स्पर्शाची जादूः बाळासाठी हळूवार थोपटणं करतं ‘पेन किलर’चं काम!

लहान बाळाला इतर कशापेक्षाही स्पर्शाची भाषा अधिक कळते, असं म्हणतात. हीच बाब एका संशोधनातूनही अधोरेखित झाली आहे. बाळाला थोपटल्यामुळे त्याच्या मेंदूमधील वेदनादायक संवेदनांची तीव्रता कमी होत असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लिव्हरपूल जॉन मूर विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनामध्ये 32 बाळांच्या मेंदूंमधील घडामोडींचे निरीक्षण केले गेले. बाळांच्या रक्ताची चाचणी घेत असताना थोपटल्यामुळे त्यांच्या वेदनांवर काही परिणाम होतो का, हे यामध्ये पाहिले गेले.

32 बाळांपैकी निम्म्या बाळांना चाचणीपूर्वी हळूवारपणे थोपटण्यात आले. या बाळांच्या मेंदूमध्ये वेदना निर्माण करणाऱ्या संवेदना ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले.

प्रोफेसर रिबेका स्लॅटर यांनी या संशोधनासंदर्भात बोलताना म्हटले, "स्पर्श हा कोणतेही दुष्परिणाम नसलेल्या वेदनाशामक औषधाप्रमाणे काम करतो."

"वेदना कमी करण्यासाठी थोपटण्याचा, कुरवाळण्याचा वेग हा प्रति सेकंद 3 सेंटिमीटर असल्याचे संशोधनामध्ये आढळून आले. मुळातच पालक आंतरिक प्रेरणेने त्यांच्या मुलांना साधारण या गतीनेच थोपटत असतात," असे प्रोफेसर स्लॅटर यांनी म्हटले.

"लहान बाळांना करण्यात येणाऱ्या मालिशसारख्या उपचारतंत्राची न्युरोबायोलॉजिल उपयुक्तता समजून घेतल्यानंतर आता आम्ही मुलांना कशामुळे आराम मिळू शकतो याबद्दल पालकांना अधिक चांगला सल्ला देऊ शकतो," असेही स्लॅटर यांनी सांगितले.

थोपटल्यामुळे संवेदना पोहोचविणारे मज्जातंतू कार्यान्वित

योग्य गतीने थोपटल्याने त्वचेमधले संवेदना पोहोचविणारे मज्जातंतू कार्यान्वित होतात. या मज्जातंतूंना 'सी-टॅक्टाइल' म्हणतात. हे मज्जातंतू प्रौढांमध्ये वेदनाशमनाचे काम करत असल्याचे यापूर्वीच्या संशोधनातून सिद्ध झाले होते. मात्र लहान मुलंही थोपटण्याच्या क्रियेला तोच प्रतिसाद देतात की वय वाढेल तशी ही भावना वाढीस लागते, हे स्पष्ट झाले नव्हते.

प्रोफेसर स्लॅटर यांनी म्हटले, "सी-टॅक्टाइल लहान मुलांमध्येही कार्यान्वित होत असल्याचे आता दिसून आलंय. हळूवार, सौम्य स्पर्श लहान मुलांच्या मेंदूमधील संवेदनांवरही परिणाम करतो."

हा शोधनिबंध 'करंट बायोलॉजी'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. बाळांना स्पर्शातून आश्वस्त करणाऱ्या मसाज किंवा 'कांगारु केअर'सारख्या पद्धतींमधल्या आल्हाददायक अनुभवामागचं शास्त्रीय कारण हा शोधनिबंध समजावून देत असल्याचं स्लॅटर यांचं म्हणणं आहे.

स्पर्शामुळे पालकांचे मुलांसोबतचे भावनिक नाते बळकट होते, बाळ आणि आई-वडील दोघांसाठीही स्पर्श हा ताण कमी करण्याचे उत्तम माध्यम आहे हे यापूर्वी झालेल्या संशोधनामधून समोर आलेच होते. आता स्पर्शाचा एक नवीन फायदा ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लिव्हरपूल जॉन मूर विद्यापीठाने केलेल्या संशोधनाने मांडला आहे.

प्री-मॅच्युअर बाळांसाठीही करणार संशोधन

ज्यांच्या संवेदना पुरेशा विकसित झालेल्या नाहीत, अशा प्री-मॅच्युअर बाळांवरही हाच प्रयोग करण्याचा विचार आता संशोधक करत आहेत. आजारी आणि प्री-मॅच्युअर बाळांसाठी काम करणाऱ्या 'ब्लिस'च्या मुख्य कार्यकारी प्रमुख कॅरोलिन ली-डेव्ही यांनी या संशोधनाचे स्वागत केले आहे. "नवजात बालकांसाठी एक सकारात्मक स्पर्श किती महत्त्वाचा असतो, हे आपल्याला आधीपासूनच माहिती होतं. पालकांचं आपल्या बाळासोबत नातं निर्माण करण्यामध्येही हा स्पर्श मदत करतो," असं डेव्ही यांनी म्हटलं आहे.

"स्पर्श वेदनाशामकाप्रमाणे काम करतो, हे सिद्ध करणारे संशोधन भविष्यातही उपयुक्त ठरेल. प्री-मॅच्युअर बाळांसाठीही या संशोधनावर अधिक काम व्हावे या उद्देशाने 'ब्लिस' ऑक्सफर्ड विद्यापीठाला निधीपुरवठा करत आहे. या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे," अशी भावनाही कॅरोलिन यांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)