टाकत आहे मागे

मोदी हसीना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1971 साली पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. त्यानंतर बांगलादेशनं बरंच काही भोगलं आहे. भयंकर गरिबी, नैसर्गिक आपत्ती आणि आता जगातील सर्वांत मोठ्या स्थलांतराच्या प्रश्नाचा सामना ते करत आहेत. साडेसात लाख रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानमार सोडून बांगलादेशात आश्रय घेतला आहे.

एवढं सगळं घडत असतानाही बांगलादेश आर्थिक प्रगतीचे नवनवे अध्याय लिहित आहे. मात्र त्यांच्या या यशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर फार चर्चा झाली नाही, हेही खरं.

उत्पादन क्षेत्रात बांगलादेश वेगानं विकास करतोय. कापड उद्योगात चीननंतर बांगलादेशचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या दशकभरात बांगलादेशची अर्थव्यवस्था 6 टक्क्यांच्या विकासदरानं वाढली आहे. जून 2018 मध्ये हा विकासदर 7.86 टक्क्यांवर पोहोचला होता.

बांगलादेशनं 1974साली भीषण दुष्काळ बघितला. त्यानंतर 16.6 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आज अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. 2009 सालापासून बांगलादेशातील दरडोई उत्पन्न तिप्पट झालं आहे.

यावर्षी दरडोई उत्पन्न 1,750 डॉलर आहे. बांगलादेशातील बहुतांश जनता गरीब आहे. मात्र जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार बांगलादेशात दररोज 1.25 डॉलरमध्ये गुजराण करणारे 19 टक्के लोक होते. ही टक्केवारी आता 9 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

शेख हसीना सलग तिसऱ्यांदा बांगलादेशचं नेतृत्व करायला सज्ज आहेत. हसीना यांच्या नेतृत्त्वामध्ये गेल्या काही वर्षांत बांगलादेश आशियातील सर्वांत यशस्वी राष्ट्र म्हणून उदयाला आलं आहे.

एक काळ होता जेव्हा बांगलादेश (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) पाकिस्तानमधला सर्वांत गरीब प्रदेश होता. 1971 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तिथं भीषण दारिद्य्र होतं. 2006 सालापासून चित्र बदललं आणि विकासाच्या स्पर्धेत बांगलादेशनं पाकिस्तानला मागे टाकलं.

'विकासदरात भारताला मागे टाकणार बांगलादेश'

बांगलादेशचा वार्षिक जीडीपी दर पाकिस्तानहून 2.5 टक्क्यांनी जास्त आहे. ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्या मते विकासदराबाबत बांगलादेश लवकरच भारतालाही मागे टाकेल.

विकासदरात बांगलादेशची आगेकूच

फोटो स्रोत, Getty Images

बांगलादेशची लोकसंख्या दरवर्षी 1.1 टक्के दराने वाढत आहे. तर पाकिस्तानची लोकसंख्या दरवर्षी 2 टक्के दराने वाढत आहे. याचा अर्थ असाही होती की पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशातलं दरडोई उत्पन्न वेगाने वाढत आहे.

बांगलादेश अत्यंत शांतपणे स्वतःचा कायापालट करत असल्याचं बोललं जातं. कौशिक बासू सांगतात, की बांगलादेशच्या समाजातील मोठ्या वर्गात बदलाचे वारे वाहत आहेत आणि तिथं महिला सशक्तीकरणही वेगाने सुरू आहे. बांगलादेशात सरासरी आयुर्मान 72 वर्षं झालं आहे. भारतात ते 68 वर्षं तर पाकिस्तानात 66 वर्षं आहे.

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2017 मध्ये बांगलादेशात ज्या लोकांची बँक खाती होती त्यातील 34.1% लोकांनी 'डिजिटल ट्रॅन्झॅक्शन' केलं. दक्षिण आशियात हे प्रमाण 27.8% इतकं आहे.

भारतात 48% लोक असे आहेत ज्यांच्याकडे बँक खाती तर आहेत, मात्र त्यातून ते काहीच व्यवहार करत नाहीत. अशा खात्यांना 'डॉर्मंट अकाऊंट' म्हणजेच 'निष्क्रिय खाती' म्हणतात. तर बांगलादेशात हे प्रमाण केवळ 10.4% आहे.

या वर्षी सुरुवातीला संयुक्त राष्ट्रांनी 2024मध्ये बांगलादेशला अल्पविकसित राष्ट्रांच्या श्रेणीतून काढून विकसनशील राष्ट्रांच्या श्रेणीत टाकण्याविषयीचं वक्तव्य केलं होतं. पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशसाठी हे एक मोठं यश असेल.

संयुक्त राष्ट्रांच्या या निर्णयाविषयी शेख हसीना यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, "अल्पविकसित राष्ट्रांच्या श्रेणीतून बाहेर पडणं हे आमचा आत्मविश्वास आणि अपेक्षांच्या बळकटीसाठी खूप महत्त्वाचं आहे. केवळ नेत्यांसाठीच नाही तर इथल्या नागरिकांसाठीही हे चांगलं आहे. तुम्ही खालच्या पायरीवर असाल तर तुम्हाला प्रकल्प आणि कार्यक्रमाच्या वाटाघाटीदेखील त्यांच्याच अटीशर्तींवर कराव्या लागतात. अशावेळी तुम्ही इतरांच्या दयेवर असता. एकदा त्या श्रेणीतून बाहेर पडलात की कुणाच्या दयेवर नाही तर स्वतःच्या क्षमतेवर पुढे जाता."

शेख हसीना

फोटो स्रोत, Getty Images

बांगलादेशचा हा विकास दर केवळ कायम राहणार नाही तर त्यात वाढच होईल, अशी आशा हसीना यांनी व्यक्त केली आहे. एशियन निक्केई रिव्हूला दिलेल्या मुलाखतीत शेख हसीना यांनी म्हटलं आहे, "येत्या पाच वर्षांत विकासदर 9% राहील आणि 2021 साली 10 टक्क्यांवर जाईल, अशी आशा मला आहे. मी नेहमीच जास्त विकासदराचा अंदाज बांधत असते."

अनेक आघाड्यांवर बांगलादेशची कामगिरी सरकारी उद्दिष्टांच्या पुढे गेली आहे. बांगलादेशचा भर उत्पादन क्षेत्रावर आहे. कापड उद्योगात बांगलादेशचं प्रभुत्व संपूर्ण जगानं मानलं आहे.

बांगलादेशात तयार होणाऱ्या कापडाची निर्यात दरवर्षी 15 ते 17 टक्क्यांनी वाढत आहे. जून 2018मध्ये कापड निर्यात 36.7 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 2019 पर्यंत ही निर्यात 39 अब्ज डॉलर आणि 2021 मध्ये म्हणजे जेव्हा बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असेल त्यावर्षी ही निर्यात 50 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं हसीना यांचं लक्ष्य आहे.

बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत परदेशात काम करणाऱ्या जवळपास 25 लाख बांगलादेशी नागरिकांचंही मोठे योगदान आहे. परदेशातून ते जो पैसा बांगलादेशात पाठवतात त्यात दरवर्षी 18 टक्क्यांनी वाढ होत आहे. 2018 मध्ये 15 अब्ज डॉलर एवढी ही कमाई होती.

शाश्वत अर्थव्यवस्थेसाठी देशात उद्योग-धंद्यांना चालना देण्याची गरज असल्याची जाणीव हसीना यांना आहे. परदेशी पैसा आणि मदतीवर अवलंबून असलेल्या अल्प भांडवलावर आधारित 'मॅन्युफॅक्चरिंग हब'मधून बांगलादेश आता बाहेर पडू इच्छित आहे.

तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी 2009 साली शेख हसीना यांनी 'डिजिटल बांगलादेश' लॉन्च केलं. बांगलादेशाची राजधानी ढाकामध्येही तंत्रज्ञान क्षेत्राने पाय रोवायला सुरुवात केली आहे. ढाक्यातील सीईओ भारतापासून धडा घेत त्यांना आव्हान उभं करू इच्छितात.

भारताला आव्हान देण्याची मनीषा

औषध निर्मिती क्षेत्रात भारत बराच पुढे आहे आणि या क्षेत्रातही भारताला आव्हान देण्याचे बांगलादेशचे प्रयत्न सुरू आहेत. बांगलादेश सरकार देशभरात 100 विशेष आर्थिक क्षेत्राचं जाळं विणायची तयारी करत आहे. यातील 11 तयार आहेत तर 79 SEZचे काम सुरू आहे.

बांगलादेश देश छोटा असला तरी त्यांची लोकसंख्या मोठी आहे. इथे लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. बांगलादेश बँकेचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ फैसल अहमद ही मोठी लोकसंख्या आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी फायद्याची असल्याचे मानतात. मोठ्या लोकसंख्येमुळे सामाजिक आणि आर्थिक संकल्पनांच्या प्रत्यक्ष अंलबजावणीसाठी मदत मिळेल, असं फैसल एका मुलाखतीत म्हणाले होते.

बांगलादेशात आर्थिक आघाडीवर सर्वकाही आलबेल असण्याचा अर्थ इथे काहीच समस्या नाहीत, असा होत नाही. बांगलादेशात दोन प्रमुख पक्षांमध्ये कडवी झुंज आहे. बांगलादेशातील राजकारणात दोन महिला शेख हसीना आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा दबदबा आहे.

बेगम खालिदा झिया-शेख हसीना

फोटो स्रोत, Getty Images

बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान होता त्या काळात दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या तीन दशकात या दोन्ही महिला सत्तेत येत-जात आहेत. दोघी तुरुंगातही गेल्या आहेत.

खालिदा झिया भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत आणि तिथूनच त्या त्यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष चालवत आहेत. आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवून मुद्दाम तुरुंगात डांबल्याचा झिया यांचा आरोप आहे.

शेख हसीना 1981 पासून सत्ताधारी अवामी लीग या पक्षाचं नेतृत्व करत आहेत. हा पक्ष त्यांचे वडील शेख मुजिबुर रेहमान यांनी स्थापन केला होता. रेहमान बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती होते. 1975 साली लष्कराने रेहमान आणि त्यांच्या कुटुंबातील अनेकांची हत्या केली होती.

भूतकाळातील निवडणुकांमध्ये या पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं आहे. मात्र अवामी लीग सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकीत गैरप्रकार आणि दंडुकेशाहीचा वापर करत असल्याचा विरोधक आणि मानवाधिकार संघटनांचा आरोप आहे.

अवामी लीग गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर आहे. सत्ताधारी पक्षाच्या विजयाने विकासाला आणखी गती मिळेल, असं काहींचं मत आहे.

बांगलादेशाच्या यशात रेडिमेड कापड उद्योगाची सर्वांत मोठी भूमिका मानली जाते. कापड उद्योग सर्वांत जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे. कापड उद्योगामुळे बांगलादेशात 40.5 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

बांगलादेशची कापड निर्मितीत आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

2018 साली बांगलादेशच्या एकूण निर्यातीत रेडिमेड कापडाचा वाटा 80% होता. 2013 साली आलेली राणा प्लासा आपत्ती बांगलादेशच्या कापड उद्योगासाठी एक मोठा धक्का होती.

कापड कारखान्याची ही बहुमजली इमारत कोसळली आणि त्यात 1,130 लोकांचा बळी गेला होता. यानंतर कापड उद्योगातील आंतरराष्ट्रीय ब्रँड कंपन्यांना अनेक सुधारणा कराव्या लागल्या.

कारखान्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि त्यात काम करणाऱ्या कामगारांच्या हितासाठी अनेक बदल करण्यात आले. बांगलादेशात कापड शिवण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतं आणि यात मोठ्या प्रमाणावर महिला काम करतात. 2013 सालानंतर आता ऑटोमेटेड मशीन वापरल्या जात आहेत.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापर युद्धामुळे आपला फायदा होईल, अशी आशा बांगलादेशातल्या कापड उद्योगाला वाटते. चीनकडून कापड निर्यात कमी झाली तर ती पोकळी भरून काढण्याची क्षमता आपल्यात आहे, असा विश्वास बांगलादेशला आहे. मात्र या परिस्थितीचा फायदा व्हिएतनाम, टर्की, म्यानमार आणि इथियोपिया यांनाही मिळण्याची शक्यता आहे.

कापड उद्योगात अनेक देश बांगलादेशसाठी आव्हान उभं करत आहेत. गेल्या पाच वर्षात 4,560 कापड कारखान्यांपैकी 22% कारखाने कमी झाल्याची माहिती बांगलादेश गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्सपोर्ट्स असोसिएनने दिली आहे.

बांगलादेशच्या कापड उद्योगासाठी भविष्यात अनेक अडचणी असल्याचं मार्केट रिसर्च कंपनी सीएलएसएचे स्ट्रॅटेजिस्ट क्रिस्टोफर वुड्स यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

ते म्हणतात, "बांगलादेशातील या उद्योगात काम करणाऱ्यांना खूप कमी पैसे मिळतात. 2024 साली संयुक्त राष्ट्रांनी बांगलादेशला अल्पविकसित राष्ट्राच्या श्रेणीतून काढून विकसनशील राष्ट्रांच्या श्रेणीत टाकलं तर टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी हा देश उत्पादन शुल्क मुक्त बाजार राहणार नाही. बांगलादेशसमोरचं दुसरं आव्हान म्हणजे इथे दुसऱ्या कुठल्याचं क्षेत्राचा प्रभावी विकास झालेला नाही. बांगलादेशात आणखी परदेशी गुंतवणुकीची गरज आहे."

एफडीआयची स्थिती चांगली नाही

शेख हसीना यांच्या गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात एफडीआय म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक तिप्पट झाली असली तरी बांगलादेशात एफडीआयची परिस्थिती फार चांगली नाही.

2008 साली 96.1 कोटी डॉलर इतकी परकीय गुंतवणूक होती. ती यावर्षी जूनमध्ये तीन अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. व्हिएतनाम आणि म्यानमारसारख्या आशियातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत ही वाढ कमीच आहे.

व्यापर करणे किती सुलभ आहे, याबाबतीत बांगलादेशची रँकिंग खराब आहे. 'ईझ ऑफ डुईंग बिजनेस' म्हणजेच व्यवसायासाठी सुलभतेच्या बाबतीत जागतिक बँकेने 190 देशांच्या यादीत बांगलादेशला 176व्या क्रमांकावर ठेवलं आहे.

इतक्या खराब रँकिंगसाठी लालफीतशाही, पायाभूत सुविधांचा अभाव आणि खराब परिवहन सेवा, यांना कारणीभूत मानले जातं. याबाबतीत सिंगापूर, म्यानमारसारखे देश बांगलादेशपेक्षा खूप पुढे आहेत.

शेख हसीना यांनी आपल्या कार्यकाळात डिजिटल व्यवस्थेत बरीच सुधारणा केली आहे. बांगलादेश आणि परदेशी मीडिया याचं श्रेय अमेरिकेत शिकलेल्या हसीना यांच्या मुलाला देतात.

डिजीटल बांगलादेश कार्यक्रमात शेख हसीना यांचे चिरंजीव सजीब अहमद यांची भूमिका फार महत्त्वाची मानली जाते. या कार्यक्रमांतर्गत बांगलादेशात माहिती तंत्रज्ञानाचा बराच विस्तार झाला आणि देशभरात 12 हायटेक पार्क उभारण्यात आले.

तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

बांगलादेश आयटी क्षेत्र भारताशी स्पर्धा करण्याची महत्त्वांक्षा बाळगून असल्याचं बोललं जातं. सॉफ्टवेअर कंपनी टेक्नोहेवन आणि बांगलादेश असोसिएशन ऑफ स्वॉफ्टवेअर अँन्ड इन्फोरमेशन सर्व्हिसचे सहसंस्थापक हबीबुल्लाह करीम यांनी 'फायनेंशिअल टाईम्स'ला एक मुलाखत दिली आहे.

त्यात ते म्हणतात, "बांगलादेशात यावर्षी 30 जूनपर्यंत आयटी सर्व्हिस आणि सॉफ्टवेअरची निर्यात 80 कोटी डॉलरपर्यंत पोहोचली आहे आणि यंदाच्या आर्थिक वर्षात ही निर्यात एक अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल. सरकारने 2021 पर्यंत हे लक्ष्य पाच अब्ज डॉलर ठेवलं आहे. हे खूपच आव्हानात्मक आहे."

करीम या मुलाखतीत म्हणतात 80 कोटी डॉलरहून तीन वर्षांत पाच अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणे म्हणजे सहा पट वाढ करावी लागेल. बांगलादेशात आईटी क्षेत्रात बरंच काम झाल्याचं ते सांगतात. आता फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि इंशुरन्स क्लेम सगळं ऑनलाईन होतं.

आयटी कंपनी ई-जनरेशनचे अध्यक्ष आणि बांगलादेश असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅन्ड इन्फोर्मेशन सर्व्हिसचे माजी प्रमुख शमीन अहसान यांनी एशियन निक्केई रिव्ह्यूला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, "40 वर्षांपूर्वी बांगलादेशात काही कंपन्यांमुळे कापड उद्योग उभा राहिला. आता बांगलादेश 30 अब्ज डॉलरच्या कापडाची निर्यात करतो आणि आमच्यापेक्षा पुढे केवळ चीन आहे. हेच आम्हाला आयटी क्षेत्रात करायचे आहे."

जेनरिक औषध निर्मितीत जगभर भारताचं नाव घेतलं जातं. मात्र या क्षेत्रात बांगलादेश भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. अल्पविकसित राष्ट्र असल्यामुळे बांगलादेशला पेटंटच्या नियमातून सूट मिळाली आहे.

याच सवलतीच्या बळावर बांगलादेश भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. जेनरिक औषध निर्मितीत बांगलादेश जगातील दुसरा सर्वातं मोठा देश बनला आहे आणि 60 देशांमध्ये या औषधांची ते निर्यात करतात.

पायाभूत सुविधांच्या अभावामुळे बांगलादेश अनेक बाबतीत मागे राहतो. मात्र चीन 'वन बेल्ट वन रोड' योजनेअंतर्गत अनेक आघाड्यांवर बांगलादेशला मदत करत आहे. बांगलादेशातील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये चीन बांगलादेशला आर्थिक मदत करत आहे.

चीन बांगलादेशातील पद्मा नदीवर रेल्वे लाईन पूलाची उभारणी करत आहे. हा पूल देशाच्या दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पूर्व भागांना जोडेल. चीन बांगलादेशला 38 अब्ज डॉलर कर्ज देणार आहे.

मोठमोठी कर्ज देऊन चीन छोट्या राष्ट्रांना कर्जाच्या दुष्टचक्रात अडकवत असल्याची टीका होत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानच्या बाबतीतही हेच म्हटलं जातं. मात्र बांगलादेशात या टीकेवर फारशी प्रतिक्रिया उमटली नाही.

बांगलादेश आणि चीन

2018मध्ये चीनने बांगलादेशातील ढाका स्टॉक एक्सचेंजचा 25% भाग खरेदी केला होता. भारतानेही यासाठी प्रयत्न केला होता. मात्र चीनने जास्त रक्कम दिली आणि भारताच्या हातून हा सौदा निसटला. पाकिस्ताननंतर चीनकडून शस्त्रास्त्र खरेदी करणारा बांगलादेश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा देश आहे. चीन या भागात मोठी भूमिका बजावत असल्याचं शेख हसीना यादेखील मान्य करतात.

बांगलादेशने अनेक आघाड्यांवर केवळ पाकिस्तानलाच मागे टाकलेले नाही तर भारतालाही मागे टाकण्याच्या प्रयत्नात आहे. बालमृत्यू दर, लैंगिक समानता आणि सरासरी आयुर्मान या बाबतीत बांगलादेशने आधीच भारताला मागे टाकलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 2013 साली बांगलादेशचं दरडोई उत्पन्न 914 डॉलर होतं ज्यात 39.11 टक्क्यांची वाढ होऊन 2016 मध्ये ते 1,355 डॉलर झालं. याच काळात भारताच्या दरडोई उत्पन्नात 13.80% वाढ झाली आणि ते 1,706 डॉलरवर पोहोचलं.

या वर्षांमध्ये पाकिस्तानच्या दरडोई उत्पन्नात 20.62% वाढ झाली आणि ते 1,462 डॉलरवर पोहोचलं. बांगलादेशने याच वेगानं प्रगती केली तर 2020पर्यंत तो दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारतालाही मागे टाकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)