नासाचं यान 'The InSight lander' मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था NASAचं यान 'The InSight lander' मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता मंगळावर उतरलं.
हे यान मंगळाच्या अंतरंगाचा वेध घेणार आहे. मंगळावरील एलिजिएम प्लॅनिशिआ या मैदानी भागावर हे यान उतरलं.
मंगळावरच्या खडकाळ भागाचं अंतरंग कसं आहे, हे शोधण्यासाठी या यानावर बरीच उपकरणं आहेत. यातली काही उपकरणं युरोपमध्ये बनलेली आहेत.
यानाच्या लॅंडिगच्या वेळेची सात मिनिटं अतिशय महत्त्वाची होती. त्या सात मिनिटांचा शास्त्रज्ञांवर ताण आला होता. या सात मिनिटादरम्यान हे यान नासाला संदेश पाठवत होतं. जेव्हा हे यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं तेव्हा नासाच्या कंट्रोल रूममध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या हे यान मंगळाच्या अवतीभवतीची छायाचित्रं घेत आहे. काही वेळातच या ठिकाणची माहिती पृथ्वीवर येण्याची शक्यता आहे.
काय आहे 'The InSight lander'?
मंगळावर यान उतरत असताना त्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी लागलेली सात मिनिटं अतिशय महत्त्वाची होती. या कालावधीत यानाचा वेग 20,000 किमी प्रति तासाने कमी करण्यात आला. या मोहिमेमुळे आपल्या हाती अशी माहिती येईल जी आतापर्यंत कधीच आली नव्हती असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
हे यान मंगळावर एक साइज्मोमीटर ठेवणार आहे. त्यामुळे मंगळावरील हालचालींची माहिती आपल्या वेळोवेळी मिळेल. मंगळाच्या पृष्ठभागावर भूकंपाचे धक्के बसतात की नाही हेही या उपकरणाद्वारे तपासले जाणार आहे.
हे पहिलं यान आहे जे मंगळाच्या पृष्ठभागावर खोदकाम करून त्याच्या अंतरंगांची माहिती देईल. त्याच बरोबर पृष्ठभागावर एक वेगळं उपकरण बसवण्यात येईल. हे उपकरण मंगळाच्या पृष्टभागाखाली पाच मीटर जाऊन तापमानाची नोंद घेईल.

फोटो स्रोत, FREDRIC J BROWN
मंगळ ग्रह किती सक्रिय आहे याचा अंदाज तापमानामुळे मिळू शकतो. या मोहिमेच्या तिसऱ्या प्रयोगात रेडिओ ट्रान्समिशनचा वापर होणार आहे. मंगळ ग्रह आपल्या अक्षाभोवती फिरत असताना गदागदा हलतो. असं का होतं हे या रेडिओ ट्रान्समिशनव्दारे आपल्याला कळेल असा दावा वैज्ञानिक करत आहेत.
या प्रकल्पावर काम करणाऱ्या एक शास्त्रज्ञ सुझान स्म्रेकर सांगतात, "एक प्रयोग करून पाहा. एक कच्चं अंडं घ्या आणि एक उकडलेलं. दोघांना फिरवा. दोन्ही अंडी वेगवेगळ्या पद्धतीनं फिरतील. आपल्याला आज हे माहीत आहे की दोन्ही अंड्यांच्या आत काय आहे. एका अंड्यात द्रव आहे तर दुसऱ्यात घन पदार्थ. पण मंगळाच्या अंतरंगात काय आहे हे आपल्याला माहीत नाही."
ही मोहीम मंगळ ग्रह आतमधून भरीव आहे की द्रव हे याचं रहस्य उलगडेल असा दावाही त्या करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









