अॅडलेड कसोटी : ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाचे 6 विजयी प्रताप

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय क्रिकेट संघाने अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय मिळवला. यामुळे तब्बल दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी विजयाचा दुष्काळ संपुष्टात आला आहे.
पहिल्या डावात संयमी शतकी खेळी तर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करणारा चेतेश्वर पुजारा या विजयाचा शिल्पकार ठरला.
या विजयासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पाचव्या आणि अंतिम दिवशी भारतीय संघाला 6 विकेट्सची आवश्यकता होती तर ऑस्ट्रेलियाला 219 धावांची गरज होती. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करताना 250 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 123 धावांची खेळी साकारली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांतच आटोपला. ट्रॅव्हिस हेडने 72 धावा केल्या. भारतातर्फे जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स मिळवल्या. भारतीय संघाला 15 धावांची छोटी आघाडी मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या डावात भारतीय संघाने दुसऱ्या डावात 307 धावांची मजल मारली. पहिल्या डावातील शतकवीर पुजाराने दुसऱ्या डावात 71 धावांची सुरेख खेळी साकारली. अजिंक्य रहाणेने 70 धावांची खेळी केली. पुजारा-रहाणे जोडीने चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन लॉयनने 6 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाच्या आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियाने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. शॉन मार्शने 60 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमरा, मोहंमद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी 3-3 विकेट्स घेतल्या.
एवढंच नव्हे तर, एका कॅलेंडर वर्षात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका तसंच ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात संघाचं विजयी नेतृत्व करणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.

- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे.
- भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतने या सामन्यात 11 कॅच टिपत जॅक रसेल आणि AB डी'व्हिलियर्स या दोघांच्या नावावर असलेल्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली.
- चेतेश्वर पुजाराने शतकी खेळीदरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये 5,000 धावांचा टप्पा पूर्ण केला.
- या सामन्यात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात 1,000 कसोटी धावांचा टप्पा पार केला.
- एका कॅलेंडर वर्षात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात कसोटी विजयात नेतृत्वाची धुरा सांभाळणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार आहे.
- भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातला फक्त सहावा कसोटी विजय आहे. याआधी दहा वर्षांपूर्वी 2008 मध्ये पर्थमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाने नमवलं होतं. त्या संघातला इशांत शर्मा आज अडलेडमध्येही भारतीय संघाचा भाग आहे.

याआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात केवळ पाच वेळा कसोटी विजय मिळवला आहे. त्या दुर्मिळ पाच विजयांबद्दल जाणून घेऊया.
चंद्रशेखर आणि गावस्कर चमकले
मेलबर्न, 30 डिसेंबर 1977 -4 जानेवारी 1978- 222 धावांनी विजयी
भारताच्या ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या विजयाचं श्रेय चंद्रशेखर आणि गावस्कर या दुकलीला जातं. चंद्रशेखर यांनी पटकावलेल्या 12 विकेट्स आणि गावस्कर यांनी झळकावलेलं शतक यांच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातला पहिलावहिला विजय मिळवला.
बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय साकारला.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय खेळाडूंच्या कामगिरीइतकंच केरी पॅकर लीगला या विजयाचं श्रेय जातं. आताच्या घडीला ट्वेन्टी-20 लीगचं जगभर पेव फुटलं आहे. मात्र 80च्या दशकात केरी पॅकर यांनी पहिल्यांदा अशी संकल्पना राबवली.
ऑस्ट्रेलियाचे चॅपेल बंधू, डेनिस लिली तसंच अन्य महत्त्वाचे खेळाडू या मालिकेत खेळले नाहीत. भारतीय संघाने या मालिकेतील सुरुवातीच्या दोन टेस्ट गमावल्या. तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय खेळाडूंनी खेळ उंचावत बाजी मारली.
भारतीय संघाने 256 धावांची मजल मारली. मोहिंदर अमरनाथ यांनी 72 तर गुंडप्पा विश्वनाथ यांनी 59 धावांची खेळी केली. चंद्रशेखर यांनी घेतलेल्या 6 विकेट्सच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 213 धावांत गुंडाळला. भारताला 43 धावांची आघाडी मिळाली.
लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने 343 धावा केल्या. 387 धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 164 धावांतच गडगडला. चंद्रशेखर यांनी दुसऱ्या डावातही 6 विकेट्स पटकावल्या.

सांघिक कामगिरीचा विजय
सिडनी, 7 ते 12 जानेवारी 1978- एक डाव आणि 2 धावांनी विजयी
पहिल्या विजयातून प्रेरणा घेत भारतीय संघाने काही दिवसातच दुसऱ्या विजयाची नोंद केली.
चंद्रशेखर (4) तर बेदी (3) यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 131 धावांत गुंडाळलं. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने 396 धावांवर आपला डाव घोषित केला. गुंडप्पा विश्वनाथ यांनी 79 तर करसन घावरी यांनी 64 धावांची खेळी केली.
भारतीय संघाला 265 धावांची मोठी आघाडी मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 263 धावांत आटोपला. भारतीय संघाने एक डाव आणि 2 धावांनी मोठा विजय साजरा केला. प्रसन्ना यांनी 4 विकेट्स घेत या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

विश्वनाथ यांचं शतक, कपिल यांचं पंचक
मेलबर्न, 7 ते 11 फेब्रुवारी 1981- 59 धावांनी विजयी
गुंडप्पा विश्वनाथ यांच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने 237 धावा केल्या. मात्र दुसऱ्या बाजूने त्यांना कोणाचीही खंबीर साथ मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून डेनिस लिली यांनी 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने 419 धावा करत मोठी आघाडी मिळवली. अॅलन बॉर्डर यांनी 124 धावांची शतकी खेळी साकारली, ग्रेग चॅपेल यांनी 76 तर डग वॉल्टर्स यांनी 78 धावांची खेळी केली.
भारतीय संघाने 324 धावा केल्या. चेतन चौहान यांनी 85 तर सुनील गावस्कर यांनी 70 धावांची खेळी केली. गावस्कर यांना LBW देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला.
आऊट नसल्याचं वाटल्याने गावस्कर यांनी चौहान यांच्या साथीने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. गावस्कर यांनी डाव आहे त्या स्थितीत सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र व्यवस्थापक सलीम दुर्रानी यांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलियाला 143 धावांचे छोटेखानी लक्ष्य मिळाले. मात्र कपिल देव यांनी 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. ऑस्ट्रेलियाच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विश्वनाथ यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आला.
द्रविड-आगरकरची बाजी
अॅडलेड, 12 ते 16 डिसेंबर 2003- 4 विकेट्सनी विजयी
पुढच्या विजयासाठी भारतीय संघाला तब्बल 22 वर्षं वाट पाहावी लागली.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 556 धावांचा डोंगर उभारला. रिकी पॉन्टिंगने 31 चौकारांसह 242 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. सायमन कॅटीच (75), जस्टीन लँगर (58) यांनी अर्धशतकी खेळी साकारत पॉन्टिंगला चांगली साथ दिली.

फोटो स्रोत, Getty Images
राहुल द्रविड यांनी साकारलेली द्विशतकी खेळी आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी केलेल्या शतकी खेळीच्या बळावर भारताने 523 धावा केल्या. द्रविडने 23 चौकार आणि एका षटकारासह 233 धावांची विक्रमी खेळी केली. लक्ष्मणने 18 चौकारांसह 148 धावांची खेळी सजवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 303 धावांची भागीदारी करत कोलकाता इथे झालेल्या ऐतिहासिक भागीदारीच्या स्मृती जागवल्या.
अजित आगरकरने घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 196 धावांतच गुंडाळला. आगरकरने 41 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला स्थिरावू दिले नाही.
भारतीय संघाला विजयासाठी 230 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य मिळालं. वेळ कमी होता. राहुल द्रविडने दुसऱ्या डावातही छाप उमटवत नाबाद 72 धावांची अफलातून खेळी साकारली. द्रविडलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

इरफान पठाणचा अष्टपैलू खेळ
पर्थ, 16 ते 19 जानेवारी 2008- 72 धावांनी विजयी
कुप्रसिद्ध अशा 'मंकीगेट' प्रकरणाने सिडनी कसोटी झाकोळली गेली. अँड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंह यांच्यातल्या भांडणाचं पर्यावसान न्यायालयीन सुनावणीत झालं.
क्रिकेटच्या इतिहासातलं काळं पर्व म्हणून याप्रकरणाची नोंद झाली. सिडनीत झालेल्या नाट्यादरम्यान ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. मात्र काही दिवसातच जगातल्या वेगवान पिचपैकी एक असलेल्या पर्थ या ठिकाणी भारतीय संघाने दिमाखदार विजय साकारला.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 330 धावांची मजल मारली. राहुल द्रविडने 93 तर सचिन तेंडुलकरने 71 धावांची खेळी केली. एकत्रित दमदार प्रदर्शनाच्या बळावर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 212 धावांतच गुंडाळला. रुद्रप्रताप सिंगने 4 तर इरफान पठाण, इशांत शर्मा आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात 294 धावा केल्या. लक्ष्मणने 79 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाला 413 धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालं. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 340 धावांतच आटोपला. इरफान पठाणने 3 तर रुद्रप्रताप सिंग, अनिल कुंबळे आणि वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
अष्टपैलू खेळाकरता इरफानला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








