Freedom trashcan: सोशल मीडिया

जगभरातली निम्मी लोकसंख्या सोशल मीडियावर आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, वेइबो, वीचॅट, काकाओ स्टोरी, अशा विविध प्लॅटफॉर्म्सद्वारे जगभरातले नागरिक एकत्र आहेत.
पश्चिम तसंच उत्तर युरोपात दहा पैकी नऊ जण कुठल्या ना कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहेत. मित्रमंडळी तसंच सेलेब्रिटींच्या आयुष्याशी आपली तुलना करत राहणं तरुण वर्गाला त्रास देत राहतं.
सोशल मीडियावर पडीक असणारी माणसं खूप चटकन मानसिक विकारांनी ग्रस्त होतात, असं संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे.
सोशल मीडियामुळे आपण कसे दिसतो ही खूपच महत्त्वाची गोष्ट झाल्याचं तरुण मुली सांगतात. 7 ते 10 वयोगटातल्या मुली ऑनलाइन असताना आपण कसे दिसतो, याच चिंतेत असल्याचं 'गर्ल गाइडिंग' सर्वेक्षणात उघड झालं आहे. 25 टक्के युजर्सना आपण कायम परफेक्ट दिसावं असंही वाटतं.
दुसरीकडे सोशल मीडियामुळे व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याचं युजर्स सांगतात. भावनिक आधार म्हणून सोशल मीडिया उपयुक्त असल्याचंही अनेक जण सांगतात.
#metoo सारखी चळवळ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच निर्माण झाली. निर्भिडपणे व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे ठिकाण असल्याचं अनेकांना वाटतं.







